एका रेडिओ संशोधकाला त्यानेच उभारलेल्या उद्योगाने पद्धतशीरपणे नष्ट केलं.

अमेरिकन कंपन्या किती क्रूरपणे एखाद्या माणसाचं आयुष्य संपवून टाकतात हे समजून घ्यायचं असेल तर एडविन हॉवर्ड आर्मस्ट्राँग या शास्त्रज्ञाची दु:खद कथा वाचा.

५ नोव्हेंबर १९३५ -न्यूयॉर्क

एडविन हॉवर्ड आर्मस्ट्राँग रेडिओ इंजिनिअर्सच्या एका कॉन्फरन्समध्ये प्रेझेंटेशन द्यायला उभा होता.

त्यानी सगळ्यांच्या समोर रेडिओ सुरु केला आणि अचानक सभागृह शांत झालं.

काही घडत नव्हतं म्हणून नाही. तर इतिहासात पहिल्यांदाच लोकं खरखर नसलेला रेडिओचा आवाज ऐकत होते.

फक्त शुद्ध, स्फटिकासारखा आवाज. स्पीकरमधून आलेला शब्दन् शब्द असा ऐकू येत होता जसा बोलणारा माणूस समोर उभं राहून बोलतोय्

म्युझिक सुरु झालं आणि रेडिओच्या इतिहासात पहिल्यांदा खरखरीशिवाय स्वरन् स्वर स्पष्ट कानावर पडत होता.

आर्मस्ट्राँगने FM रेडिओचा शोध लावला होता.

****

आता आपण रोजच FM रेडिओचा आवाज ऐकतो पण त्याकाळी FM रेडिओ नव्हतेच. जे रेडिओ होते ते सगळे AM रेडिओ होते.

आता ही कथा पुढे वाचण्यापूर्वी FM आणि AM या दोन्हीतला फरक समजावून घेऊ या.

AM म्हणजे (Amplitude Modulation):या प्रकारच्या रेडिओच्या तरंगात ध्वनी लहरींची रुंदी आवाजाच्या निर्मितीसाठी वापरली जाते.या लहरी लांबवर प्रवास करू शकतात पण खरखर फार मोठ्या प्रमाणात निर्माण होते.

FM (Frequency Modulation) : या प्रकारच्या रेडिओच्या तरंगात ध्वनी लहरींची वारंवारीता आवाजाच्या निर्मितीसाठी वापरली जाते.या लहरी AM च्या तुलनेत कमी अंतरावर प्रवास करतात पण त्यात खखर किंवा कोणत्याही प्रकारचा व्यत्यय नसतो.

****

ज्या दिवशी आर्मस्ट्राँगने FM रेडिओचा शोध लावला त्यादिवशी रेडिओच्या आवाजातली खखर आणि व्यत्यय संपले पण त्याच दिवशी अमेरिकेतील्या सर्व रेडिओ कंपन्या कालबाह्य झाल्या.हा FM रेडिओचा विजय आणि AM रेडिओचा अंत होता.त्याहूनही महत्वाचं होतं ते असं की आर्मस्ट्राँग काही हौशी संशोधक नव्हता.

तो आधीच रेडिओ इतिहासातील सर्वात महत्त्वाचा संशोधक होता.१९१२ मध्ये त्याने रेजेनेरेटिव्ह सर्किट शोधलं — ज्यामुळे रेडिओ रिसिव्हर प्रत्यक्ष वापरण्यास योग्य झाले.१९१८ मध्ये त्याने सुपरहेटरोडाइन रिसिव्हर तयार केला — जो आजही जवळजवळ प्रत्येक रेडिओ आणि टीव्हीचा पाया आहे.

