या ५ फलंदाजांनी केलीय सरफराज पेक्षाही दमदार कामगिरी! भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आहेत प्रबळ दावेदार..

सरफराज खान (Sarafaraz khan) हा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरतोय. चर्चेत येण्याचं कारण असं की, रणजी ट्रॉफी स्पर्धेत सलग २-३ वर्षे चांगली कामगिरी करूनही त्याला भारतीय संघात संधी दिली जात नाहीये. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया विरुध्द होणाऱ्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या २ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यावेळी देखील सरफराज खानला दुर्लक्ष केलं गेलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चाहते निराश झाले आहेत. मात्र बोभाटाच्या आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा ५ फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत, जे रणजी ट्रॉफी स्पर्धेत सरफराज खान पेक्षाही चांगली कामगिरी करत आहेत.
प्रियांक पांचाळ:
रणजी ट्रॉफी स्पर्धेतील या हंगामात गुजरात संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रियांक पांचाळने देखील चांगली कामगिरी केली आहे. त्याची सरासरी ही इतर फलंदाजांच्या तुलनेत उत्तम आहे. त्याने आतापर्यंत ११६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने ५ सामन्यांतील ७ डावांमध्ये ५८३ धावा केल्या आहेत
अभिमन्यू ईश्वरन:
या यादीत दुसऱ्या स्थानी आहे, पश्चिम बंगाल संघातील टॉप ऑर्डरचा फलंदाज अभिमन्यू ईश्वरन. अभिमन्यू ईश्वरनची फलंदाजी सरासरी १०१ ची आहे. त्याने या हंगामातील ४ सामन्यांमध्ये अप्रतिम फलंदाजी करत ५०५ धावा केल्या आहेत.
ध्रुव शोरे:
दिल्लीकर ध्रुव शोरेने या यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे. दिल्लीच्या या फलंदाजाने आतापर्यंत झालेल्या रणजी सामन्यांमध्ये अप्रतिम फलंदाजी करत सर्वांची मनं जिंकली आहेत. त्याने या हंगामातील ६ सामन्यांमध्ये १००.७५ च्या सरासरीने ८०६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ शतके आणि २ अर्धशतके झळकावली आहेत.
प्रशांत चोप्रा:
प्रशांत चोप्रा हा देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये हिमाचल प्रदेश संघाचे प्रतिनिधित्व करतो. प्रशांतने या रणजी ट्रॉफी हंगामातील ६ सामन्यांमध्ये ९७.५० च्या सरासरीने ७८० धावा केल्या आहेत. तो या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. तसेच प्रशांतने आतापर्यंत ३ शतके झळकावली आहेत.
अंकित कालसी :
हिमाचल प्रदेश संघातील आणखी एक फलंदाज जोरदार कामगिरी करतोय. हा फलंदाज आहे, अंकित कालसी. आतापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यांमध्ये त्याने ९५.७१ च्या सरासरीने ६७० धावा केल्या आहेत. कालसीने देखील या हंगामात ३ शतके झळकावली आहेत.