computer

स्वतंत्र भारताला राष्ट्रीय कालगणनेचा नव्याने विचार करण्याची गरज आहे.

आज एका कॅलेंडरप्रमाणे नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे.कुठल्या धर्माचं किंवा देशाचं असेल बरं हे दुसरं नूतन वर्ष ?आज कुठे काही समारंभ होताना दिसत नाही, कुठे रोषणाई नाही, कुणी ग्रीटिंग कार्ड पण पाठवली नाही किंवा पोस्ट केली नाही, नाविन्याचा काहीही मागमूस नाही, असं कसं?
हे जाणून घेण्यासाठी थोडं इतिहासात डोकवावं लागेल. 

भारताने १९५७ सालामध्ये अमलात आणलेल्या कॅलेंडरच्या नवीन वर्षाचा आज  पहिला दिवस आहे. २२ मार्च १९५७ हा त्या कालगणनेतील पहिला दिवस होता. नव्या कालगणनेप्रमाणे त्या दिवसाचं बारसं चैत्र १, शके १८७९ असं  करण्यात आलं. 

त्यामागचा घटनाक्रम असा होता. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर स्वदेशी कालगणनेच्या गठनाकरिता मेघनाद साहा या खगोलशास्त्रज्ञाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापण्यात आली.  संपूर्ण भारतात वापरता येईल असं एक शास्त्रशुद्ध आणि अचूक कॅलेंडर बनवण्याचं काम त्यांना सोपवण्यात आलं. त्यावेळी भारतात अनेक पंचांगं प्रचारात होती. भारताचे पहिले पंतप्रधान चाचा नेहरू यांनी त्या समितीच्या १९५५ सालच्या अहवालाच्या प्रस्तावनेत लिहिलं होतं, "उपलब्ध असलेली वेगवेगळी पंचांगं भारतातील पूर्वीच्या राजवटींची प्रतीकं आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र आता कालगणनेमध्ये सुसूत्रता असणं जरुरीचं आहे. नवीन कालगणना शास्त्रीय पद्धतीने होणं ही गरजेचं आहे."

या समितीने कॅलेंडर बनवलेलं कॅलेंडर ग्रेगोरियन कॅलेंडर सारखंच होतं.त्याचं आवरण - त्याचं बाह्यरूप फक्त भारतीय होतं. भारतीय राष्ट्रीय सौर कॅलेंडरमधील महिन्यांची नावं चैत्र, वैशाख, फाल्गुन अशी पंचांगातील महिन्यांप्रमाणे ठरविण्यात आली. प्रत्येक महिन्यातील दिवसही बळेबळेच निश्चित करण्यात आले. त्याप्रमाणे अश्विन ते फाल्गुन या शेवटच्या सहा महिन्यात प्रत्येकी ३०, तर वैशाख ते भाद्रपद या दुसऱ्या ते सहाव्या महिन्यात प्रत्येकी ३१ अशी दिवसांची वाटणी करण्यात आली. लीप वर्षातील जास्तीच्या एक दिवसाची व्यवस्था लावण्यासाठी चैत्र महिन्यात लीप वर्षात ३१ तर इतर वर्षांत ३० दिवस अशी सोय करण्यात आली. 

आता  ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे २०२४ हे लीप वर्ष आहे, त्यामुळे भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरमध्येही लीप दिवस ठेवणं क्रमप्राप्त आहे, त्याप्रमाणे २९ फेब्रुवारी च्या जवळ असलेल्या चैत्र महिन्यात, म्हणजे नवीन वर्षातील - शके १९४६ मधील - चैत्र महिन्यात, ३१ दिवस आहेत.

त्यातील लीप दिवस म्हणजे आज २१ मार्च २०२४, नवीन भारतीय सौर वर्षाच्या सुरुवातीचा दिवस. 

