computer

जीवंतपाणी आख्यायिका बनलेल्या 'ब्रुस ली'बद्दल या २१ गोष्टी माहीत आहेत का?

ब्रूस ली या नावाची वेगळी ओळख ती काय द्यायची? हॉंगकॉंगपासून अमेरिकेपर्यंत ज्या नावाची ख्याती पसरलेली आहे त्या व्यक्तीबद्दलचे कुतूहल थोडेही ओसरलेले नाही. आजही त्याच्या चित्रपटांना तितकीच पसंती दर्शवली जाते. जिवंतपाणी आख्यायिका बनण्याचे भाग्य काही लोकांना लाभते, त्यात ब्रूस लीचादेखील समावेश करावा लागेल. त्याच्या लवचिक हालचाली, शारीरिक मजबूती याला तर तोडच नाही. ब्रूस लीहा मार्शल आर्ट तज्ञ होता आणि त्याने जीत कून दो नावाची स्वतंत्र शैली विकसित केली होती हेही अनेकांना माहीत असेल पण, तुम्हाला ब्रूस लीबद्दलच्या या गोष्टी नक्कीच माहीत नसतील ज्या आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१. ब्रूस ली जर्मन वंशीयही होता

ब्रूस लीचे आजोबा शुद्ध जर्मन कॅथोलिक होते. म्हणजेच ब्रूस ली शुद्ध चीनी वंशाचा नव्हता. यामुळे त्याला सुरुवातीच्या काळात थोडा त्रास सोसावा लागला. त्याच्या या मिश्र वंशीय वास्तवामुळे चीनमधील काही मोठ्या कुंग फु स्कूल्सनी ब्रूस लीला प्रवेश नाकारला होता.

२. सुरुवातीला कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरणाऱ्या मध्ये ब्रूस लीचा ही समावेश

कॉन्टॅक्ट लेन्सेस ही आजकाल एक सामान्य बाब झाली आहे. ब्रूस लीच्या काळात मात्र ही अगदी नवखी गोष्ट होती. तुम्हाला पटणार नाही की शिताफीने हालचाली करणाऱ्या ब्रूस लीला दृष्टीदोष होता. त्याला जवळच्या अंतरावरचे दिसत नव्हते आणि त्यासाठी तो कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत असे. नंतर त्याला हे कॉन्टॅक्ट लेन्सेस त्रासदायक वाटू लागले म्हणून त्याने याचा वापर बंद केला.

३. चा-चा डान्स प्रकारातील नैपुण्य

ब्रूसलीची हाणामारी पाहिलेल्या लोकांना ब्रूस नृत्यातही प्रवीण होता हे ऐकून थोडा धक्काच बसेल. पण हे खरे आहे. हॉंगकॉंगमध्ये चा-चा नावाचा एक नृत्य प्रकार खूप प्रसिद्ध आहे आणि ब्रूसला हा नृत्यप्रकार खूपच आवडत असे. या नृत्यप्रकारच्या मोठ्या स्पर्धा तिथे पार पडत असतात. ब्रूस लीने देखील एकेकाळी या स्पर्धेत नाव गाजवले होते.

४. दररोज ५००० पंचेसचा सराव.

ब्रूस ली च्या चपळ हालचाली पाहून थक्क व्हायला होते ना? त्याच्या या हालचाली, त्याची शारीरिक मजबूती यामागील रहस्य हेच आहे. तो दररोज ५००० वेळा पंच मारण्याचा सराव करत असे.

५. कोला कॅन्स बोटांनी फोडणारा ब्रूस ली

पूर्वीच्या कोला कॅन्स बाटल्या या आजच्या सारख्या पातळ पत्र्यापासून बनवलेल्या नसत. त्यांना उघडण्यासाठी विशेष ओपनरची गरज भासे. ब्रूस ली मात्र मळलेल्या कणकेत बोटे रुतवावीत इतक्या सहजतेने या आपल्या दोन बोटांच्या सहाय्याने पत्र्याच्या कॅनमध्ये छिद्र पडून कोला पीत असे.