पण आर्मस्ट्राँगचा FM रेडिओचा शोध म्हणजे अमेरिकन रेडिओवर नियंत्रण ठेवणाऱ्या AT&T, वेस्टिंगहाऊस, आणि विशेषतः RCA कंपन्यांसाठी धोक्याची घंटा होती.त्यांनी AM रेडिओच्या पायाभूत सुविधांमध्ये कोट्यवधी गुंतवले होते. त्यांच्याकडे पेटंट्स, स्टेशनं, उपकरणनिर्माते होते. FMने हे सगळंच धोक्यात आणलं.

आणि हे परवाना घेऊन किंवा चोरून चालणार नव्हतं. FM मूलभूतपणे वेगळं होतं, श्रेष्ठ होतं आणि त्यांच्या साम्राज्याला संपवण्याच्या तयारीत होतं

आता एकच उपाय होता आर्मस्ट्राँग मोठा होण्यापूर्वीच त्याला संपवून टाकणं - त्याला उद्ध्वस्त करणं !

****

या दरम्यान आर्मस्ट्राँगने स्वतःचं FM स्टेशन नेटवर्क उभारलं — ४२ ते ५० MHz या फ्रिक्वेन्सीवर.

ते अप्रतिम चाललं. FM स्टेशनं देशभर उभी राहू लागली. आर्मस्ट्राँगने कल्पना केलेलं भविष्य प्रत्यक्षात येत होतं. पण १९४५ मध्ये, कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांनी FCC म्हणजे Federal Communications Commission वर कॉर्पोरेट दबाव टाकला. या दबावाखाली FCCने निर्णय घेतला: FM रेडिओला नव्या रेंजमध्ये — ८८ ते १०८ MHz या पट्ट्यात हलवलंबघायला गेलं तर कागदावर तो तांत्रिक बदल होता.प्रत्यक्षात तो विध्वंस होता.आर्मस्ट्राँग आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तयार केलेले प्रत्येक FM रिसिव्हर एका रात्रीत निरुपयोगी झाले. प्रत्येक स्टेशनला पुन्हा नव्याने उभारावं लागलं. वर्षानुवर्षांची गुंतवणूक, हजारो रेडिओ, संपूर्ण नेटवर्क — एका नियामकांच्याएका पेनच्या फटकाऱ्याने नष्ट झालं.

****

FCCने म्हणजे आयोगाने FM स्टेशनांना मर्यादित केलं — त्यामुळे त्यांची पोहोच AM च्या तुलनेत संपली आणि मग आले खटले — अंतहीन, थकवणारे पेटंट वाद. फक्त आर्मस्ट्राँगची संपत्ती, ऊर्जा आणि इच्छाशक्ती संपवण्यासाठी.

आर्मस्ट्राँग वर्षानुवर्षे तो लढला. त्याने आपली सगळी संपत्ती वकिलांच्या फीमध्ये खर्च केली.

त्याचं आरोग्य खालावलं. त्याचं वैवाहिक जीवन संपत आलं

एका रेडिओ संशोधकाला त्यानेच उभारलेल्या उद्योगाने पद्धतशीरपणे नष्ट केलं.

****

३१ जानेवारी १९५४ च्या सकाळी,एडविन हॉवर्ड आर्मस्ट्राँगने आपला ओव्हरकोट, टोपी आणि हातमोजे घातले.

त्याने पत्नी मॅरियनसाठी एक चिठ्ठी लिहिली. मग त्याने आपल्या १३व्या मजल्यावरील मॅनहॅटन अपार्टमेंटच्या खिडकीतून वयाच्या ६३ व्या उडी मारून आयुष्य संपवून टाकलं. ...

****

एडविन हॉवर्ड आर्मस्ट्राँग संपला पण त्याचं तंत्रज्ञान FM जिंकलं . आज जवळजवळ प्रत्येक रेडिओ स्टेशन FMवर प्रसारित होतं.

जेव्हा तुम्ही संगीत ऐकता-जेव्हा आवाज स्वच्छ ऐकू येतो. जेव्हा तुम्ही ९९.५ किंवा १०७.९ वर गाणी ऐकता ते आर्मस्ट्राँगचं देणं आहे.

****

सबस्क्राईब करा

* indicates required