इंग्रजांशी कडवी झुंज देणारी, वयाच्या तेराव्या वर्षी नागा जमातीचे नेतृत्व करणारी राणी गाईदिन्ल्यू!!
निळ्याभोर आकाशाशी पाठशिवणीचा खेळ खेळणाऱ्या हिरव्या पर्वतरांगा. या पर्वतरांगाच्या अगदी कड्यावर वसलेले आसाममधले एक गाव हंग्रम!! जेनम, हेमियालोवा अशी छोटी छोटी गावे आजूबाजुला लागून असलेली. धुराच्या लोटांनी डागाळलेली घरे या पर्वतरांगांच्या कुशीत निवांत वसली होती. आपल्या पूर्वापार संस्कृतीवर निष्ठा ठेवून जगणाऱ्या या डोंगरांच्या मुलांना बाहेरची हवा काय असते हे फारसे माहीतही नव्हते. इंग्रजांनी भारतात पाय रोवले आणि ते या डोंगररांगावरही स्वतःचीच सत्ता असल्यासारखे वागू लागले. निसर्गाच्या कुशीत आतापर्यंत निर्धोक जीवन जगलेल्या या नागा जमातीला इंग्रजांची ही अरेरावी अनाकलनीय होती. गेली नऊ वर्षे इंग्रज शिपायांनी विनाकारण या गावांना आणि या जमातीच्या लोकांना आपल्या बंदुकीच्या धाकाने वेठीस धरले होते. कर नाही भरला तर गावातील तरुणांना, मजुरांना धरून नेत होते, त्यांना गुरासारखे मारत होते. त्यांनी धर्मपरिवर्तन केल्यास त्यांची परिस्थिती बदलेल अशी आमिषे दाखवून त्यांना त्यांच्याच संस्कृतीपासून दूर खेचत होते.
हे इंग्रज शिपाई अचानक गावात घुसत गावातील नि:शस्त्र, निष्पाप नागरिकांना मारहाण करत आणि वरून त्यांची पिके आणि घरांना आग लावून जात. अक्षरश: या ब्रिटीश राजवटीत नागा लोकांचे जगणे मुश्कील झाले होते. मणिपूर, आसाम आणि मेघालयच्या परिसरात पसरलेल्या या मुक्तपणे जगणाऱ्या लोकांना इंग्रजांची ही अरेरावी असह्य होत होती. इंग्रजांच्या या अरेरावी विरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांनी हरेका चळवळ सुरु केली. सुरुवातीला फक्त धर्मांतराला विरोध आणि आपल्या नाग संस्कृतीशी एकनिष्ठ राहण्याच्या प्रेरणेतून सुरू झालेली ही चळवळ नंतर संपूर्ण ब्रिटिश विरोधी चळवळीत प्रवर्तित झाली.
या हरेका चळवळीचे प्रणेते होते हायपोऊ जादोनांग. हायपोऊ यांनी ब्रिटिश मिशनऱ्यांविरोधात आवाज उठवला. आपल्या नागा संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचा चंग बांधला. याचवेळी त्यांची तेरा वर्षाची पुतणी आपल्या काकाच्या या चळवळीने प्रभावित झाली आणि ती देखील आपल्या काकासोबत या चळवळीत दाखल झाली. संपूर्ण नागा समाज या तेरा वर्षाच्या मुलीकडे आशेने पाहत होता, तिचे नेतृत्व मान्य करून तिचा शब्द झेलत होता. अवघ्या तेराव्या वर्षात नागा जमातीची सर्वोच्च नेतृत्वस्थानी विराजमान होणाऱ्या या मुलीचे नाव होते राणी गाईदिन्ल्यू .
राणी गाईदिन्ल्यूचा जन्म २६ जानेवरी १९१५ रोजी मणिपूरमधल्या नुंगकावो या गावात झाला. कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता पारंपरिक नागा संस्कृतीत वाढलेल्या राणीला आपल्या संस्कृतीविषयी अफाट आदर होता. "आपण निसर्गत: मुक्त वावरणारे लोक आहोत, या गोऱ्या लोकांना आमच्यावर हुकुमत गाजवण्याचा काही एक अधिकार नाही. त्यांच्या कुठल्याही गोष्टीला दुजोरा देऊ नका, त्यांना तुमच्यावर अधिकार जागवण्याची मुभा देऊ नका, शेतसारा आणि इतर करही भरू नका. ब्रिटिशांशी संपूर्ण विद्रोह करून आपण आपले वेगळेपण जपले पाहिजे. आपली संस्कृती हीच आपली ओळख आणि आपली ओळख म्हणजेच आपले अस्तित्व". अवघ्या तेरा वर्षाची राणी जेव्हा बोलत असे तेव्हा तिच्या मुखातून प्राचीन नागा देवीच आपल्याला संदेश देतेय की काय असे अनेकांना वाटत असे. तिच्यात ते आपली देवता पाहात असत आणि म्हणूनच राणीच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द म्हणजे आपल्यासाठी देवाज्ञा आहे अशा कल्पनेने लोक तो झेलत असत. शेतसारा आणि कर गोळा करायला येणाऱ्या इंग्रज सैनिकांच्या तुकडीविरुद्ध लढण्यासाठी गावागावात तरुणांनी लढाऊ टोळी तयार केली होती. गनिमी कावा वापरून ही टोळी इंग्रज शिपायांना जेरीस आणत होती. मणिपूरच्या या डोंगराळ भागातील लोकांविषयी इंग्रज शिपायांना आता चांगलीच भीती वाटू लागली होती.
