computer

अनेक सेलेब्रिटी देखील लष्कराचा भाग आहेत. कोण आहेत ते ? आणि त्यांचा लष्कराचा कसा संबंध? चला जाणून घेऊया... .

भारतीय लष्कर हे सुरूवातीपासून आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. भारताच्या आजूबाजूला शत्रू देश टपून बसलेले असताना लष्कर दरवेळेस देशाचे भक्कमपणे रक्षण करताना दिसून येते. एवढेच नव्हेतर देशांतर्गत आपत्तींमध्ये पण लष्कर मोलाची भूमिका बजावत असते. लष्करात भरती होण्यासाठी म्हणूनच देशभर तरुणांमध्ये चढाओढ सुरू असते. तुम्हाला इतर क्षेत्रात टॉपवर दिसणारे अनेक सेलेब्रिटी देखील लष्कराचा भाग आहेत. कोण आहेत ते आणि त्यांचा आणि लष्कराचा कसा संबंध? चला जाणून घेऊया...

१) महेंद्रसिंग धोनी

जगातला बेस्ट कॅप्टन आणि अफलातून मॅच फिनिशर असलेला महेंद्रसिंग धोनी हा चाळीशी ओलांडली तरी अजूनही जबरदस्त फिट आहे. अधूनमधून धोनी जवानांसोबत व्हॉलीबॉल खेळताना, त्याचे लष्करी बूट साफ करताना किंवा लष्करी कॅम्पवर झेंडावंदन करताना दिसतो. या सर्व गोष्टींमागील कारण काहींना माहीत आहे तर काहींना नाही. तर मित्रहो २०११ साली धोनीला भारतीय लष्कराकडून मानद लेफ्टनंट कर्नल ही रँक देण्यात आली आहे. ज्या पद्धतीने एखाद्या संस्थेत मानद अध्यक्ष असतात तसेच हे पद असते. विशेष म्हणजे धोनीचा इतकाच संबंध लष्करासोबत आहे असेही नाही. त्याने ५ पॅराशूट जंपिंग ट्रेनिंग पूर्ण करून पॅराट्रूपर म्हणून मान्यता मिळवली आहे.

२) सचिन तेंडुलकर

सचिनकडे बघून क्रिकेट खेळायला शिकली ती आपली शेवटची पिढी. सचिन हा आपला नेहमीच आवडता राहिलाय यासाठी एक कारण सांगण्याची गरज नाही. तशी हजार कारणे सचिनने तयार करून ठेवली आहेत. क्रिकेटचा हा देव २०१३ साली निवृत्त झाला असला तरी तो कॉमेंट्रीच्या आणि इतर अनेक गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला भेटत असतो. २०१० साली सचिनला भारतीय हवाई दलाकडून ग्रुप कॅप्टनची रँक देण्यात आली होती. अशी रँक मिळवणारा तो पहिला क्रीडापटू ठरला होता. विशेष म्हणजे कुठलेही हवाई प्रशिक्षण नसलेला पहिलाच व्यक्ती या पदावर गेल्याचा बहुमान देखील त्याने पटकावला होता.

३) सचिन पायलट

राजस्थान सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले सचिन पायलट यांचा देखील लष्करासोबत मोठा सबंध आहे. पायलट केंद्रात मंत्री असताना लष्करात रेग्युलर ऑफिसर म्हणून भरती होणारे पहिले मंत्री ठरले होते. यासाठी त्यांनी मेहनत देखील तशी केली होती. सर्व्हिस सिलेक्शन बोर्डची परीक्षा पास करून, मेडिकल टेस्ट पास करून मग लष्करात सेवा देण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले होते. त्यांना लेफ्टनंट ही उपाधी देण्यात आली. पायलट यांचे वडील हे हवाईदलात फायटर पायलट होते तर त्यांचे आजोबा देखील लष्करात होते.

४) अभिनव बिंद्रा

नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यावर ज्या प्रकारचा जल्लोष देशभर झाला तसाच जल्लोष करण्याची संधी २००८ साली अभिनव बिंद्राने देशाला दिली होती. नेमबाजीत सुवर्णपदक जिंकत त्याने इतिहास घडवला होता. १९८० नंतर २८ वर्षांनी देशाला सुवर्णपदक मिळाले होते. त्याच्या याच योगदानाचा गौरव म्हणून २०११ साली त्याला मानद लेफ्टनंट कर्नल म्हणून उपाधी दिली होती.

