computer

अफगाणी तालीबानींपासून भारताला धोका आहे का ?

त्यामुळंच जगभरचे देश अफगाणीस्तान्च्या परिस्थितीकडं सावधपणानं पहात आहेत.चीननं तालिबान सरकारला काही अटींवर मान्यता दिली आहे. अफगाणिस्ताननं चीनच्या आर्थिक हितसंबंधांना धक्का पोचेल असं वागता कामा नये, चीनमधल्या मुसलमानांना उचकवून चीनमधे दहशतवाद पसरवू नये असं चीननं अफगाण सरकारला सांगितलंय. कोणताही देश जगातल्या इतर कुठल्याही देशाशी संबंध ठेवताना स्वतःचं हित पाहात असतो. तालिबान स्त्रियांना बडवत असेल, विरोधकांना गोळ्या घालत असेल तर ते योग्य नाही असं देश म्हणत रहातील, पण अफगाणिस्तानशी व्यवहार करत रहातील. अफगाणिस्ताननं आपल्या देशात काड्या करू नयेत, आपल्या देशाला अफगाणिस्तानातील साधनं आणि मार्केट वापरू द्यावं अशी अपेक्षा प्रत्येक देश बाळगणार आणि अफगाणिस्तानशी संबंध ठेवणार. या परदेश नीतीला कोणी स्वार्थी नीती म्हणेल, कोणी व्यवहारी नीती म्हणेल. पण शेवटी प्रत्येक देश स्वतःचंच हित पहातो हे वास्तव आहे.

अफगाणिस्तानात भारताचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले नाहीत. अफगाणिस्तानशी भारताचा आर्थिक व्यवहार अगदीच किरकोळ आहे. भारताची चिंता येवढीच असेल की अफगाणिस्ताननं, तालिबाननं आपले जिहादी भारतात पाठवू नयेत, काश्मिरात हिंसा उचकवू नये. तालिबान क्रूर आहे, मध्ययुगीन आहे हे खरं आहे. पण तालिबान टोकाचं देशीवादी आहे हेही तितकंच खरं आहे. तालिबानला इस्लाम हवाय आणि शरीयाही हवाय, पण तो इस्लाम आणि शरीया अफगाण असावा असं त्यांना तीव्रपणे वाटतं. म्हणूनच एकेकाळी मुल्ला उमरनं ओसामा बिन लादेनशी पंगा घेतला होता आणि पाकिस्तानशी भांडण घेतलं होतं. पाकिस्तानशी अफगाण पठाणाचे संबंध नेहमीच तणावाचे राहिले आहेत.

तालिबानचं भारताशी वितुष्ट नाही, अफगाण माणूसही भारताबद्दल नेहमीच आपलेपणा बाळगून असतो असाही अनुभव आहे. अफगाण गनिम फाळणीच्या वेळी काश्मिरात हाणामारी करत होते आणि १९९० नंतर अफगाण गनिम काश्मिरात आले होते. हे खरं आहे. पण ते अफगाण मर्सनरी होते, भाडोत्री सैनिक होते. आयएससआयनं, पाकिस्ताननं त्यांना पोसलं होतं, पाठवलं होतं. हेही सत्य आहे.

अफगाणिस्तानशी संबंध ठेवून आपल्याला आर्थिक घबाड मिळण्याची शक्यता नाही. पण अफगाणिस्तानाशी मारामाऱ्या करूनही फायदा होण्याची शक्यता नाही. अफगाणिस्तानातून होणारा त्रास हा पाकिस्तानमुळं उद्भवतो हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अफगाणिस्तान आणि तिथलं तालिबान सरकार या बाबत भारत सरकारनं सावधपणे वागावं, घायकुतीला येऊन वागू नये.

तालिबान ही एक वृत्ती आहे, तालिबान ही एक मनोवृत्ती आहे, तालिबान ही एक संस्कृती आहे. ती मध्ययुगीन आहे. तिच्यात अनेक कालबाह्य आणि क्रूर असे घटक आहेत. अशी वृत्ती समाजात प्रभावी ठरली तर समाजाचं नुकसानच होत असतं. सुखानं जगायचं असेल तर अफगाण समाजाला तालिबानशी लढावं लागेल. तो त्यांचा प्रश्न आहे. बाहेरची माणसं या बाबत त्यांना थोडीफार मदत करू शकतील, पण लढायचं आहे ते अफगाणांनाच.

तालिबानचा विचार करताना आपल्या देशात दहशतवादी मध्ययुगीन विचार आणि संघटना निर्माण होणार नाहीत, प्रभावी ठरणार नाहीत असा विचार आपण करावा. तालिबानी शरीरं भारतात येणार नाहीत याचा बंदोबस्त आपण करावाच, पण त्याच बरोबर तालिबान हा विचार आणि संस्कृती भारतात येणार नाही असा प्रयत्नही आपल्याला करावा लागेल.

सबस्क्राईब करा

* indicates required