८० रुपये कमावणाऱ्या बाबांची मुलगी ते भारतीय हॉकी संघाला यशाच्या शिखरावर नेणारी कॅप्टन!!
भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघाने तडाखेबंद खेळ दाखवत यंदा ऑलिम्पिकमध्ये मोठी मजल मारली. महिला हॉकी संघाने क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघाला माती चारत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता.
या यशाचे श्रेय सर्वच संघाला असले तरी कॅप्टन म्हणून राणी रामपाल या खेळाडूची जबाबदारी आणि श्रेयसुद्धा मोठे आहे. राणी रामपाल साधीसुधी खेळाडू नाही. तिच्या नावावर अनेक विक्रम आहेत. २०१० साली वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी भारतासाठी वर्ल्डकप खेळणारी ती सर्वात कमी वयाची खेळाडू होती, तर 'वर्ल्ड गेम्स ऍथलिट ऑफ द इयर' हा पुरस्कार मिळवणारी जगातली पहिली हॉकी खेळाडू आहे.
असा अफलातून प्रवास करत ती आज हॉकी संघाचे नेतृत्व करत आहे. पण इतकी मोठी उंची गाठण्यासाठी तिला संघर्ष देखील तितकाच प्रचंड करावा लागला आहे. तिची आई इतरांच्या घरी धुणीभांडी करत असे, तर वडील मजुरी करून घर चालवत होते. लहानपणी लाईट नाही, सातत्याचा पूर, कानात घोंघावणारे डासांचे आवाज या सर्व गोष्टीना कंटाळून कुठेतरी पळून जावे असे तिला वाटत असे.
तिच्या घरापासून जवळ एक हॉकी अकॅडमी होती, तिथे जाऊन दिवसभर ती हा खेळ बघत बसे. अशातच तिच्या मनात आपणही हा खेळ खेळू शकतो अशी ईच्छा निर्माण झाली. पण दिवसाला ८० रुपये कमवणाऱ्या वडिलांकडे हॉकी स्टिक घेऊन द्या सांगणे म्हणजे कठीणच होते. तिने त्या अकॅडमीच्या प्रशिक्षकांना विनवण्या केल्या शिकवा म्हणून. पण दरवेळी ते तिला नकार देत असत.
मग तिला कुठून तरी तुटलेली हॉकी स्टिक मिळाली. तिने याच स्टिक आणि घरातल्या कपड्यांमध्ये खेळायला सुरुवात केली. तिचे खेळणे पाहून प्रशिक्षक तिला ट्रेनिंग देण्यासाठी राजी झाला. खऱ्या अडचणी मात्र इथून सुरू झाल्या. तिला घरून स्कर्ट घालण्यास मनाई करण्यात आली. तीने आपल्या आईची कशीबशी समजूत घातली.
अकॅडमीमध्ये प्रत्येक खेळाडूला घरून अर्धा लिटर दुध घेऊन जावे लागत असे. राणी मात्र २०० मिली दूध घेऊन जाऊ शकत होती. मग ती त्यात पाणी मिक्स करून ते पीत असे. अशाही परिस्थितीत तिने चमकदार खेळ दाखवला. तिचा हाच खेळ प्रशिक्षकांच्या मनात भरला. त्यांनी तिला नवी हॉकी किट घेऊन दिली. तसेच इतरही गोष्टींची त्यांनी काळजी घेतली.
शेवटी तिच्या मेहनतीला फळ आले. एकेक पायरी पार करत तिची निवड थेट राष्ट्रिय संघात झाली. २०१७ साली जेव्हा तिने घर घेतले. तेव्हा तिच्या आईवडिलांच्या अश्रूंना बांध फुटला होता. आतातर थेट टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करत तिने आपला हॉकी खेळण्याचा निर्णय किती योग्य होता. हे ढळढळीतपणे सिद्ध केले आहे.