५) कपिल देव

क्रिकेट जगात भारताला सन्मान मिळवून देण्यात कपिलदेवचे मोठे योगदान आहे. १९८३ चा वर्ल्डकप कोणीही विसरू शकत नाही. भल्याभल्यांना अस्मान दाखवत भारताने हा वर्ल्डकप जिंकला होता. फक्त कॅप्टन म्हणून नाहीतर अनेक धडाकेबाज खेळी करून कपिलदेवने या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. कपिलदेवचा सन्मान म्हणून २००८ साली त्याला लष्कराने मानद लेफ्टनंट कर्नल म्हणून समाविष्ट केले होते.

६) मिल्खा सिंग
फ्लाईंग सिख म्हणून प्रसिद्ध असलेले मिल्खा सिंग यांनी १९५८ साली कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदक जिंकत इतिहास घडवला होता. त्याचप्रमाणे चार वेळेस एशियन गेम्समध्ये पदक जिंकण्याचा त्यांचा विक्रम आहे. मिल्खा सिंग यांनी सुरुवातीला १९५१ साली लष्करात भरती होऊन सेवा दिली होती. त्यांचे हेच योगदान बघता १९५८ साली शिपाईपासून जेसीओ पर्यंत त्यांची बढती करण्यात आली होती.

७) मोहनलाल

साऊथ सिनेसृष्टीत सुपरस्टार असलेला मोहनलाल सध्या संपूर्ण देशात लोकप्रिय आहे. जवळपास ३०० सिनेमांमध्ये काम केलेला मोहनलाल अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे. अनेकांना माहीत नसते पण मोहनलाल हा तायक्वांदो खेळात ब्लॅक बेल्ट आहे. साऊथ सिनेमातील पहिला ब्लॅक बेल्ट म्हणून त्याची ओळख आहे. २०१८ साली लेफ्टनंट कर्नलची मानद उपाधी त्याला देण्यात आली होती.

८) राज्यवर्धन सिंग राठोड

२००४ साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये राठोड यांनी शूटिंगमध्ये रौप्यपदक जिंकले होते. नंतर राजकारणात येऊन राठोड मंत्री झाले. पण त्यांचे मूळ हे लष्करात होते. १९९० ते २००९ या काळात ते सैन्यात होते. कारगिलमध्ये देखील ते लढले होते. लेफ्टनंट, मेजर ते कर्नल असा प्रवास त्यांनी केला आहे.

९) अनुराग ठाकूर

अनुराग ठाकूर हे केंद्र सरकारमधील मंत्री आणि तरुण नेतृत्व म्हणून देशाला माहीत आहे. बीसीसीआयवर देखील त्यांची वर्णी असल्याने क्रिकेटसंबंधित घडामोडीत देखील ते दिसतात. पण या सर्वांसोबत अजून एक गोष्ट म्हणजे त्यांची लष्करात लेफ्टनंट म्हणून नेमणूक झाली होती. खासदार म्हणून काम करताना या पदावर जाणारे ते पहिलेच होते. पुढे त्यांची १२४ सिख रेजिमेंटमध्ये कॅप्टन म्हणून वर्णी लागली होती.

१०) दिपक राव

लष्कराबद्दल आवड असणाऱ्या लोकांना दिपक राव हे नाव माहीत असते. १९९४ पासून तर आजवर त्यांनी २०००० हजार तरुणांना मोफत प्रशिक्षण देऊन सैन्यात भरती होण्यात मदत केली आहे. सैन्य प्रशिक्षण आणि शिस्त यांसारख्या विषयांवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. २०११ साली राव यांची धोनी आणि अभिनव बिंद्रा यांच्यासोबत भारतीय लष्कराचे ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती झाली होती. तसेच त्यांना पॅरा टीए विभागात मानद मेजर म्हणून उपाधी देण्यात आली आहे. त्यांचे लष्करासाठी असलेले योगदान पाहता त्यांचा हा सन्मान योग्यच आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required