बिस्कीट बनवणाऱ्याच्या मुलाने गाजवलं कसोटी क्रिकेट; बनवलाय असा विक्रम जो कोणीही मोडू शकत नाही...

श्रीलंका संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहे का? असा प्रश्न जर विचारला तर अनेकांचं उत्तर नाही असं असेल. श्रीलंका संघाला सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांत या संघात अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र आधीचा श्रीलंकेचा संघ पाहिला तर,मजबूत संघांनाही घाम फुटल्याशिवाय राहायचा नाही. श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवणं जरा कठीणच होतं. या संघात एकापेक्षा एक खेळाडू होते. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan). हा तोच गोलंदाज आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये गडी बाद करण्याचा पाऊस पाडला. त्याने आजच्याच दिवशी (On This Day) (२२ जुलै) कसोटी क्रिकेटला राम राम केला होता.

मुरलीधरनने २२ जुलै २०१० रोजी कसोटी क्रिकेटमध्ये ८०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. यापुढे त्याला एकही गडी बाद करता आला नव्हता. ही ऐतिहासिक कामगिरी त्याने भारतीय संघाविरुद्ध खेळताना केली होती आणि हाच त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. आश्चर्यकारक बाब म्हणजे त्याने आधीच स्पष्ट केलं होतं की, हा त्याचा शेवटचा सामना असणार आहे.

मुरलीधरनने भारतीय संघाचा दुसरा डाव सुरू असताना हा पराक्रम केला होता. माजी भारतीय गोलंदाज प्रज्ञान ओझा हा त्याचा ८०० वा बळी ठरला होता. श्रीलंका संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ८ बाद ५२० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव लवकर आटोपला. मुरलीधरनच्या ५ गडी बाद करण्याच्या जोरावर भारतीय संघाला ३३८ धावा करता आल्या होत्या. मुरलीधरनने प्रज्ञान ओझाला बाद करत ८०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला. यासह आपल्या कारकीर्दीचा शेवट देखील केला. श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी केवळ ९५ धावांची आवश्यकता होती. हे आव्हान श्रीलंकेने एकही गडी न गमावता पूर्ण केले.

मुथय्या मुरलीधरनच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने १३३ कसोटी सामन्यांमध्ये २२.७२ च्या सरासरीने ८०० गडी बाद केले. तो आजही कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे. मुथय्या मुरलीधरन नंतर सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज हा शेन वॉर्न आहे. शेन वॉर्नने ७०८ गडी बाद केले होते. यावर्षी त्याचे निधन झाले होते. मुथय्या मुरलीधरनचे वडील बिस्कीट कंपनीचे मालक आहेत. त्यांची ही कंपनी श्रीलंकेतील तिसरी सर्वात मोठी बिस्कीट कंपनी आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required