computer

मराठी रंगभूमी गाजवणारी १० अजरामर नाटके !!

मराठी रंगभूमीने अनेक स्थित्यंतरे पाहिली. बालगंधर्वांच्या संगीत नाटकांच्या सुवर्णकाळापासून ते पुढच्या काळातील सिनेमांमुळे आलेल्यां मंदीपर्यंत नाटक बदलत गेलं. सिनेमांच्या वाढत्या प्रभावानंतर मराठी नाटक मरेल अशी समजूत पसरली होती. ‘नाटक कोण बघतंय ?’ असं म्हटलं जात होतं. पण मनोरंजनाची कितीही प्रगत साधनं आली तरी मराठी रंगभूमी आजही तग धरून आहे. फक्त तग धरून नाही तर नवनवीन नाटकांनी ती समृद्ध होतं आहे. नवीन लेखक, नवीन दिग्दर्शक, नवीन कलाकार येत आहेत. आज जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने त्या दहा नाटकांविषयी जाणून घेऊया ज्यांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केलं.

१०. सही रे सही

भरत जाधवच्या अफलातून अभिनयाने भरलेलं हे नाटक आजही रंगभूमी गाजवत आहे. भरत जाधवचा अभिनयाबरोबर केदार शिंदे यांच्या दिग्दर्शनालाही दाद दिली पाहिजे. मराठी रंगभूमीवर आलेलं अश्या प्रकारचं हे पहिलंच नाटक होतं.

९. ऑल दि बेस्ट

अंकुश चौधरी, भरत जाधव आणि संजय नार्वेकर अश्या तिगडीने एकेकाळी हे नाटक गाजवलं होतं. हे नाटक नव्या रूपाने आज रंगभूमीवर परत आलेलं आहे.

८. कट्यार काळजात घुसली

दोन घराण्यातला संघर्ष दाखवणारं कट्यार काळजात घुसली हे नाटक अजरामर ठरलं. या नाटकातील संगीत आजही मराठी माणूस विसरलेला नाही. २०१५ साली नाटकाच्या तोडीचा सिनेमा देखील येऊन गेला.  

७. तो मी नव्हेच !

या नाटकातली प्रभाकर पणशीकर यांची भूमिका प्रचंड गाजली. त्यांच्या खास लहेजातील ‘तो मी नव्हेच’ हा डायलॉग प्रेक्षकांच्या खास लक्षात राहिला.

६. वऱ्हाड निघालंय लंडनला

डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी तयार केलेलं हे नाटक एक वेगळा अनुभव देऊन जातं. म्हणावं तर हा एकपात्री प्रयोग आणि आणि म्हटलं तर हे एक संपूर्ण नाटक आहे. एक वेगळ्या प्रकारचं नाटक म्हणून याकडे नेहमीच बघितलं जाईल.

५. जाणता राजा

बाबसाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं ‘जाणता राजा’ हे नाटक मराठी माणसासाठी खास ठरलं. या नाटकामुळे शिवाजी महाराजांचं चरित्र भव्य स्वरुपात सामान्य माणसापर्यंत पोहोचलं.

४. वाऱ्यावरची वरात

पु. ल. देशपांडे यांनी एकेकाळी गाजवलेलं हे नाटक प्रचंड लोकप्रिय झालं. पुलंच्या नंतर त्यांची भूमिका अनेकांनी वठवली.

३. नटसम्राट

कुसुमाग्रजांच्या समर्थ लेखणीतून तयार झालेलं हे नाटक मराठी रंगभूमीवरील एक मैलाचा दगड ठरलं. नटसम्राट नाटक कलाकारांना नेहमीच आवाहन देणारं ठरलं आहे. या नाटकावर आधारित ‘नटसम्राट’ हा सिनेमा देखील लोकांनी उचलून धरला होता.

२. सखाराम बाईंडर

तेंडूलकरांच्या कलाकृतींमध्ये जे वेगळेपण आहे ते सखाराम बाईंडर मधून ठळकपणे समोर येतं. सर्वसामान्यांची कथा सांगताना ते मानवी स्वभावाचे अनेक पदर उलगडून सांगतात. ‘सखाराम बाईंडर’ रंगभूमीला एक वेगळं वळण देणारं ठरलं.

१. घाशीराम कोतवाल

घाशीराम कोतवाल हे पाहिलं मराठी नाटक आहे जे जागतिक रंगभूमीवर गेलं. या नाटकावरून महाराष्ट्रात वादही पेटले. पण या नाटकाने इतिहास घडवला. पथनाट्य, बालनाट्य की नाटक ? घाशीराम कोतवाल ला नेमकं काय म्हणावं हे अनेकांना ठरवता आलेलं नाही.

 

या १० नाटकांशिवाय आणखी अनेक नाटकांनी रंगभूमी गाजवली पण सगळ्यांची नावे इथे देऊ शकत नसल्याने त्यातील १० ची निवड आम्ही केली आहे. शक्य त्या नाटकांच्या युट्युब वरील लिंक आम्ही देत आहोत. तुम्ही सुद्धा या नाटकांचा आस्वाद घ्या.

सबस्क्राईब करा

* indicates required