computer

टपरीवर चहा पिताना शर्टावर चहाचे डाग पडताहेत? मग वाचा हे पाच सोपे उपाय..

काम तुम्ही ऑफिसमध्ये करत असा किंवा फिरतीवर असा.. टपरीवर जाऊन चहा 'मारल्या'शिवाय तरतरी येत नाही. काही 'चहांबाज' तर 'सुवासिनींनी कुकवाला अन मर्दांनी चहाला, नगं म्हनू नै' मोडमध्येच असतात. आता अतिचहा वाईटच. पण आजचा विषय तो नाही. विषय आहे, चहा पिताना शर्टावर त्याचे डाग पडणं कसं टाळावं हा..

आता टपरीवर तुम्ही उभे असता, चहावाला चहा गाळतो आणि  चहाचे ते खास ग्लासेस तुमच्या हाती देतो. बरं, तुम्ही एकटे नसता. मित्रमंडळासोबत काहीतरी चर्चा घडत असतात आणि हा ग्लास हातात आला तरी त्याकडे लक्ष न देता,  गरमागरम चहाचे घुटके घेत ही चर्चा पुढे चालूच राहाते. यात तुमच्या हे लक्षात येतच नाही की गाळताना चहा टपरीवर सांडला होता, तो ग्लासाला खालच्या बाजूने चिकटलाय आणि आता त्याचे थेंब तुमच्या शर्टाच्या तिसऱ्या आणि चौथ्या बटनच्या मधल्या जागेत पडत आहेत. आता हे थेंब एकदोनच असतात, म्हणूनही त्याकडे लक्ष जात नाही. पण शर्टाची वाट लागते ना राव!! त्यात पांढरा शर्ट असला तर मग तर काय विचारुच नका. 

स्रोत
आता आपल्या महान भारतीय संस्कृतीत पुरुष काही कपडे धुवत नाहीत, धुते ती कामवाली, आई नाहीतर बायको किंवा मग वॉशिंग मशीन. कामवालीला काय त्या डागांचं पडलेलं नसतं आणि वॉशिंग मशीन कितीही चांगली म्हटली तरी ती काही सगळे डाग घासून टाकल्याशिवाय काढत नाही, त्यामुळं तुम्ही तो चहाचा डाग  झक्कपैकी पुन्हा  मिरवत तो शर्ट घालता. बायको किंवा आई कपडे धुवत असेल, तर ती बिचारी डिटर्जंट पावडर, साबण, ब्रश, ब्लीच, आणि काय काय करुन तो डाग काढते. म्हणून चहाचे डाग शर्टावर पडू नयेत यासाठीच्या खास पुरुषांसाठीच्या या टीप्स वाचाच.. 

पुरुषांसाठी खास का? कारण  बायका सहसा टपरीवर चहा प्यायला जात नाहीत. आणि जरी गेल्याच, तर त्या आपल्या कपड्यांना इतक्या जपतात, की अंगावर चहाचा एक थेंब सांडू देत नाहीत. म्हणून आजच्या या टीप्स खास पुरुषांसाठीच बरं..

१. पेपरकप सोबत ठेवा.

हा पर्याय दोन प्रकारे वापरता येईल. एक म्हणजे थेट पेपरकपातून चहा प्या.
पण काही लोकांना त्या काचेच्या ग्लासातून चहा पिल्याशिवाय मजा येत नाही. त्यांच्यासाठी मग दुसरा पर्याय..चहावाल्यानं चहा दिला, की तो ग्लास या पेपरकपमध्ये पकडा. त्यामुळं चहाचे थेंब पेपरकप शोषून घेईल, आणि तुमचा छान फॉर्मल शर्ट खराब होणार नाही.

२. स्वत:च आपला पेपरकप बनवा.

रोज कुठे आपला पेपरकप घेऊन जा, तो खिशात ठेवला तर खिसापण फुगेल, असं वाटत असेल, तर साधा एक रद्दीपेपरचा चौकोन सोबत ठेवा. गप्पा मारता मारता फक्त ५ घड्या घातल्या, की आपला कप तय्यार. त्यात तुम्हांला दिवसातून ३-४ वेळा चहा प्यायची सवय असेल, तर तितके चौकोनही सोबत बाळगणं सोप्पंय. या कपचा कागद अगदी वर्तमानपत्राचा साधा कागद असला तरी घड्या घातल्यानं तो अगदी लोळागोळा होत नाही. 

३. मफिन्स कप वापरा

पेपर कप जरा महाग पडतात, अगदी दोन-चार सोबत ठेवावे म्हटलं तरी थोडं अवघडच आहे, आणि स्वत:चा कप बनवायचा म्हटलं तर काही लोकांचा आळशीपणा आड येणं सहज शक्य आहे. अशा लोकांसाठी मफिन केक्ससाठी वपरले जाणारे पेपरचे कप किंवा ज्यांना मफिन मोल्ड्स म्हटलं जातं, ते प्रकरण उपयोगी पडेल. 

४. वेट वाईप्स वापरा

बाजारात ओले वाईप्स मिळतात, किंवा आजकाल काही रेस्टॉरंट्समधून ऑर्डर केली की सोबत ओले टिश्यू पाठवले जातात. डाग पडला, की पटकन ओल्या टिश्यूने पुसून घ्या. 

५. सोबत हातरुमाल बाळगाच

वरचे तीनही उपाय जमत नसतील, तर न चुकता सोबत हातरुमाल ठेवा. पण त्यासाठी पटकन  पाणी मिळायला हवं. शक्य तितक्या लवकर ओल्या रुमालानं डाग पुसून काढा. 

बघा बुवा, तुमच्या कपड्यांना चहाच्या रोजच्या डागांपासून वाचवण्याचे ५ उपाय तर आम्ही सुचवले. आता तुम्ही कोणता पर्याय वापरणार ते आम्हांला सांगा..