टी -२० WC स्पर्धेच्या इतिहासात वेस्ट इंडिज पहिल्यांदाच या ५ दिग्गजांशिवाय उतरणार मैदानात...

आगामी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धा येत्या ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ जोरदार तयारी करताना दिसून येत आहे. बुधवारी (१४ सप्टेंबर) वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डने आगामी आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. निकोलस पुरनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात अनेक दिग्गज खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. वेस्ट इंडीज संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे वर्षभर जगभरातील लीग स्पर्धा खेळतात आणि आयसीसीच्या स्पर्धांमध्ये वेस्ट इंडीज संघाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र यावेळी असे काहीच होणार नाहीये. 

वेस्ट इंडिज संघ यावेळी आपल्या ५ प्रमुख खेळाडूंशिवाय टी -२० विश्वचषक खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यामध्ये २ खेळाडू असे आहेत जे २००७ टी -२० विश्वचषक स्पर्धेपासून वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

ख्रिस गेल (Chris Gayle) आणि ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo)

ख्रिस गेल आणि ड्वेन ब्रावो हे वेस्ट इंडिज संघातील २ दिग्गज खेळाडू आहेत जे २००७ टी -२० विश्वचषक स्पर्धेपासून वेस्ट इंडिज संघात होते. आतापर्यंत या दोन्ही खेळाडूंनी सर्व टी -२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र आगामी टी -२० विश्वचषक हे दोन्ही खेळाडू खेळताना दिसून येणार नाहीये. ड्वेन ब्रावोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केला आहे. मात्र ख्रिस गेलने अजूनपर्यंत कुठलीही अधिकृत घोषणा केली नाहीये. दोन्ही दिग्गज खेळाडूंनी २०२१ मध्ये झालेल्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केले होते. हा त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा टी -२० विश्वचषक ठरला. 

कायरन पोलार्ड (Kieron Pollard)

या यादीत वेस्ट इंडिज संघाचा माजी कर्णधार कायरान पोलार्डचा देखील समावेश आहे. त्याने गतवर्षी झालेल्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केले होते. ३४ वर्षीय कायरन पोलार्डने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तो आता टी -२० विश्वचषक स्पर्धा खेळताना दिसून येणार नाहीये.

आंद्रे रसल (Andre Russell) आणि सुनील नरेन (Sunil nariane

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डने आंद्रे रसल आणि सुनील नरेनला संघात स्थान न दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. जगभरातील टी -२० लीग स्पर्धांमध्ये जोरदार कामगिरी करणाऱ्या या खेळाडूंना १५ खेळाडूंच्या यादीत स्थान दिले गेले नाहीये. आंद्रे रसलने २०१२, २०१४, २०१६ आणि २०२१ मध्ये झालेल्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तर सुनील नरेनने २०१२ आणि २०१४ मध्ये झालेल्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेसाठी असा आहे वेस्ट इंडिज संघ :

निकोलस पूरन (कर्णधार), रोवमन पॉवेल, यानिक कारिया, जॉन्सन चार्ल्स, शेल्डन कॉट्रेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, काइल मेयर्स, ओबेद मॅककॉय, रेमन रेफर, ओडियन स्मिथ.

सबस्क्राईब करा

* indicates required