Serena Williams Retirement: शेवटच्या सामन्यात पराभवानंतर सेरेना झाली भावूक; असा दिला निरोप...

सेरेना विल्यम्स (Serena Williams) ही दिग्गज टेनिसपटूंपैकी एक आहे. मात्र ३ सप्टेंबर हा तिच्या टेनिस कारकिर्दीतील शेवटचा दिवस ठरला आहे. सध्या सुरू असलेल्या युएस ओपन २०२२ (US open 2022) स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत पराभूत झाल्यानंतर तिने टेनिसला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २६ सप्टेंबर रोजी ती ४१ वर्षांची होणार आहे. वयाच्या ४० वर्षांपर्यंत तिने टेनिस खेळत अनेक मोठ मोठे विक्रम मोडले. मात्र तिसऱ्या फेरीत पराभूत होताच तिने भावूक होऊन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.

या वर्षातील शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या युएस ओपनच्या तिसऱ्या फेरीत तिला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिला तिसऱ्या फेरीत तिला अजला तोम्लजानोविकने ७-५,६-७, ६-१ ने पराभूत केले आहे. सेरेनाने पहिला सेट गमावला होता. त्यानंतर दुसऱ्यास सेटमध्ये जोरदार पुनरागमन केले होते. मात्र तिसऱ्या सेटमध्ये तिला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला.

सेरेना विल्यम्सने आतापर्यंत एकूण ६ वेळेस युएस ओपन ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवले आहे. हा सामना झाल्यानंतर तो भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. सामना झाल्यानंतरच्या मुलाखतीत तिने म्हटले की, "ही चुरशीची लढत होती. मी खरी लढवय्या आहे. खरे सांगायचे तर मी खूप भाग्यवान आहे की मला हे सर्व मिळाले."

२३ वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन सेरेना निवृत्तीचा निर्णय बदलून आणखी काही काळ टेनिस खेळताना दिसणार आहे का? हा प्रश्न चाहत्यांच्या मनात खूप घोळत होता, पण सेरेनाने उत्तर देताना सांगितले की,"मला माहित नाही. मी याचा विचार करत नाही. मी देखील एक आई आहे आणि आता या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यावर माझा भर असेल. मला आता माझे आयुष्य जगायचे आहे."

सबस्क्राईब करा

* indicates required