computer

चाळीशी पार केल्यावर 'बोन डेन्सीटी' टेस्ट करण्याची वेळ का येते ?

तुमचं आयुष्य चाळीशीच्या उंबरठ्यावर आहे का? असेल तर तुम्हाला यापुढे जास्त सावध राहायला हवं. चाळीशीचा काळ हा संक्रमणाचा असतो. माणसं या वयात येईस्तोवर करिअरच्या टप्प्यावर स्थिरावतात, आर्थिक स्थैर्यही येतं. त्याचबरोबर हे वय आरोग्यविषयक समस्यांची लक्षणं दाखवायला सुरुवात करतं. थोडक्यात इतके दिवस दात मजबूत असले तरी चणे नसतात आणि आता चणे भरपूर असतील तरी दात शाबूत राहिलेले नसतात. याच काळात वार्षिक वैद्यकीय तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. बीपी, शुगर, कोलेस्टेरॉल चेक केलं जातं, एक्स रे - सोनोग्राफीच्या माध्यमातून शरीरातल्या विविध इंद्रियांची खबरबात घेतली जाते. इतरही अनेक बारीकसारीक चाचण्या केल्या जातात. बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट(बीएमडी) किंवा हाडे घनता चाचणी ही अशीच एक टेस्ट. ही चाचणी सहसा तरुण वयापेक्षा चाळीशी किंवा नंतरच केली जाते कारण वयोमानापरत्वे हाडे ठिसूळ आणि कमकुवत होत जातात. बीएमडीमुळे हाडं कितपत निरोगी आहेत हे समजतं.

जसजसं वय वाढत जातं तसतशी हाडांची नैसर्गिकरित्या झीज होऊ लागते. त्यामुळे ती कमकुवत व ठिसूळ होऊ लागतात. अयोग्य आहार आणि जीवनशैली यांमुळे ही हाडं ठिसूळ होण्याचा वेग वाढतो. हाडं ठिसूळ होण्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. या शब्दाचा अर्थ आहे पोरस बोन, म्हणजेच पोकळ आणि ठिसूळ झालेली हाडं. अशी हाडं ठिसूळ असल्याने सहज मोडू शकतात. अशा माणसांना साधं पडलं तरी फ्रॅक्चर होत. मात्र जोवर फ्रॅक्चर होत नाही किंवा बीएमडी केली जात नाही तोपर्यंत हा विकार कोणतीही लक्षणं दाखवत नाही. यामुळे हा सायलेंट डिसीज या प्रकारात मोडतो

बीएमडी ही अशी एकमेव टेस्ट आहे जी हाडं मोडण्याअगोदर ओस्टियोपोरोसिसचे निदान करू शकते. ही चाचणी आपल्या हाडाची घनता आणि हाडं मोडण्याची शक्यता ठरविण्यास मदत करते.

कशी होते ही चाचणी?

बीएमडीमध्ये हाडांचा एक्स रे काढला जातो. एक्स रे मधून हाडं किती जाड आणि घन आहेत, हाडांच्या विशिष्ट भागात किती प्रमाणात कॅल्शियम आणि इतर खनिजं आहेत हे समजतं. खनिजांचं प्रमाण जास्त असेल तर ती हाडं सशक्त असतात आणि ती मोडण्याची शक्यता कमी असते. ही वेदनारहित चाचणी साधारण १० मिनिटात पूर्ण होते.
 

या चाचणीचे दोन प्रकार आहेत.

१. सेंट्रल डीएक्सए : यात पाठीचा कणा आणि खुब्याच्या हाडांची तपासणी केली जाते. चाचणीदरम्यान रुग्णाला टेबलावर उताणं झोपवतात. रुग्णाच्या शरीरावरून एक मशीनचा दांडा फिरवला जातो. हा दांडा शरीरात कमी तीव्रतेचे क्ष-किरण (एक्स रेज) सोडतो. हाडांमधून गेल्यावर हे किरण किती प्रमाणात बदलतात यावरून चाचणीचे निष्कर्ष ठरवता येतात.
२. पेरिफेरल टेस्ट : यात मनगट, बोटं, टाचा अशा परिघीय अवयवांच्या हाडांची घनता मोजली जाते. ही चाचणी सेंट्रल डीएक्सएइतकी अचूक नसते. पण ही तुलनेने स्वस्त असते.
 

