computer

एक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मनी सध्याच्या काळात लोकांना मनोरंजनाची एक वेगळीच मेजवानी दिली आहे. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित होणाऱ्या वेबसिरीजनी अनेकांना वेड लावले आहे. अमेझॉन प्राईमवरील पंचायतने तर लोकांना इतके वेडे करून सोडले आहे की, प्रेक्षकांनी अगदी चातकासारखी याचा दुसरा भाग रिलीज होण्याची वाट पहिली. या वेबसिरीजचा पहिला सीझन यशस्वी झाल्यावर दुसराही चांगलाच हिट ठरला आहे. यातील उपप्रधान या पात्राने ही सिरीज कमालीच्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. संपूर्ण सिरीजमध्ये हसवणारा उपप्रधान प्रल्हाद पांडे शेवटच्या एपिसोडमध्ये लोकांना अक्षरशः रडवून गेला.

फैसल मलिक यांनी उपप्रधानची भूमिका इतक्या सशक्तपणे पेलेली आहे की, सर्वत्रच फैसल मलिक यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. फैसल मलिक यांच्या नावाचे आता इतके गरुड तयार झाले आहेच तर त्यांची 'रियल' कहाणी पण आमच्या वाचकांना सांगून टाकावीशी वाटते. या सिरीजमध्ये त्यांना जवळच्या लोकांचा मृत्यू सहन करावा लागतो. तसे खऱ्या आयुष्यात देखील त्यांनी मोठा त्रास सहन केला आहे. त्यांचा लहान भाऊ १४ वर्षांचा असताना किडनीच्या आजाराने गेला, तर बहिणीने नापास झाल्यामुळे आत्महत्या केली होती. लागोपाठ कोसळलेल्या या दुखाने कोणीही सामान्य माणूस उन्मळून पडणारच. नियतीने दिलेले हे आघात सहन न न झाल्याने ते व्यसनाच्या आहारी गेले. त्यांच्या व्यसनामुळे पूर्ण कुटुंब त्रासले होते. याचे काय करावे हाच प्रश्न सगळ्यांना पडला होता.

फैसल उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजचे आहेत. अनेकवेळा प्रयत्न केल्यावर ते दहावी पास झाले. आपल्या मुलाने चांगले शिक्षण घ्यावे असे त्यांच्या आईवडिलांना वाटत होते. फैसल आता थोडे शांत झाले आणि ते कामाला लागले. पुढे त्यांनी बीकॉमपर्यंत शिक्षण पूर्ण केले. आता वेळ होती एमबीएची. त्यासाठी क्लासेस करण्यासाठी त्यांनी थेट मुंबई गाठली. इथे मात्र त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. कोचिंग तर झाले नाही, पण त्यांची फसवणूक होऊन त्यांचे सर्व पैसे बुडाले. ही गोष्ट २००२ सालची. त्यावेळी त्यांचे वय फक्त २२ वर्षं होते. मित्रांनी मग त्यांना थेट अभिनय करण्याचा सल्ला दिला. तसेही मुंबई गेलेल्या माणसाला बॉलिवूड आकर्षित करतेच.

फैसल यांनी मग बॉलिवूडची वाट धरली. पण बॉलिवूड काही सोपं प्रकरण नाही. त्यात हा भाऊ ना हँडसम, ना बॉडी. ऑडिशनमध्ये तर चेहरा बघून त्यांना हाकलून देत असत. आपला काय स्क्रीनवर निभाव लागणार नाही हे त्यांनी ओळखले. मुंबईत कोणाची ओळख नाही. अशावेळी इतर स्ट्रगलर्सप्रमाणे मिळेल ते काम कर, स्टेशनवर झोप अशा पद्धतीने ते दिवस घालवत होते. बॉलिवूडमध्ये घुसायचे तर आहे पण अभिनयात संधी मिळणार नाही हे ओळखून त्यांनी मग फिल्मोग्राफीचा कोर्स केला.

त्यांनी प्रॉडक्शन टीममध्ये साहाय्यकपासून ते लाईनमनपर्यंत मिळेल ती कामे केली. बॉलिवूड अशी गोष्ट आहे जिथे आयुष्यभर संघर्ष केलेला माणूस एखादी संधी मिळवतो आणि तिचे सोने करून नंतरच्या आयुष्यात जम बसवतो. पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, नवाझुद्दीन सिद्दीकी अशी अनेक उदाहरणे यात सांगता येतील. फैसल यांना ब्रेक दिला तो अनुराग कश्यप याने. ‘गँग्स ऑफ वासेपुर’मध्ये एक पोलिसाचा रोल त्यांना मिळाला. हा छोटासा रोल त्यांनी किती हटके सादर केला हे ज्यांनी तो सिनेमा बघितला त्यांना माहीत असेल.

‘गॅग्स ऑफ वासेपुर’नंतर त्यांना अभिनयाची संधी मिळू लागली. ‘फ्रॉड सैय्या,’ ‘ब्लॅक विडोज’ अशा अनेक सिनेमा सिरीजमध्ये त्यांना रोल मिळाले. गडी मुळात हुशार होता. लगोलग पैसा आल्यावर त्यांनी स्वतःची प्रॉडक्शन कंपनी सुरू केली. त्यांनी हळूहळू सिनेमे आणि सिरीज प्रोड्युस करायला सुरूवात केली. ‘हमारी फिल्म’ कंपनी या त्यांच्या कंपनीने पुढे कंगना राणावतची ‘रिव्हॉल्व्हर राणी,’ ‘मै और चार्ल्स,’ ‘सात उचक्के,’ असे सिनेमे प्रोड्यूस केले.

फैसल हे बायको कुमुद शाहीसोबत मिळून विविध ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कंटेंट तयार करण्याचेही काम करतात. फैसल यांना त्यांच्या कामासाठी काही पुरस्कार मिळाले आहेत. एक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे. तसेच त्याच्या अभिनयाच्या जोरावर आज देशभर आज त्याचे कौतुक होत आहे. पंचायत सिरीजमधून त्यांनी अनेक 'लाईफ लेसन' दिले असले तरी त्यांचे खरे आयुष्य पण अनेक 'लाईफ लेसन्स'नी भरले आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required