ग्रेगोरियन कॅलेंडरचा खगोलातील घडामोडींशी जवळचा संबंध नाही, तसाच भारतीय सौर कालगणनेचाही ! मात्र त्यातील नवीन वर्षाची सुरुवात ही वसंत विषुवाच्या, म्हणजेच vernal equinox च्या आसपास होते. यावर्षी भारतीय वेळेप्रमाणे vernal equinox ची वेळ होती  २० मार्च रोजी बरोबर ८ वाजून ३६ मिनिटांनी, म्हणजे काल बुधवारी. याचा अर्थ राष्ट्रीय सौर कॅलेंडर vernal equinox शी ताळमेळ ठेवण्यात पण अयशस्वीच आहे. एवढंच नव्हे तर सूर्य, चंद्र व इतर ग्रहगोल यांच्या गतीशी किंवा स्थितीशी हे पंचांग कुठलंच नातं सांगत नाही, या घटनांचा मागोवा घेत नाही. यादिवशी कुठलाच सण साजरा होत नाही, किंबहुना सामान्य भारतीयाला या नवीन वर्षाच्या सुरवातीची किंवा या वर्षाच्या कालगणनेची जाणीवही नसते. या कॅलेंडरमध्ये भारताचा स्वातंत्र्य दिवस श्रावण २४ या तारखेला येतो तर प्रजासत्ताक दिवस माघ ६ या तारखेला येतो, पण १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी याच तारखा जनतेच्या स्मृतीपटलावर असतात. सरकार अधिकृत गॅझेटमध्ये भारतीय सौर तारखा बळेबळेच वापरते आणि आकाशवाणी पण आपल्या कार्यक्रमात त्याचा उल्लेख करते. तेवढीच काय ती या कॅलेंडरमध्ये असलेली धुगधुगी.

भारताच्या स्वातंत्र्याचं प्रतीक असं या कॅलेंडरचं स्वरूप असलं पाहिजे होतं पण बारकाईने बघितलं तर हे कॅलेंडर म्हणजे ग्रेगोरियन कॅलेंडर च्या तंत्राने चालणारं, म्हणजे परतंत्र असलेलं असं एक जुगाड आहे असं लक्षात येतं. महिन्यांमध्ये जबरदस्तीने कोंबलेल्या दिवसांमुळे ते ग्रेगोरियन कॅलेंडर च्या सावलीप्रमाणे पुढं सरकतं, खगोलाशी काहीही नातं ना ठेवता दिवस ढकलतं . 

खरं तर भारतीय परंपरांची माहिती असणाऱ्या प्रत्येकाला याबद्द्ल वाईट वाटलं पाहिजे. हजारो वर्षांपासून भारतवर्षात शास्त्रीय दृष्ट्या उत्कृष्ट आणि खगोलातील घडामोडींशी जवळचं नातं सांगणारी पंचांगं वापरात आहेत. सूर्यसिद्धांत आणि वेदांग ज्योतिष अशी काळाचा वेध घेणारी, सूर्य आणि चंद्र एवढ्याच नाही तर इतर ग्रहांच्याही चालीचा मागोवा घेणारी, सूर्य आणि चंद्र ग्रहणांचा विचार करणारी, अशी उत्तम भविष्यवाचकं उपलब्ध आहेत. त्यांचा वापरही  विनासायास होतो आहे. यापैकी एखाद्या पंचांगाचा अवलंब भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर करिता करता आला असता, अत्याधुनिक उपकरणे आणि संगणक यांच्या साहाय्याने त्यांची अचूकता वाढवता आली असती. दुर्दैवाने असं झालं नाही.

आजच्या भारतीय सौर कॅलेंडरमध्ये पंचांगाच्या सुडौल चालीचा लवलेशही नाही. त्यातील महिन्यांच्या नावाचा उपचारापुरता उपयोग फक्त आहे.  बाकी सगळं आहे ते युरोपच्या कालगणनेचं अंधानुकरण.   

याशिवाय आणखी एक मुद्दा. भारतीय पंचांगं दोन प्रकारे वर्षांची मोजणी करतात - शक संवत आणि विक्रम संवत. शक कालगणना, जी इसवी सनाच्या ७८व्या वर्षांपासून चालू होते, ती साधारणपणे चैत्र महिन्यात चालू होणाऱ्या नवीन वर्षांकरता वापरतात तर विक्रम संवत - जी कालगणना इसवी सनापूर्वी ५७ वर्ष सुरु झाली - त्यातील नवीन वर्ष अश्र्विन महिन्यात बदलतं. भारतीय सौर कॅलेंडर यापैकी शक वर्ष  वापरतं, कारण इसवी सनापूर्वी गणना चालू केली असती तर आपल्या जुन्या मालकाचा अपमान झाला असता ना! असाही प्रवाद मी ऐकला आहे. 

एकूण काय, तर भारतीय सौर कॅलेंडर हे भारतीय स्वातंत्र्याचं प्रतीक असण्याऎवजी भारताच्या गुलामगिरीचे अवशेष जपून ठेवणारं एक साधन आहे असंच म्हणावसं वाटतं. स्वतंत्र भारताला त्याच्या राष्ट्रीय कालगणनेचा नव्याने विचार करण्याची गरज आहे हेच खरं.

-डॉ.प्रकाश परांजपे ( लंडन)

सबस्क्राईब करा

* indicates required