चाचणीआधी काही गोष्टी लक्षात घ्या.

१. चाचणीआधी २४ तास कॅल्शियम सप्लीमेंट्स घेऊ नका.
२. जर तुम्ही सिटी स्कॅन किंवा एमआरआयसाठी बेरियम किंवा कॉन्ट्रास्ट डायचं इंजेक्शन घेतलं असेल तर सेंट्रल डेक्सएसाठी सात दिवस थांबा.
३. धातूचे बेल्ट्स, झिपर्स किंवा बटन्स असलेले कपडे चाचणीच्या वेळी घालू नका.

बीएमडी कुणी करावी?

तुम्ही पुढीलपैकी कोणत्याही गटात असाल तर ही चाचणी करून घेतलेली चांगली.
- ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिला
- मेनोपॉज आलेल्या आणि पन्नाशीपुढील महिला
- मेनोपॉजच्या वयातल्या आणि हाडं मोडण्याची जास्त शक्यता असलेल्या महिला (खेळाडू, व्यायामशिक्षिका इ.)
- ५० पेक्षा जास्त वयाचे आणि हाडं मोडण्याची जास्त शक्यता असलेले पुरुष
- पन्नाशीनंतर हाड मोडलेले पुरुष
- शरीराची पूर्ण वाढ झाल्यावर उंची कमी झाल्यास (दीड इंचापेक्षा जास्त)
- पाठीला जास्त प्रमाणात पोक आल्यास
- काहीही कारण नसताना पाठ दुखणारे रुग्ण
- प्रेग्नन्सी किंवा मेनोपॉज नसतानाही मासिक पाळी बंद किंवा अनियमित झालेल्या महिला
- ऑर्गन ट्रान्सप्लांट झालेले रुग्ण
- हॉर्मोन्सच्या पातळीत घट झालेले रुग्ण

टी-स्कोअरचा वापर करून आपल्या हाडं घनता चाचणीचे परिणाम नोंदवले जातात. ३० वर्षांच्या प्रौढ व्यक्तीच्या हाडांच्या घनतेपेक्षा आपल्या हाडांची घनता किती जास्त किंवा कमी आहे हे टी-स्कोअर दाखवतो.
-१.० किंवा त्यावरील टी-स्कोअर म्हणजे हाडे घनता सामान्य असणं.
-१.० आणि -२.५ मधील टी-स्कोअर म्हणजे हाडांची घनता कमी असणं किंवा ऑस्टियोपेनिया.
-२.५ किंवा त्यापेक्षा कमी टी-स्कोअर म्हणजे ऑस्टियोपोरोसिस.

टी-स्कोअरप्रमाणेच अजून एक प्रमाण आहे, ते म्हणजे झेड स्कोअर. या चाचणीने हाडांचं वस्तुमान (बोन मास) मोजलं जातं. झेड स्कोअर -२.० पेक्षा कमी आल्यास त्याचा अर्थ तुमच्याच वयाच्या सुदृढ व्यक्तीच्या तुलनेत तुमच्या हाडांचं वस्तुमान कमी झालेलं आहे.

बीएमडी किती वेळा करावी?

ऑस्टियोपोरोसिस औषधं घेत असल्यास एक ते दोन वर्षांतून एकदा ही चाचणी करून घ्यावी. मेनोपॉजनंतर जरी ऑस्टियोपोरोसिस नसेल तरी दोन वर्षांतून एकदा ही चाचणी केलेली चांगली.

निरोगी आरोग्य ही सुद्धा एक संपत्तीच आहे. ती नीटपणे जोपासण्यासाठी आपणच आपल्या आणि आपल्या सुहृदांच्या आरोग्यासाठी अशा महत्त्वाच्या चाचण्या योग्यवेळी करायला हव्यात. अर्थात डॉक्टरांचा सल्ला त्यासाठी हवाच.

सबस्क्राईब करा

* indicates required