computer

‘मिस्टर बिन’ बद्दल या १० गोष्टी माहित आहेत का ?

‘पोगो’वर पूर्वी एक भन्नाट कॉमेडी सिरीयल लागायची. त्यात एक माणूस वेडे चाळे करायचा. त्याच्याकडे त्याची एक हिरव्या रंगातली कार होती, त्याचा छोटा टेडी होता आणि अंगात असंख्य किडे होते. या सगळ्यांचं मिश्रण असलेली ती सिरीयल आपल्याला हसवून हसवून पार वेडं करायची. एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही कोणाबद्दल बोलतोय. अहो राव, आपले मिस्टर बिन भाऊबद्दल चाललंय हे सगळं.

मंडळी मिस्टर बिन हे पात्र ज्याने त्याच्या अफलातून अभिनयातून जगभर पोहोचवलं तो ‘रॉन अॅट्कीन्सन’ याचा आज वाढदिवस आहे. त्याची ओळख आजही मिस्टर बिन म्हणूनच आहे. त्याच्या लोकप्रियतेबद्दल बोलू तेवढं कमीच.

तर मंडळी, आज मिस्टर बिन उर्फ रॉन अॅट्कीन्सन यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात मिस्टर बिन बद्दल माहित नसलेल्या १० गमतीदार गोष्टी.

१. मिस्टर बिन या पत्राचा जन्म कसा झाला ?

रॉन अॅट्कीन्सन इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असताना कोणी तरी त्यांना ‘ऑक्सफर्ड प्ले हाउस’साठी एक लहान स्कीट लिहायला सांगितलं. त्यांना प्रश्न पडला की आपण तर लेखक नाही मग लिहिणार काय ? विचार करत करत ते आरश्या समोर बसले आणि स्वतःच्या तोंडाकडे बघून जे सुचलं ते त्यांनी कागदावर उतरवलं. इथेच मिस्टर बिन जन्माला आला. म्हणजे मिस्टर बिनचा खरा जन्म हा रॉन अॅट्कीन्सन यांच्या स्वतःच्याच चेहऱ्यात आहे.

२. ‘ब’

मिस्टर बिनच्या तोंडी असलेली सर्व ‘ब’ पासून सुरुवात होणारी वाक्य जास्त विनोदी ठरली कारण खऱ्या आयुष्यात रॉन अॅट्कीन्सन यांना तोतरेपणामुळे ‘ब’ बोलायचा त्रास होतो. त्यामुळेच मिस्टर बिन स्वतःचं नाव बोलताना जास्त विचित्र वाटला.

३. फक्त १४ एपिसोड

इंग्लंड मध्ये १ जानेवारी १९९० साली मिस्टर बिनचा पहिला एपिसोड टेलीकास्ट झाला. यावेळी फक्त १४ एपिसोड बनवण्याचं ठरलं होतं. पण टीव्हीवर आल्या आल्या मिस्टर बिन लोकांमध्ये एवढा प्रसिद्ध झाला की त्याचे आणखी एपिसोड तर बनलेच पण त्यानंतर त्यावर ३ सिनेमे, कार्टून, गेम्स, पुस्तकं असं सगळं तयार झालं. याच श्रेय अर्थात रॉन अॅट्कीन्सन यांचच.

४. २०० देशांमध्ये पोहोचलाय मिस्टर बिन

मिस्टर बिन हा जगभर पोहोचण्यामागे त्याची सायलंट कॉमेडी जास्त जबाबदार आहे. भाषेचं बंधन नसल्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात कोणत्याही माणसाला आवडून जाईल असं हे पत्र होतं. त्यामुळेच आजतागायत २०० देशांमध्ये मिस्टर बिन टेलीकस्ट झाला आहे.

५. मोठ्या माणसातील लहान मुल.

रॉन अॅट्कीन्सन यांनी मिस्टर बिन हे पात्र मोठ्या माणसामधील लहान मुल असल्याचं म्हटलंय. हे खरं देखील आहे. त्याच्यासारखं काम कोणीही मोठा माणूस करूच शकणार नाही.

६. लेखक कम अभिनेता

काही भागांमध्ये एकच माणूस वेगवेगळे पत्र करताना आपण बघितलं असेल. त्यात काही एपिसोड्स मध्ये दिसलेला चेहरा होता रॉबिन ड्रिस्कॉल यांचा. रॉन अॅट्कीन्सन यांच्या बरोबर रॉबिन ड्रिस्कॉल यांनी मिस्टर बिनचे काही एपिसोड लिहिले होते.

७. या माणसाचं आडनाव ‘बिन’ का ?

कार्यक्रमाचे निर्माते या पत्राला भाजांची नावं देणार होते. जसे की ‘मिस्टर कॉलीफ्लॉवर’. पण शेवटी त्यांनी ‘बिन’ हे नाव ठरवलं. बिन चा अर्थ शेंग होतो. विचित्र माणसाला विचित्र नाव साजेसं ठरलं. या नावा शिवाय मिस्टर व्हाईट हे नाव देखील सुचवण्यात आलं होतं.

८. मिस्टर बिनची २५ वर्ष

२०१५ साली मिस्टर बिन २५ वर्षांचा झाला. या निमित्ताने ‘The Funeral’ नावाने एक फ्रेश एपिसोड रिलीज करण्यात आला होता. या एपिसोडच्या निमित्ताने मिस्टर बिन पुन्हा एकदा आपल्याला भेटला.

९. मिस्टर बिनचे कान

‘मिस्टर बिन्स हॉलिडे’ या सिनेमात रॉन अॅट्कीन्सन त्यांचे दोन्ही कान मागे पुढे करताना दिसत आहे. हा सीन बघून कोणालाही वाटेल की हा स्पेशल इफेक्टचा कमाल आहे. पण रॉन अॅट्कीन्सन यांनी हे स्वतः केलं आहे. अंगभूत कला म्हणतात याला.

१०. मिस्टर बिन ऑलम्पिक मध्ये

२०१२ च्या ऑलम्पिकचं यजमानपद लंडनकडे होतं त्यावेळी मिस्टर बिन पात्राला घेऊन एक कार्यक्रम सदर करण्यात आला होता. याच वर्षी रॉन अॅट्कीन्सन यांनी मिस्टर बिनच्या पत्रातून निवृत्त होण्याची घोषणा केली.

 

असा हा मिस्टर बिन आणि त्याला साकारणारा रॉन अॅट्कीन्सन. चार्ली चाप्लीन नंतर सायलंट कॉमेडीच्या जोरावर कोणी खदखदून हसवलं असेल तर तो हाच !!

अश्या या कलंदरला बोभाटाचा मनाचा मुजरा !!

सबस्क्राईब करा

* indicates required