जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..

भारतीय संघाचा दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेच्या (Anil Kumble) नावे अनेक मोठ मोठ्या विक्रमांची नोंद आहे. कसोटी क्रिकेटच्या एकाच डावात १० गडी बाद करणारा तो दुसरा गोलंदाज आहे. अनेक दिग्गज फलंदाजांना त्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आहे. फिरकी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला अनिल कुंबळे एक उत्तम फलंदाज देखील होता, हे त्याने १५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (On This Day) (१० ऑगस्ट) दाखवून दिले होते.

अनिल कुंबळेच्या नावे फलंदाजी करताना ५ अर्धशतके आणि एका शतकाची नोंद आहे. हे शतक त्याने इंग्लंडविरुद्ध खेळताना इंग्लंडमध्येच झळकावले होते. द ओवलच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ६६४ धावा केल्या होत्या.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी केली होती अविश्वसनीय खेळी..

हा सामना ९ ऑगस्ट २००७ रोजी पार पडला होता. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार राहुल द्रविडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या दिवसाच्या शेवटी भारतीय संघाने ३m४ गडी बाद ३१६ धावा केल्या होत्या. सचिन तेंडुलकर ४८ तर वीवीएस लक्ष्मण २० धावांवर नाबाद होते. सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय संघाला मोठा धक्का बसला, वीवीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर बाद होऊन माघारी परतला. लक्ष्मणने ५१ तर सचिनने ८२ धावा केल्या होत्या.

हे दोघेही फलंदाज बाद झाल्यानंतर अनिल कुंबळे आणि एमएस धोनी यांनी महत्वपूर्ण भागीदारी केली. धोनी ९२ धावा बाद करत माघारी परतला. त्यानंतर जहीर खान आणि आरपी सिंग देखील पॅव्हेलियनमध्ये परतले होते. मात्र तो दिवस अनिल कुंबळेचा होता. अनिल कुंबळे शेवटपर्यंत टिकून राहिला. श्रीसंतने त्याला चांगली साथ दिली आणि अनिल कुंबळेने आपले पहिले वहिले शतक पूर्ण केले. श्रीसंत ३५ धावांवर माघारी परतला आणि भारतीय संघाचा डाव संपुष्टात आला. अनिल कुंबळे नाबाद ११० धावांवर माघारी परतला. त्याने या खेळी दरम्यान १९३ चेंडुंचा सामना करत १६ चौकार आणि १ षटकार मारला होता.

हा सामना अनिर्णीत राहिला होता. भारतीय संघाने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने ३४५ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने १८० धावा करत डाव घोषित केला होता. भारतीय संघाने इंग्लंड संघाला विजय मिळवण्यासाठी ५०० धावांचे आव्हान दिले होते. मात्र यजमान इंग्लंड संघाने ६ गडी बाद ३६९ धावा करत हा सामना ड्रॉ केला. अनिल कुंबळेने या सामन्यात सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.

सबस्क्राईब करा

* indicates required