मागच्या वर्षीच्या गोल्डनगर्लला यंदाही गोल्ड मिळेल का ? तुम्हांला काय वाटतंय ??

कुस्ती म्हटल्यावर डोळ्यासमोर काय उभं राहातं ? आपले पिळदार शरीराचे पठ्ठे...आपले गबरू पैलवान...मांडीवर थाप देऊन शड्डू ठोकणं,  त्यांचं प्रतिस्पर्ध्याला चारीमुंड्या चीत करणं.. ती गदाधारी पोझ.. भरपूर खुराक आणि भरपूऽऽऽर व्यायाम!! दंगल-दंगल.. आणि सलमानचा सुलतान..!! झालंच तर आपला “भैरू पैलवानकी जय” आणि कोल्हापूरच्या मातीत रंगलेल्या कुस्त्या !!

पण कुस्ती म्हणजे फक्त इतकंच नसतं ना बॉस. कुस्ती म्हणजे अजून खूप काही असतं. कुस्ती म्हणजे दिवसाला ५० बदामांची थंडाई, कुस्ती म्हणजे सकाळ-संध्याकाळचा पाच-पाच तास व्यायाम!! कुस्ती म्हणजे फक्त मर्दानी लढवय्ये नाहीत, तर मैदान गाजवणा-या आपल्या रणरागिणी सुद्धा !! कुस्ती म्हणजे फक्त उरूस-जत्रांमधल्या लढती नाहीत तर, वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसारखी हिंदुस्तानातली सर्वोच्च स्पर्धा सुद्धा.. हे सगळं सगळं कुस्ती म्हटलं की एका दमात येतं.


स्रोत

महाराष्ट्राच्या रणरागिणी घरच्या आखाड्यात जशा तुफानी असतात,  तशाच या स्पर्धेच्या आखाड्यातही त्या कुणाला ऐकत नाहीत हां.. या महाराष्ट्राच्या कन्यांनी मागच्या वर्षीपासूनच आपला दबदबा निर्माण करायला सुरूवात केलीय. मागच्या वर्षी आपली गोल्डनगर्ल रेश्मा मानेनं सुवर्णपदक अस्सं खेचून आणलं होतं. यावर्षीही ती आखाड्यातली जादू दाखवून गोल्ड मेडल जिंकण्याच्या तयारीत आहे. तिची राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा मिळून आठ सुवर्णपदकं, सात कांस्यपदकं आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहा रौप्यपदकं अशी भलीमोठी मेडल लिस्ट  आहे. ती पाहता आपलं एक गोल्ड तर फिक्स आहे. त्यामुळे तिच्या खेळाकडे आपण डोळे लावून असणार आहोतच.

रेश्माबरोबर आपल्या पुण्याची तडफदार मल्ल अंकिता गुंड आणि कोल्हापूरची शान नंदिनी साळोखे या दोघीही स्पर्धेत आहेत,  त्यामुळे तर स्पर्धा अधिकच रंगणार आहे. या अंकिता आणि नंदिनीही काही कमी नाहीत बरं. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये आठ सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्यपदकं अशी तगडी मेडल लिस्ट अंकिताची आहे. तर, चार सुवर्णपदकं, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तीन सुवर्णपदकं, दोन रौप्य, दोन कांस्य अशी तोडीस-तोड यादी नंदिनीचीही आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राची खेळी पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. यात काही वादच नाही.. तर, मग आपण आत्तापासूनच जल्लोषाच्या तयारीला लागूया.. काय..?

सबस्क्राईब करा

* indicates required