आज समजून घेऊ या स्टार्टअप म्हणजे काय ?

स्टार्टअप कंपनी हा शब्द गेल्या दहा वर्षात अनेकदा तुमच्या कानावर पडला असेल.तुमच्यापैकी काहीजण एखाद्या यशस्वी स्टार्टअपचे कर्मचारी असण्याची पण शक्यता आहे.या कंपन्या नक्की काय करतात आणि त्या वेगाने का वाढतात हे समजायचे असेल तर तुमच्या रोजच्या ओळखीतल्या काही कंपन्यांची नावे सांगतो. इन्स्टाग्राम - उबर - पेटीम - झोमॅटो - बायजू - न्याका
ही नावं वाचल्यावर तुम्ही म्हणालच की या तर फार मोठ्ठ्या कंपन्या आहेत. होय अगदी बरोबर पण त्या आता मोठ्या आहेत.एकेकाळी त्या छोट्या स्टार्टअप कंपन्याच होत्या.आता पुन्हा नवा प्रश्न मनात येईल तो असा की सगळ्याच कंपन्या आधी लहान असतात मग त्या कंपन्या आणि स्टार्टअप या दोन्हीत फरक काय ?एकच महत्वाचा फरक म्हणजे या सगळ्या कंपन्या अद्यावत संगणक प्रणालींचा वापर हा या कंपन्यांच्या अस्तित्वाचा कणा असतो. चला तर आज समजून घेऊ या स्टार्टअप म्हणजे काय ?

स्टार्टअप कंपनी म्हणजे एक नवीन,लहान व्यवसाय जो एक नाविन्यपूर्ण उत्पादन किंवा सेवा देण्यासाठी किंवा विशिष्ट बाजारपेठेतील काही समस्या सोडवण्यासाठी सुरु केला जातो.स्टार्टअप्सचा व्यवसाय जलद गतीने वाढण्याची शक्यता गेल्या काही वर्षात दिसून आल्यामुळे गुंतवणूक करणार्या स्टार्टअपमध्ये आर्थिक गुंतवणूक कंपन्यांची संख्या वाढत जाते आहे.
व्यवसायाच्या पहिल्या टप्प्यात स्टार्टअप्स कंपन्या त्यांच्या उत्पादनांची किंवा सेवांची चाचणी करतात,ग्राहकांकडून प्रतिसाद घेतात आणि बाजारपेठेत स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

स्टार्टअप कंपन्यांच्या काही मुख्य गुणधर्म असे आहेत:
१ .नाविन्य (Innovation): स्टार्टअप्स एक नवीन उत्पादन किंवा सेवा आणण्याचा प्रयत्न करतात, किंवा रोजच्या समस्यांवर नव्याने उपाय शोधून काढतात.
२ विस्ताराची क्षमता (Scalability): स्टार्टअप्समध्ये व्यवसाया मोठ्या प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता असते. त्या वाढीचे प्रमाण म्हणजे Scalability
3.जोखीम (Risk): स्टार्टअप्समध्ये सामान्यतःमोठी जोखीम असते कारण त्यांचे मॉडेल्स निश्चित करण्यात वेळ जाऊ शकतो.त्यांना त्यासाठी बाजारपेठेत स्वतःला सिद्ध करावे लागते.काहीवेळा असेही होते की मॉडेल्स निश्चित होताहोताच जुने होते.
४ तंत्रज्ञानाचा वापर (Use of Technology): अनेक स्टार्टअप्स संगण़कीय तंत्रज्ञानावर आधारित असतात आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ते जुन्या व्यवसायातील प्रक्रिया सुलभ करतात किंवा नव्याने बनवतात.
५ संकल्पना (Concept): एक स्पष्ट खात्रीलायक संकल्पना किंवा व्यवसायाचा स्पष्त आणि स्वच्छ दृष्टीकोन ही स्टार्टअपची मुख्य आवश्यक आहे, ज्यामुळे स्टार्टअप्स आपले उद्दिष्ट कमी वेळात साध्य करू शकतील.
६ संघटन (Team):आधुनिक तंत्राशी घट्ट ओळख असणारा आणि उद्दीष्टांसाठी समर्पित कर्मचार्यांची टीम बांधणे महत्वाचे आहे.वेगवेगळ्या कौशल्यांचे अवगतीकरण आणि परस्पर पूरक असणे महत्वाचे असते.
७. गुंतवणुक (Investment)स्टार्टअप्सला त्यांच्या सुरुवातीसाठी वाढीसाठी आणि विकासासाठी भांडवलाची गरज असते, जी साधारणपणे गुंतवणूकदार किंवा वित्तीय संस्थांकडून मिळते.
हे गुणधर्म स्टार्टअप्सना त्यांच्या उद्दिष्टांच्या दिशेने पुढे जाण्यात आणि यशस्वी होण्यात मदत करतात.
हा एक प्राथमिक धडा वाचून झाला असे समजा.पुढच्या लेखात आणखी एक पाऊल आपण पुढे पाऊल टाकूया