computer

भारतरत्न नरसिंह राव : वाचा 'सत्तेच्या पडछाये'त काय घडतं असतं !

आज आपण जो 'ग्लोबल' भारत बघतो आहोत , त्या ग्लोबलायझेशनची सुरुवात केली पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली. राजीव गांधींच्या आकस्मिक निधनानंतर ही वाटचाल पुढे सातत्याने सुरु ठेवण्याचे श्रेय पीव्ही नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांना जाते.कालच त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' हा मरणोत्तर प्रदान करण्यात आला.नरसिंह राव पंतप्रधान झाले तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९९६ पर्यंत श्री राम खांडेकर त्यांचे  OSD म्हणजे ऑफीसर ऑन स्पेशल ड्यूटी होते. पंतप्रधानांचे आयुष्य जवळून बघण्याची संधी त्यांना मिळाली. राम खांडेकर यांनी त्यांच्या अनुभवांवर 'सत्तेच्या पडछायेत' हे पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकातील काही मोजका भाग आता  आपण वाचूया.

एकदा संयुक्त राष्ट्रांमध्ये एका विषयावर चर्चा करण्यासाठी भारतीय प्रतिनिधी मंडळ पाठवावयाचे होते. साधारणपणे त्याचे नेतृत्व पंतप्रधान वा परराष्ट्रमंत्री किंवा सत्ताधारी पक्षातील व्यक्ती करत असते. परंतु नरसिंह रावांनी त्यासाठी विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांची निवड करून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. अटलजींनी आपल्या वक्तृत्वाने संयुक्त राष्ट्रांमध्ये छाप पाडली. या परिषदेला जाण्यापूर्वी अटलजी नरसिंह रावांना भेटण्यासाठी आले होते. संबंधित विषयाबाबत चर्चा झाल्यावर नरसिंह राव त्यांना म्हणाले, ‘‘वाजपेयीजी, परदेशात जाताच आहात तर तिथे प्रकृतीचीही निष्णात डॉक्टरांकडून पूर्ण तपासणी करून घ्या. परतण्याची घाई करू नका. मी भारतीय राजदूतांना तशा सूचना दिल्या आहेत. इथे तुम्हाला त्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे प्रकृतीची हयगय होते.’’ माणुसकीचे असे उदाहरण क्वचितच आढळते. 

हवालदार अब्दुल हमीद याने १९६५ च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानी सेनेला सळो की पळो करून सोडले होते आणि त्या धुमश्चक्रीत तो शहीद झाला होता. त्यासाठी हमीदला मरणोत्तर ‘परमवीर चक्र’ देण्यात आले होते. त्याची समाधी भारत-पाक सीमेवरील खेमकरण सेक्टरमध्ये आहे. त्याच्या पराक्रमाचे गुणगान आजही गायले जाते. नरसिंह रावांना ही बातमी दाखवताच त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांची मानसिकता लक्षात घेऊन तातडीने यासंदर्भातील व्यवस्था रेल्वेने नव्हे, तर हेलिकॉप्टरने करण्याच्या सूचना दिल्या. आणि हमीदची पत्नी रखुलनबी ही त्यांचे चार नातेवाईक आणि एका मौलवीसह हमीदच्या समाधीला व त्याच्या युनिटला भेट देऊन आली. एवढेच नव्हे, तर पुढे जाऊन नरसिंह रावांनी तिच्या घराच्या दुरुस्तीसाठी आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी नियमित आर्थिक मदत देण्याच्या सूचना कॅन्टोन्मेंट बोर्डाला दिल्या.

