द. आफ्रिका वि. भारत कसोटी सामन्याचे पंच अल्लाउद्दिन पालेकरांचे मूळ रत्नागिरीत आहे!!

दक्षिण आफ्रिका आणि भारत या संघांमध्ये कसोटी मालिका सुरू आहे. पहिली कसोटी भारताने जिंकून मस्त सुरुवात केली आहे. दुसऱ्या सामन्याला सोमवारपासून जोहान्सबर्ग येथे सुरुवात झाली. या सामन्यात अल्लाउद्दीन पालेकर हे नवे पंच कसोटी पदार्पण करत आहेत. हे दक्षिण आफ्रिकेचे पंच म्हणून पदार्पण करत असले तरी त्यांचे नाव हे भारतीय नावाशी साधर्म्य साधणारे आहे. तुम्हाला नक्कीच वाटले असेल की पालेकर हे मराठी आडनाव आहे. मग हे कनेक्शन नक्की काय आहे? आज आपण हेच पाहूयात.

अल्लाउद्दीन पालेकर यांचे मूळ वंशज चक्क कोकणातले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील शीव हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांचे वडील जमालुद्दीन हे देखील एक पंच आहेत. त्यांच्या कुटुंबातले बरेच सदस्य पंच म्हणून काम करतात. त्यांचे एक काकादेखील पंच आहेत. तर त्यांचे २ चुलत भाऊही पंच बनण्याच्या दिशेने अभ्यास करत आहेत.

पालेकर यांचा जन्म १ जानेवारी १९७८ रोजी केपटाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झाला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत प्रथम श्रेणी क्रिकेटदेखील खेळले आहे. त्यांनी तब्बल १५ वर्षं आंतरराष्ट्रीय सामन्यांत पदार्पण करण्यासाठी वाट पाहिली. खरंतर पालेकर यांनी २०१८ मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला असताना टी२० सामन्यात पंच म्हणून काम पाहताना आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याच वर्षी त्यांना आंतरराष्ट्रीय पंच म्हणून मान्यता मिळाली होती.
कसोटी पंच बनणे हे त्यांच्यासाठी जास्त अभिमानास्पद आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी सामन्यात पंच म्हणून कामगिरी बजावणारे ते ५७ वे पंच आहेत. त्याचवेळी अशी कामगिरी करणारे ते कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ४९७ वे पंच ठरले आहेत.

भारतात यापूर्वी ते येऊन गेले आहेत. अठरा वर्षांपूर्वी म्हणजे २००० साली पर्यटक म्हणून वानखेडे स्टेडियम बघण्यास आले असता त्यांना सुरक्षरक्षकाने आतमध्ये जाण्यास मनाई केली होती. त्याच मैदानावर त्यांनी २०१५ मध्ये झालेल्या मुंबई- मध्य प्रदेश या रणजी सामन्यात पंच म्हणून काम केले. सात वर्षांपूर्वी बीसीसीआयच्या अंपायर एक्सचेंज योजनेअंतर्गत त्यांना ही संधी मिळाली होती. याच योजनेअंतर्गत त्यांनी न्यूझीलंडमध्ये देखील पंच म्हणून काम केले होते.

आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पंच म्हणून पदार्पणात त्यांना भारताविरुद्ध उभे राहावे लागले आहे. हा योगायोगच म्हणावा लागेल. ४४ वर्षीय पालेकर यांना पुढच्या कारकिर्दीसाठी खूप शुभेच्छा.

शीतल दरंदळे

 

सबस्क्राईब करा

* indicates required