computer

आर. डी. बर्मन यांच्याबद्दलच्या या १० गोष्टी तुम्हांला खचितच माहित नसतील..

आज २७ जून. मंडळी, ९० वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी एका महान संगीतकाराचा जन्म झाला होता… हो, तेच ते. आपले लाडके पंचमदा.   म्हणजेच राहुल देव बर्मन! 

आर. डी. बर्मन हे नाव माहीत नसणारा माणूस विरळाच… आपल्या असंख्य सुमधुर गाण्यांनी भारतीय सिनेमाला आणि संगीताला उत्तुंग शिखरावर नेणाऱ्या आर डी बर्मन यांची आज जयंती. आर डी हे जेवढे उत्तम दर्जाच्या चालींविषयी प्रसिद्ध आहेत तेवढेच ते गाण्यांमध्ये केलेल्या निरनिराळ्या प्रयोगांविषयी सुद्धा ओळखले जातात. अनेक वाद्ये प्रथमच भारतीय संगीतात वापरण्यामागे त्यांचेच श्रेय आहे. असं म्हणतात की जगात प्रत्येक सेकंदाला कुठे ना कुठे पंचमदांची गाणी वाजतच असतात. हे भाग्य आणि लोकांचे असे प्रेम फार कमी लोकांच्या वाट्याला येते मंडळी… 

तर आज आपण या अवलिया संगीतकाराच्या जयंतीनिमित्त जाणून घेणार आहोत काही खास गोष्टी ज्या नक्कीच तुमच्यासाठी नवीन असतील… 

आर. डी. प्रथमच पडद्यावर कधी दिसले माहीत आहे? मेहमूदच्या भूतबंगला या सिनेमात! 

 फार कमी लोकांना माहीत असेल की सोलहवाँ साल या सिनेमातल्या ‘है अपना दिल तो आवारा’ या सुप्रसिद्ध गाण्यात वाजतो तो माऊथ ऑर्गन  स्वतः पंचमदांनी वाजवलाय.

एकदा त्यांना पाण्याच्या थेंबांचा टपटप आवाज रेकॉर्ड करायचा होता. तर त्यासाठी भर पावसात ते कित्येक तास घराच्या बाल्कनीत ठाण मांडून बसले होते. त्यांना मनासारखा आवाज जेव्हा मिळाला तेव्हाच ते तिथून उठले असं म्हणतात.

गुरूदत्तच्या प्यासा या सिनेमातले गाजलेले गाणे ‘सर जो तेरा चकराये’ आठवतं ना? या सिनेमाला संगीत होतं पंचमदांचे पिताश्री सचिन देव बर्मन यांचे.  पण या गाण्याची धून मात्र अगदी लहान वयात पंचमदांनी बनवली होती. एसडी बर्मन यांनी तीच धून सिनेमात वापरली. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात ते हेच! 

भारतीय संगीताला अगदीच अपरिचित असणारे वाद्य म्हणजे इलेक्ट्रॉनिक ऑर्गन! हे वाद्य पहिल्यांदा आर. डी. बर्मन यांनी यशस्वीरीत्या वापरले आणि सर्वांना त्या सुरांवर ताल धरायला लावला! मंडळी, कोणत्या गाण्यात माहीत आहे? तिसरी मंजिल मधलं ‘ओ मेरे सोना रे सोना रे’.. 
 

जर वडील दिग्गज संगीतकार म्हणून ओळखले जात असतील, तर त्यांच्या मुलाला संगीताचे शिक्षण देणारे गुरू सुद्धा तितकेच दिग्गज असायला हवेत ना? आर. डी. बर्मन यांना दस्तुरखुद्द पंडित समता प्रसाद यांनी तबला शिकवला आणि उस्ताद अली अकबर खान यांनी सरोद शिकवली. या शिष्याने त्याचे चीज केले असे म्हणायला हरकत नाही.

जेव्हा एखाद्या संगीतकाराच्या कारकिर्दीचा हिशोब केला जातो, तेव्हा त्यांनी किती चित्रपटाला संगीत दिलं हे मोजलं जातं. पण जेव्हा आर. डी. यांचा विषय असतो तेव्हा मात्र इतरांचे रेकॉर्ड बरेच मागे पडलेले दिसतात. तब्बल ३३१ चित्रपटांना आर. डी. बर्मन यांचं संगीत लाभलं आहे… आता बोला! 
 

