भारत - ऑस्ट्रेलिया टी -२० मालिकेत या ५ स्टार खेळाडूंवर असेल सर्वांची नजर, टीम डेव्हिड बनू शकतो भारतासाठी धोक्याची घंटा...

आगामी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेसाठी सर्व संघांनी कसून सराव करायला सुरुवात केली आहे. या स्पर्धेपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ ३ टी -२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आमने सामने येणार आहेत. ऑस्ट्रेलिया संघाने नुकताच न्यूझीलंड संघाचा वनडे मालिकेत ३-० ने धुव्वा उडविला आहे. मात्र भारतीय संघाला आव्हान देणं ऑस्ट्रेलिया संघासाठी सोपं नसणार आहे. कारण ऑस्ट्रेलिया संघातील काही खेळाडू या दौऱ्यावर आले नाहीये. अनुभवी गोलंदाज मिचेल स्टार्क गुडघ्याच्या समस्येने त्रस्त आहे. तर अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श टाचेच्या दुखापतीमुळे भारतीय संघाविरुद्ध खेळताना दिसून येणार नाहीये.
तर भारतीय संघात अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलचे पुनरागमन होणार आहे. त्यामुळे या दोघांच्या कामगिरी कडे देखील सर्वांचे लक्ष लागले असणार आहे. दरम्यान आज आम्ही तुम्हाला या मालिकेतील ५ अशा खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत ज्यांच्या कामगिरीवर सर्वांचेच लक्ष लागून असणार आहे.
१) विराट कोहली (Virat Kohli) :
आशिया चषक २०२२ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीला संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरत होती. मात्र या स्पर्धेत जोरदार कामगिरी करुन त्याने अनेकांची बोलती बंद केली आहे.या स्पर्धेत तो दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने ५ सामन्यांमध्ये ९२ च्या सरासरीने २७६ धावा केल्या. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची नक्कीच इच्छा असेल की, त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत चांगली कामगिरी करावी.
२) स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) :
२०२१ मध्ये झालेल्या टी -२० विश्वचषक स्पर्धेनंतर स्टीव्ह स्मिथने केवळ ८ टी -२० सामने खेळले आहेत. यादरम्यान १०८ च्या स्ट्राइक रेटने त्याने १३४ धावा केल्या आहेत. जर त्याला या संघात आपले स्थान टिकवून ठेवायचे असेल तर त्याला भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत कुठल्याही परिस्थितीत धावा कराव्या लागतील. कारण ऑस्ट्रेलिया संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे जोरदार कामगिरी करून स्टीव्ह स्मिथची जागा घेऊ शकतात.
३) युजवेंद्र चहल (Yuzvendra chahal) :
भारतीय संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहल देखील ऑस्ट्रेलिया विरुध्द चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. कारण आशिया चषक स्पर्धेत त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तो गडी बाद करण्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुध्द होणाऱ्या मालिकेत तो जास्तीत जास्त गडी बाद करून फॉर्ममध्ये परतण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
४) रिषभ पंत (Rishabh Pant) :
आगामी आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर, रिषभ पंतला ट्रोल केले जात होते. अनेकांचे म्हणणे आहे की, रिषभ पंतच्या फलंदाजीची जादू टी -२० क्रिकेटमध्ये चालत नाही. त्यामुळे आता रिषभ पंत कडे स्वतःला सिध्द करण्याची सुवर्णसंधी आहे. गतवर्षी झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर २२ सामन्यांमध्ये २८.१ च्या सरासरीने ४२२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक अर्धशतक झळकावले आहे. त्यामुळे या मालिकेत चांगली कामगिरी करून तो आपले स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
५) टीम डेव्हिड (Tim David) :
सिंगापूर संघासाठी १४ टी -२० आंतरराष्ट्रीय खेळलेला टीम डेव्हिड आता ऑस्ट्रेलिया संघासाठी खेळणार आहे. टीम डेव्हिड आपल्या आक्रमक फलंदाजी साठी ओळखला जातो. टीम डेव्हिडने आतापर्यंत मुंबई इंडियन्स, कॅरेबियन प्रीमियर लीग, पाकिस्तान सुपर लीग, काउंटी, टी-२० ब्लास्ट, द हंड्रेड आणि बिग बॅश लीग सारख्या स्पर्धा खेळल्या आहेत. तसेच त्याच्या कामगिरी बद्दल बोलायचं झालं तर, टीम डेव्हिडने १४ टी. -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४६.५० च्या सरासरीने आणि १५८ च्या स्ट्राइक रेटने ५५८ धावा केल्या आहेत. डेव्हिडने या १४ सामन्यांमध्ये ५ गडी देखील बाद केले आहेत. ऑस्ट्रेलिया संघात मार्कस स्टोईनिसच्या जागी टीम डेव्हिडला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरी कडे देखील सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.
काय वाटतं? ऑस्ट्रेलिया विरुध्द होणाऱ्या टी -२० मालिकेत विराट कोहली जोरदार कामगिरी करेल का? कमेंट करून नक्की कळवा.