computer

रोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??

फुटबॉल शौकिनांसाठी मोठी बातमी आहे. जागतिक फुटबॉलमधील सर्वात लोकप्रिय खेळाडू समजला जाणारा ख्रिस्तीयानो रोनाल्डो त्याचा जुना क्लब असलेल्या मँचेस्टर युनायटेडमध्ये परतला आहे. क्लबने स्वतः ट्विट करत या बातमीवर शिक्कामोर्तब केले. 

तब्बल १२ वर्षांनी त्याचे पुनरागमन मँचेस्टर युनायटेडमध्ये होत आहे. सध्या रोनाल्डो युव्हेंट्स क्लबकडून खेळत होता. या क्लबसोबत मँचेस्टरने तब्बल २१६ कोटी रुपयांची डिल केली आहे. याआधी रोनाल्डो २००३ ते २००९ या काळात मँचेस्टरकडून खेळत होता. 

रोनाल्डोबद्दल वेगळे सांगण्याची गरज नाही. मँचेस्टरमध्ये रोनाल्डो परतला ही सध्याच्या घडीला जगातली मोठी बातमी ठरली आहे. आजवर फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा बॅलेन डी ओर पुरस्कार ५ वेळा जिंकणारा हा खेळाडू आहे. 

युव्हेंट्सने २०१८ ला रोनाल्डोला घेतले तेव्हा त्याचा रियल माद्रिदमधील तुफान अनुभव पाहता आपल्यासाठी पण हा पठ्ठ्या बहूमोलाचा सिद्ध होईल असाच त्यांचा कयास होता. युरोपचे चॅम्पियन होण्याचे आपले २५ वर्ष जुने स्वप्न रोनाल्डो पूर्ण करेल असा त्यांचा विश्वास होता. 

रोनाल्डो सोबत असूनही ते मात्र गेल्या ३ मोसमांमध्ये क्वार्टर फायनलच्या पुढे पण जाऊ शकलेले नाहीत. तरी सुद्धा रोनाल्डो मात्र गोलयादीत टॉपवर होता. युव्हेंट्ससाठी त्याने १३३ सामन्यांमध्ये १०१ गोल केले आहेत. या काळात त्याने या संघाला २ सिरी ए टायटल आणि एक इटालियन कप मिळवून दिला आहे. 

मँचेस्टरने आधीच तगडे खेळाडू घेऊन ठेवले आहेत. त्यात आता रोनाल्डोच्या आगमनाने त्यांची ताकद अधिकच वाढणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required