पंचमदांच्या कारकिर्दीची सुरुवातच मुळात वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासून झाली आहे. त्यांनी प्रथम संगीत दिलेला सिनेमा म्हणजे १९५६ साली आलेला फंटूश. 

वैवाहिक जीवनात मात्र पंचमदांना जास्त यश मिळालं नाही. त्यांचे पहिले लग्न रिता पटेल यांच्यासोबत १९६६ मध्ये झाले. काही दिवसांतच दोघात कुरबुरी सुरू झाल्या आणि १९७१ मध्ये त्याची परिणीती घटस्फोटात झाली. नंतर महान गायिका आशा भोसले यांच्याशी सूर जुळले. १९८० मध्ये दोघांनी लग्नही केले. परंतु काही मतभेदांमुळे दोघे वेगवेगळे राहू लागले. असं असूनही दोघांमध्ये शेवटपर्यंत प्रेम कायम होते. 

१९८८ मध्ये पंचमदांना हार्ट अटॅक आला. त्या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा त्यांनी संगीताची सेवा सोडली नाही. हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या पडल्या त्यांनी काही सिनेमांना संगीत दिलंय. विधु विनोद चोप्रा यांचा परिंदा हे एक उदाहरण! 

मंडळी,  असा हा अवलिया संगीतकार म्हणजे भारतीय सिनेमासृष्टीचा एक अनमोल ठेवा आहे. कित्येक संगीतकार येतील आणि जातील.  मात्र आर. डी. बर्मन यांची जागा कुणीच घेऊ शकणार नाही हे निश्चित आहे. आर. डी. बर्मन हे राजघराण्यातील व्यक्ती असूनही त्यांनी संगीताची जी सेवा केली त्यामुळे स्तिमित व्हायला होतं. त्यांनी अनेक भाषांमध्ये अनेक प्रकारच्या गाण्यांना संगीताचा साज चढवला.  त्यांना तब्बल तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे… 

पण मंडळी, जाता जाता एक मात्र नक्की सांगावसं वाटतं… ही सिनेसृष्टी आहे ना, ही उगवत्या सूर्याला वंदन करणारी आहे आणि मावळत्या सूर्याकडे पाठ फिरवणारी आहे. याची कित्येक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. आर. डी. बर्मन सुद्धा याला अपवाद नाहीत. आयुष्याच्या शेवटी शेवटी त्यांच्यावर अपयशाचा शिक्का मारला गेला. का? कारण त्याचवेळी नवीन संगीतकार उदयास आले म्हणून… बप्पी लाहिरी, अनु मलिक यांनी गाणी लोकांना आवडायला लागली होती.  मंडळी, ज्या नासिर हुसेनने आपल्या कारकिर्दीतला प्रत्येक सिनेमा आर. डी. सोबत केला त्यानेच ‘कयामत से कयामत तक’ हा सिनेमा त्यांना दिला नाही. सुभाष घई यांनी ‘राम लखन’ साठी बोलणी करूनही शेवटी तो लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना दिला. वास्तविक पाहता लक्ष्मी-प्यारे ही जोडी पूर्वी पंचमदांच्याच ऑर्केस्ट्रामध्ये वाद्ये वाजवत असे. असो! मात्र त्यांनी संगीत दिलेला ‘ १९४२- अ लव्ह स्टोरी’ हा सिनेमा आला आणि त्याच्या गाण्यांनी लोकप्रियतेचा कळस गाठला… पण हे पाहायला पंचमदा जिवंत नव्हते! त्यांचा मृत्यू सिनेमा येण्यापूर्वी चार महिने आधी ४ जानेवारी १९९४ मध्ये झाला. 

अश्या या अलौकिक संगीतकाराच्या जयंतीनिमित्त बोभाटाचा मानाचा मुजरा! 

मंडळी, तुमच्या आवडीची आर डी बर्मन यांची गाणी कमेंटबॉक्समध्ये लिहा… बघूया कुठल्या गाण्याला जास्त पसंती आहे.

लेखक- अनुप कुलकर्णी