थोडक्यात, भारतीय दर्शन, संस्कृती, भाषा, साहित्य आणि न्यायशास्त्राचा अभ्यास असणारे, तसेच सतत देशाच्या सर्वागीण विकासाचा, तळागाळातील जनतेचा, पक्षाचा विचार करणारे, लक्ष्मीचे नव्हे तर सरस्वतीचे पूजन करणारे नरसिंह राव मनाने आता खचले होते. त्यांना सर्वच क्षेत्रांतील दुर्दशा बघवत नव्हती. आणखी एका गोष्टीचे शल्य त्यांना बोचत होते. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी दोन-तीन दिवस आधी ते हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे पोर्चमध्ये उन्हात बसलेले असताना त्यांनी मला बोलावले आणि विनोदाने म्हणाले, ‘‘खासगी सचिवांनी आपल्या चलतीच्या काळात पैशाअडक्याची तरतूद करण्याची पद्धत दिल्लीत प्रचलित आहे. नाही तर तुम्ही!’’ परंतु नंतर त्यांनी आपल्या अंत:करणातील यातना बोलून दाखवली.. ‘‘ज्यावेळी लोक मला पैसे आणून द्यायचे तेव्हा मी घेतले नाहीत. आणि आज मला सहा वर्षे चाललेल्या खटल्यासाठी वकीलच काय, त्याच्या सहकाऱ्यांना एक पैसाही देता येत नाहीये. काय ही माझी अवस्था!’’ खरोखरच वकिलांना पैसे न देता आल्यामुळे त्यांच्या उपकाराच्या ओझ्याखालीच नरसिंह रावांनी जगाचा निरोप घेतला होता, हे सत्य आहे. पंतप्रधानपदी असताना त्यांनी स्वत:साठी एक इंचभरही जमीन घेतली नाही की दहा बाय दहाची साधी खोलीही घेतली नाही. त्यांच्या बँक खात्यातली पुंजीही बेताचीच होती. आश्चर्य म्हणजे ज्या उद्योगपतींना त्यांनी जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारून सुगीचे दिवस आणले, जगात प्रतिष्ठा मिळवून दिली, त्यांच्यापैकी एकानेही पुढे नरसिंह रावांकडे ढुंकूनदेखील पाहिले नाही. ही खरी शोकांतिका होती!

नरसिंह रावांच्या मृत्यूची बातमी समजताच दोन सरकारी दूत (तेही मराठी!) माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, ‘‘नरसिंह रावांच्या मुलांना सुचवा, की त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी हैदराबादला न्या.’’ यामागे महत्त्वाचे कारण असे होते की, नरसिंह रावांचा ‘न’ जरी दिल्लीत राहिला तरी त्यांच्या कर्तृत्वाच्या इतिहासाने नेहरू-गांधी घराणे पडद्याआड जाण्याची धास्ती काही मंडळींना वाटत होती. यामुळेच काँग्रेस अधिवेशनानिमित्त प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेत नरसिंह रावांच्या नावासोबत फोटोऐवजी रिकामी चौकट असे. मी त्या सरकारी दूतांना स्पष्टच सांगितले, ‘‘नरसिंह रावांची मुलं माझं ऐकतीलच याची खात्री नाही. त्यामुळे ते काम तुम्हालाच करावं लागेल.’’ मृतदेह येईपर्यंत ही मंडळी तीन-चारदा तरी येऊन गेली. शेवटी मी त्यांना म्हटलं, ‘‘रावांचा मृतदेह आल्यानंतर, मुलांचा शोक थोडा कमी झाल्यावर आलात तर यासंबंधात त्यांच्याशी बोलता येईल.’’ कोणत्याही माजी राष्ट्रपती व पंतप्रधानांना अंत्यसंस्कारांसाठी राजघाट परिसरात जागा द्यायची नाही असा निर्णय तेव्हाच्या मंत्रिमंडळाने घेतला होता. परंतु ती काही दगडावरची रेघ नव्हती. पुढे वर्षभरातच माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचे निधन झाले तेव्हा याच मंत्रिमंडळाने त्यांचे अंत्यसंस्कार राजघाट परिसरात करण्यास परवानगी दिली होती. हा निर्णय घेणारे पंतप्रधान होते डॉ. मनमोहन सिंग. ज्यांना मानाचे स्थान नरसिंह रावांनीच मिळवून दिले होते. मात्र, ते यावेळी मूक दर्शक होऊन हे सगळं पाहत होते.

(वाचकहो  'सत्तेच्या पडछायेत' हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले असून राजहंश प्रकाशन किंवा अ‍ॅमॅझॉनवर सहज उपलब्ध आहे.)

सबस्क्राईब करा

* indicates required