६. ब्रूस लीच्या काखेत घर्मग्रंथी नव्हत्या

शारीरिक मेहनत करणाऱ्या लोकांचा घाम तर जातोच. पण आपल्याला घाम येऊच नये म्हणून ब्रूस लीने आपल्या काखेतील घर्मग्रंथी काढल्या होत्या

७. त्याला मुहम्मद अलीशी फाईट करण्याची इच्छा होती.

मुहम्मद अलीबद्दल ब्रूस लीला आकर्षण होते. बॉक्सिंग क्षेत्रात दबदबा असणाऱ्या मोहम्मद अलीशी दोन हात करण्याची त्याची इच्छा होती. अलीचे किक्स, त्याची हालचाल या सगळ्याचे तो कित्येकदा निरीक्षण करत असे. मोहम्मद अलीकडून आपल्याला खूप काही शिकता येईल असे त्याला नेहमी वाटत असे. अर्थात मोहम्मद अलीशी बॉक्सिंग खेळण्याचे त्याचे हे स्वप्न स्वप्नच राहिले.

८. रेखाटनकार

ब्रूस कलाकार होता हे तर सगळ्यांना माहित आहेच, पण ब्रूस कुठकुठल्या कलेत माहीर होता हे मात्र खूप कमी लोकांना माहीत असेल. ब्रूस कुंग फु आणि अभिनयाव्यतिरिक्त स्केचिंगही करायचा. त्याचे पेन्सिल स्केचेसही त्याच्या अभिनयाइतकेच सुंदर आहेत.
 

९. ब्रूसली ची सुरक्षा

एका कुंग फु फायटरला आपल्या संरक्षणासाठी इतर काही हत्यारे बाळगायची गरज काय असे तुम्हाला वाटत असेल. ब्रूस मात्र स्वतःच्या संरक्षणासाठी मॅग्नम पिस्तुल सतत जवळ बाळगायचा.

१०. अफाट ग्रंथ संग्रह

ब्रूसला वाचनाचा व्यासंग होता. त्याच्या स्वतःच्या ग्रंथालयात २००० पेक्षा अधिक पुस्तकांचा संग्रह होता

११. मल्टिटास्किंग

ब्रूस एकाच वेळी अनेक कामे करू शकत असे. पुस्तक वाचत असताना तो टी.व्ही. देखील पहायचा आणि डंबेल्सही उचलायचा. एकाच वेळी इतकी कामे तो अत्यंत सफाईदारपणे करत असे.

१२. ब्रूस ला पोहता येत नव्हते.

इतका चपळ, धाडसी आणि मजबूत शरीरयष्टीच्या ब्रूसला पोहता येत नव्हते हे कदाचित तुम्हाला पटणार नाही, पण हे खरे आहे. त्याला पाण्याची भीती वाटायची, म्हणून तो कधीच पोहायला शिकला नाही.

१३. विसाव्या वर्षी स्वतःचे कुंग फु इन्स्टिट्यूट

१९६१ मध्ये ब्रूस लीला व्यवसाय करण्याचा परवाना मिळाला. यानंतर त्याने स्वतःची मार्शल आर्ट्स शिकवणारी संस्था स्थापन केली. या संस्थेचे नाव होते जंग फान गुंग फु इन्स्टिट्यूट. यावेली ब्रूस ली फक्त वीस वर्षांचा होता. नंतर गुंग फु चे नाव बदलून कुंग फु करण्यात आले.

१४. मार्शल आर्ट्सचे धडे

ब्रूस स्वतः मार्शल आर्ट्सचे धडे द्यायचा. यासाठी त्याने स्वतःची संस्था स्थापन केली होती. ब्रूसकडून मार्शल आर्ट्सचे धडे गिरवण्याची संधी मिळणे कुणालाही भाग्याची गोष्ट वाटेल हे निश्चित. पण तितकीच ती खर्चिक बाबही होती. ब्रूस एका तासाच्या मार्शल आर्ट्स ट्रेनिंग साठी २७५ डॉलर इतकी फी आकारायचा.

