राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा: जाणून घ्या खेळाडुंना काय मेहनत घ्यावी लागते, स्पर्धा जिकूंन काय फायदे होतात

सध्या देशात सिनीयर नॅशनल रेसलिंग चँपियनशिप होऊ घातलेय. स्पर्धा चालू होतेय १४ नोव्हेंबरला. या स्पर्धेत महाराष्ट्राचे एकूण ३० कुस्तीगीर सामील होणार आहेत.  बोभाटा महाराष्ट्र रेसलिंग चॅम्पियन्स लीगच्या सौजन्याने लेखमालिकांच्या माध्यमातून तुम्हाला या स्पर्धेच्या जगात घेऊन जाणार आहे. या स्पर्धेतल्या रोजच्या घडामोडींवर आमच्या बरोबरीने तुम्हीही नजर ठेवा.. या सर्व खेळाडूंना आपण एकत्रितपणे साथ देऊया.


आज पाहूयात या स्पर्धेच्या तयारीसाठी खेळाडू काय काय करतात आणि ती जिंकण्याचे खेळाडूंना काय काय फायदे होतात ते..

स्पर्धा जितकी मोठी,  तितकंच त्यासाठीचं आव्हान मोठं.  ही स्पर्धा तर देशातली सर्वात मोठी सर्वोच्च मानाची कुस्ती स्पर्धा. साहजिकच या तगड्या आव्हानासाठी  कुस्तीगीरांना  प्रचंड मेहनत  घ्यावी लागते. त्यात सातत्य ठेवावं लागतं. प्रत्येक मॅच खेळाडूला नवीन काही शिकवून जाते. या सगळ्यातून मिळणारी अनुभवाची शिदोरी खूप महत्त्वाची ठरते बरं!! या सगळ्यांबरोबरच महत्त्वाचा असतो तो या स्पर्धेतून  खेळाडूच्या शिरपेचात रोवला जाणारा प्रतिष्ठेचा तुरा!!  वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा ही  खेळाडूंचं आयुष्य घडवते.  त्यांच्या वाटचालीला आकार देते.  त्यांच्या कष्टाचं, तपश्चर्येचं चीज करते. म्हणूनच ही स्पर्धा म्हणजे कुस्तीगिरांच्या मनातला हळवा कोपरा आहे. 

लहानपणी डॉक्टर, इंजिनियर व्हायचं म्हणून आपण मनाची तयारी करत असतो. त्यासाठी अभ्यासात स्वत:ला गुंतवून घेत असतो.  ५वी, १०वी, १२वी अशी सगळी महत्त्वाची वर्षे अभ्यासात गढून जात असतो. तेव्हा हे कुस्तीगीर अभ्यासाच्या बरोबरीने दिवसभराचा सहा तासांचा व्यायाम करत असतात. स्वत:च्या खेळात काय उत्तम आहे, काय कमी पडत आहे हे जाणून घेतात. आपल्या खेळातल्या उणीवा  दूर करण्यासाठीचे उपाय, खुराक यासारख्या आघाड्यांवरही लढत असतात. त्यांच्यासाठी कुस्ती हेच प्रेम आणि  कुस्ती हेच आयुष्य असते. त्यामुळं अंतिम ध्येयही केवळ कुस्तीच अशी भावना ते उराशी बाळगून असतात. आजच्या काळात मोबाईल आणि  कॉम्प्युटरसारख्या गोष्टींपासून दूर राहाणं अत्यंत अवघड आहे. पण हे कुस्तीगीर  आपलं ध्येय गाठण्यासाठी  अशा  सगळ्या प्रलोभनांना वाटेतून हद्दपार करत असतात.  त्यांचं आयुष्य पूर्णपणे कुस्तीलाच वाहिलेलं असतं.  त्यांच्या या सगळ्या त्यागाची, मेहनतीची आणि चिकाटीची परिक्षा होते वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत.  

या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतली कामगिरी आणखी एका कारणासाठी खूप महत्त्वाची आहे.  या खेळाडूंनी दाखवलेल्या कौशल्यावरुन त्यांना सरकारी  नोकरी मिळण्याची शक्यता अधिक वाढते. नावंच सांगायची तर रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे, कुस्तीगीर ज्ञानेश्वर बुचडे, स्टार कुस्तीगीर राहुल आवारे  हे या यादीतले काही खेळाडू. सरकारी नोकरी मिळाल्यावर हे खेळाडू आपल्या विभागाचे प्रतिनिधित्व करतात. नुसती सरकारी नोकरीच नाही तर  ही स्पर्धा जिंकल्यावर या खेळाडूंना भारतीय कुस्ती महासंघाकडून घेण्यात येणार्‍या इंटरनॅशनल स्पर्धांसाठीच्या निवड चाचणीत सहभागी होता येतं. आणि ते आंतरराराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा फडकवण्याच्या त्यांच्या स्वप्नाच्या ते जवळ पोहोचतात. इतकंच नाही, तर  देशातल्या सर्वोच्च क्रीडा पुरस्काराच्या शर्यतीतही कुस्तीगीर या स्पर्धेमुळेच आघाडीवर राहतात.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी लागणारं पंखांमधलं बळ, मानसिक तयारी आणि प्रचंड आत्मविश्वास हे सगळ्यात बहुमोलाचं देणं ही स्पर्धा खेळाडूंच्या पदरात घालते. म्हणूनच तर या स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी खेळाडू आयुष्य वेचत असतात. त्यांच्या याच झपाटलेपणाला, ध्येयासक्तपणाला महाराष्ट्र रेसलिंग चॅम्पियन्स लीग सलाम करते.
पाहिलंत, ही स्पर्धा कुस्तीगीरांच्या दृष्टीनं किती महत्त्वाची असते ते!! म्हणूनच आमचंही लक्ष लागलं आहे ते या स्पर्धेत सामील होणाया आपल्या ३० कुस्तीवीर आणि वीरांगणांवर!! तुम्हीही या स्पर्धा जरूर पाहा आणि या मल्लांना त्यांच्या कामगिरीसाठी तुमच्या बहुमूल्य शुभेच्छा द्या!! 
हा लेख बोभाटा.कॉमने महाराष्ट्र रेसलिंग चॅंपियन्स लीगच्या सौजन्याने प्रकाशित केला आहे. MWCL म्हणजेच महाराष्ट्र रेसलिंग चॅंपियन्स लीग ही मुंबई, कोल्हापूर, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद इथल्या मल्लांची एक कुस्ती लीग स्पर्धा असेल. कुस्तीचं पुनरूज्जीवन आणि या खेळाडूंची २०२०च्या ऑलिंपिक स्पर्धांची तयारी हे या लीगचं उद्दिष्ट आहे.