या लोकांना आपल्या विरुद्ध भडकवून लढण्यास प्रवृत्त करणारी आणि त्यांचे नेतृत्व करणारी राणी गाईदिन्ल्यू म्हणजे अवघ्या तेरा वर्षांची कोवळी पोर आहे हे ऐकून तर इंग्रज अधिकाऱ्यांवर शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली. काहीही करून या राणीला आपण जेरबंद केलेच पाहिजे असा चंग बांधून इंग्रजांनी तिची शोधाशोध सुरु केली. मणिपूर मधील प्रत्येक गावात जाऊन ते गाईदिन्ल्यू नावाच्या मुलीची कसून तपासणी करू लागले. हकेरा चळवळीचे प्रणेते हायपोऊ जादोनांग यांना अटक करून इंग्रजांनी त्यांच्याविरोधात खटला भरला. १९३१ मध्ये इंग्रजांनी त्यांना फासावर लटकवले.
राणीचा मोठा आधार आता हरवला होता. पण सामान्य नाग लोकांनी तिची साथ सोडली नव्हती. तिने तयार केलेल्या लढाऊ तुकड्या इंग्रजांना नामोहरम करत होत्या. १६ फेब्रुवारी १९३२ ते १८ मार्च १९३२ या एका महिन्याच्या कालावधीत हंग्रम येथे या टोळ्यांनी इंग्रजांशी मोठी लढाई केली होती. या लढाईला इतिहासात हंग्रमची लढाई म्हणून ओळखले जाते. इंग्रज आपल्यालाही कधी ना कधी पकडतीलच याची खात्री असलेली गैदिन्ल्यू आता भूमिगत राहू लागली. एका गावातून दुसऱ्या गावात आणि एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी तिने भुयारी रस्त्यांचा वापर केला. कोणत्याही परिस्थितीत इंग्रजांना शरण जायचे नाही हे तर पक्के होतेच, पण आपल्या लोकांमध्ये त्यांच्या संस्कृतीविषयी अभिमान निर्माण करण्याचे कामही तिने थांबवले नाही.
तिला पकडण्यासाठी इंग्रजांनी तिची माहिती देणाऱ्याला ५०० रुपयांचे बक्षीस आणि त्या संपूर्ण गावाचा शेतसारा एका वर्षासाठी माफ करण्याचे जाहीर केले. तरीही गाईदिन्ल्यूबद्दल कुणीही काहीही माहिती दिली नाही. गैदिन्ल्यूच्या वाढत्या प्रभावाने इंग्रजांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. तिला पकडण्यासाठी इंग्रजांनी खास आसामी रायफल बटालियन तैनात केली. कॅप्टन मॅकडोनाल्ड या बटालियनचे नेतृत्व करत होता. शेवटी त्याच्या गुप्तहेरांनी राणी आपल्या साथीदारासह पुलोमी शहरात लपून बसल्याची बातमी दिली. राणी आणि तिच्यासोबतच्या बंडखोरांना पकडण्यासाठी कॅप्टन मॅकडोनाल्डची ही तुकडी पोलोमीमध्ये पोहोचली. आपण सुरक्षित आहोत या भावनेने गाफील असलेली राणी अखेर इंग्रजांच्या हाताला लागलीच.
१७ ओक्टोंबर १९३२ रोजी इंग्रजांनी राणीला अटक करून तिला कोहिमापर्यंत चालवत आणले. तिथून तिच्यावर खटला चालवण्यासाठी इंफाळला नेले. इंफाळ न्यायालयात तिला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तिच्या अनेक साथीदारांनाही अशीच शिक्षा दिली गेली, तर काहींना फासावर लटकवण्यात आले.