१५. कवी

ब्रूसला जसे वाचनाचे वेड होते तसाच त्याला लिहिण्याचा छंद होता. तो स्वतः एक उत्तम कवी होता. त्याचे “द ताओ ऑफ जीत कुणे दो” नावाचे एक पुस्तक प्रसिद्ध आहे. शब्दावर त्याचे चांगलेच प्रभुत्व होते.
 

१६. जॅकी चेनच्या करिअरला चालना दिली.

जॅकी चेनला ब्रूस ली सोबत काम करण्याची संधी मिळाली. इंटर द ड्रॅगन चित्रपटाच्या एका शूट दरम्यान चुकून ब्रूस लीने जॅकी चेनच्या डोक्यावर मार दिला. यामुळे ब्रूसला वाईट वाटले आणि तो अधिकाधिक वेळ जॅकी चॅनसोबत घालवू लागला. आपल्या आवडत्या कलाकारासोबत जॅकीला अधिक वेळ घालवण्याची संधी मिळाली आणि याच चित्रपटानंतर जॅकी चेनच्या करिअरला एक दिशाही मिळाली.

१७. बालकलाकार

ब्रूसने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी तो दहा वर्षांचा होता.
 

१८. अमेरिकन लष्कराने ब्रूस ली ला अनफिट ठरवले होते.

ब्रूस ली ची मजबूत शरीरयष्टी हीच त्याची खरी ओळख. आयुष्यभर ज्याने मेहनतीने ही शरीरयष्टी कमावली त्या ब्रूस लीने १९६३ साली अमेरिकन लष्करात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. लष्कराने घेतलेल्या एक शारीरिक चाचणीत त्याला अनफिट ठरवण्यात आले होते.
 

१९. अनेक हॉलीवूड कलाकारांचा गुरु

ब्रूसली कडून स्टीव्ह मॅकक्वीन, जेम्स कोबर्न, जेम्स गार्नर, रोमन पोलांस्की आणि शारन टेट अशा मोठमोठ्या हॉलीवूड कलाकारांनी मार्शल आर्ट्सचे धडे घेतले

२०. अकाली मृत्यू

वयाच्या ३२ व्या वर्षी २० जुलै, १९७३ रोजी ब्रूस लीचा मृत्यू झाला. अधिकृत रित्या तरी त्याच्या मेंदूला सूज आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा सांगण्यात आले. त्या दिवशी ब्रूस लीचे डोके दुखत होते. त्याची प्रेयसी बेटी टिंग पेय त्याच्या सोबत होती. तिने ब्रूसला पेन किलर दिली. गोळी घेऊन एक झोप काढल्यावर डोके दुखी कमी येईल या अपेक्षेने ब्रूस ली ती गोळी खाऊन झोपला तो कधी उठलाच नाही.
पेनकिलरच्या अलर्जीमुळे असे झाले असावे असा डॉक्टरांनी अंदाज बांधला. पण त्याच्या मृत्यूबद्दल नंतर अनेक तर्क लढवले गेले.
 

२१. मरणोत्तर प्रसिद्धी

इंटर द ड्रॅगन हा ब्रूस लीचा तुफान गाजलेला चित्रपट. जगभरातील थिएटर्समध्ये या चित्रपटाने २० कोटी डॉलर्सचा गल्ला जमवला होता. त्यानंतर मार्शल आर्ट्स वर आधारित चित्रपट बनवण्याची एक लाटच निर्माण झाली. ज्याला ब्रूसप्लोईटेशन म्हणूनही ओळखले गेले.

ब्रूस ली बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा.

सबस्क्राईब करा

* indicates required