computer

पेटीएम बंद पडणार आहे म्हणे, पेटीएमचा काय झोल झाला आहे ?

नाक्या-नाक्यावर सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे ' पेटीएमचा काय झोल झाला आहे ?
पेटीएमचं  जे काय झालंय त्याला गुजरातीत - लोच्यो आणि आता मराठीत 'लोचा' म्हणतात. जर येत्या काही दिवसात रिझर्व बँकेनं माफीचा फायदा दिला नाही तर थोड्याच दिवसात 'पेटीएम  करो' च्या ऐवजी  ' पेटीएम की तो वाट लग गयी '  असं ऐकू येणार आहे.पण हे थोडं कठीणच दिसतंय कारण गेल्या वर्षीच रिझर्व बँकेने पेटीएमला धोक्याचा इशारा दिला होता आणि पेटीएमने त्या इशार्‍याकडे चक्क दुर्लक्ष केलं होतं.पण आता हा ' लोच्या' नक्की काय आहे ते समजून घेऊ या. तुम्ही पेटीएम - गुगल पे - फोन पे वगैरे कोणतंही अ‍ॅप वापरत असाल. ही अ‍ॅप म्हणजे एक प्रकारची ' सेल्समन किंवा फ्रंट शो रुम ' आहेत. या सगळ्या अ‍ॅपचा आत्मा एकच आहे तो म्हणजे युपीआय ! युपीआय नाय तर कायच नाय !
हे झालं सोप्या शब्दात पण या व्यवहाराची तांत्रिक बाजू आता समजून घेऊ या !

युपीआय म्हणजे RBI मान्य नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची संगणक प्रणाली आहे. या प्रणालीने बँका एकमेकांसोबत जोडल्या गेल्या आहेत.अशी जोडणी केल्यामुळे बँकेच्या एका खात्यातून दुसर्‍या कोणत्याही बँकेच्या खात्यात पैसे जमा करता येतात. थोडक्यात पेटीएमचा व्यवहार अशा बँकेमार्फतच होतो ज्या बँकेला RBI ची मान्यता आहे. अशा बँकेला payment service provider( PSP ) असे म्हणतात. पेटीएमची - PSP  आहे Paytm Payments Bank Limited (PPBL). या बँकेखेरीज इतर कोणतीही बँक पेटीएम सोबत (PSP) म्हणून जोडलेली नाही. असे असेल फोन पे -अ‍ॅमॅझॉन पे - क्रेड वगैरे अ‍ॅप काम कसे करतात असा प्रश्न तुमच्या मनात येईलच. त्याचे उत्तर असे आहे की ही बाकीची अ‍ॅप  Third Party Application Provider (TPAP) म्हणजे दुसर्‍या बॅकेच्या माध्यमातूनच काम करतात.  पेटीएमकडे स्वतःचीच बँक असल्याने त्यांचे अ‍ॅप (TPAP) सारखे काम करत नाही.

सोप्प्या भाषेत सांगायचे झाले तर पेटीएम पेमेंट बँक हा मेन स्विच आहे. तो २९ फेब्रुवारीला  ऑफ झाला तर पेटीएम अ‍ॅप बंद पडणार !

रिझर्व बँकेने ग्राहकांचे हित लक्षात घेऊन 'मेन स्विच' ऑफ म्हणून तर दुसर्‍या बँकेचा 'इन्वर्टर' जोडला तरी समस्या कमी होणार नाही.कारण असे की नव्या सर्व्हिस प्रोव्हायडरला पेटीएमचे सर्व ग्राहक नव्याने नोंदवावे लागतील. पेटीएमचा सर्व ग्राहकांचा डेटा नव्या सर्व्हिस प्रोव्हायडरला आयता मिळेल.  

आता हा झाला तांत्रिक झोल पण आणखी एक झोल असा आहे की पेटीएमची मालक कंपनी One 97 Communications Limited (OCL) , या कंपनीत काही चिनी गुंतवणूकदार आहेत.या गुंतवणूकदारांचे नक्की काय ' झोल' चालले आहेत या बद्दल परराष्ट्र खात्याला काही संशय आहेत. तो संशय दूर होईपर्यंत आंअखी काही सवलती रिझर्व बँक घाईघाईने देणार नाही हे स्पष्टच आहे.

थोडक्यात पेटीएमची अवस्था सध्या ' फटी पडी है ' अशीच आहे. अशावेळी तुम्ही काय कराल ? सर्वात आधी पेटीएम वॉलेट रिकामे करून घ्या आणि पर्यायी व्यवस्था होईपर्यंत इतर अ‍ॅप वापरा !

सबस्क्राईब करा

* indicates required