तिच्या अटकेची बातमी ऐकून १९३७ साली पंडित जवाहरलाल नेहरू तिला तुरुंगात भेटायला गेले. तिच्या सुटकेसाठी प्रयत्न करू असे आश्वासनही दिले. तिच्या कर्तृत्वाची ओळख करून देणारा एक लेखही त्यांनी हिंदुस्तान टाइम्समधून लिहिला. तिला डोंगराची राणी ही पदवी नेहरूंनीच बहाल केली. "भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील या राणीचे योगदान येणाऱ्या पिढ्या कधीच विसरू शकणार नाहीत. कोवळ्या वयात देशासाठी तुरुंगवास भोगणाऱ्या या राणीने देशातील तमाम बालक्रांतीकारकांना आणि स्वातंत्र्यवीरांना प्रेरणा दिली आहे", अशा शब्दात नेहरूंनी तिच्यावर स्तुतिसुमने उधळली. नेहरूंनी तिच्या सुटकेसाठी इंग्रज अधिकाऱ्यांना विनवणी केली पण त्यांना विशेष यश मिळाले नाही. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत राणी गाईदिन्ल्यू मणिपूर आणि आसामच्या वेगवेगळ्या तुरुंगात बंदी होऊन राहिली.
१९३२ ते १९४७ तब्बल पंधरा वर्षे राणीने देशासाठी तुरुंगवास भोगला. स्वातंत्र्यानंतर तिने आपल्या झेलीयानग्रोंग जमातीच्या लोकांच्या उद्धारासाठी आपले आयुष्य वेचण्याचे ठरवले. इतर नागा जमातीचे नेते भारतापासून अलिप्त होण्याची भाषा बोलत असताना राणी गैदिन्ल्यूने मात्र अखंड भारताच्या कल्पनेला पाठींबा दिला. त्यामुळे तिला नागा जमातीच्या इतर नेत्यांचा रोष पत्करावा लागला. काही नागा लोकांनी इंग्रजांच्या अरेरावीला दबून धर्मांतर केले होते. त्यांनी पुन्हा आपली संस्कृती स्वीकारावी म्हणून गैदिन्ल्यूने त्यांना आवाहन केले. यावरून ती ख्रिश्चन विरोधी असल्याचा कांगावा करून तिला मारण्याचेही प्रयत्न करण्यात आले. नागा जमातीकडून आपल्या जीविताला धोका असल्याचे ओळखून काही काळ राणी गाईदिन्ल्यूने पुन्हा एकदा अज्ञातवासात जाण्याचा निर्णय घेतला.
स्वातंत्र्य चळवळीतील तिचे योगदान आणि नागा जमातीच्या उद्धारासाठी विशेषत: तिच्या झेलीयानग्रोंग जमातीच्या लोकांसाठी तिने जे काही काम केले त्याची दखल घेत सरकारने तिला विविध पुरस्कारांनी सन्मानित केले. १९७२ साली तिला ताम्रपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. १९८२ साली भारत सरकारने तिला पद्मभूषण देऊन तिचा गौरव केला. याशिवाय बिरसा मुंडा पुरस्कार, विवेकानंद सेवा पुरस्कार असे अनेक पुरस्कार नंतर तिला मिळाले.
१९९६ मध्ये भारत सरकारने तिच्या स्मरणार्थ एक पोस्ट तिकिट काढले होते. २०१५ साली तिची प्रतिमा असलेले एक नाणे देखील चलनात आणले गेले. तामेंगलॉंग जिल्ह्यातील स्त्रियांना व्यवसायात येण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून कित्येक कोटी रुपये खर्च करून सरकारने राणी गाईदिन्ल्यू महिला मार्केट नावाने एक बाजारसमिती उभी केली आहे. अजूनही या बाजारसमितीचे कामकाज मात्र ठप्प आहे.
१७ फेब्रुवारी १९९३ रोजी वयाच्या ७८व्या वर्षी राणी गैदिन्ल्यूने अखेरचा श्वास घेतला. भारतातील विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण जमातींचे हक्क आणि अधिकार अबाधित राहतील याची खबरदारी घेणे हीच तिच्यासाठी योग्य श्रद्धांजली ठरेल. वयाची चौदा वर्षे तुरुंगात घालवणारी राणी गाईदिन्ल्यू ही एकमेव महिला स्वतंत्र सेनानी आहे, तिच्या या असीम त्यागाबद्दल आजही अखंड भारत तिच्या ऋणात राहील.
देशासाठी आपल्या तारुण्याची समिधा देणारी राणी गाईदिन्ल्यू म्हणजे भारताच्या शिरपेचातील एक मानाचा तुरा आहे.
लेखिका: मेघश्री श्रेष्ठी




