computer

१०० तोळे सोने -शिवरायांचे चरित्र इंग्रजीत अनुवाद करण्यासाठी !!!

आजच्या काळात 'अनुवादकाला १०० तोळे सोनं' हे चार शब्द  कोणी उच्चारले तरी  ऐकणार्‍याला भोवळ येईल.पण मराठी ग्रंथ व्यवहारात विसाव्या शतकाच्या सुरुवातीला असे घडले आहे. कृष्णाजी अर्जुन केळुस्कर या मराठी लेखकाने आपल्या अनुवादकाला चक्क १०० तोळे सोने मानधन म्हणून दिले

मराठी ग्रंथ व्यवहार हा समृध्द आणि श्रीमंत ग्रंथ व्यवहार आजही नाही आणि  विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाही नव्हता. डॉ. आ.ह.साळुंखे म्हणतात त्याप्रमाणे मराठी ग्रंथ व्यवहारात पुस्तक रखडणे हा नियम तर चालणे हा अपवाद आहे. असंही म्हटलं जातं की लेखक हवेत किल्ला बांधतो, वाचक या किल्ल्यात राहतो आणि प्रकाशक भाडे वसूल करतो. असं असूनही एक गरीब माणूस विसाव्या शतकाच्या सुरुवातीला शिवरायांच्या चरित्राच्या इंग्रजी अनुवादासाठी  १०० तोळे सोने देण्याचे ठरवतो आणि वचन पूर्तता करतो.एखाद्या सावकाराने हे वचन द्यावे आणि पूर्ण करावे हे थोडेसे समजून येईल पण हे धैर्य - हे धाडस करणारे  कृष्णाजी अर्जुन केळुस्कर कोण होते ते आधी जाणून घेऊ या !

कृष्णाजी अर्जुन केळुस्कर (गुरुजी) यांनी बुद्धचरित्र आणि अनेक चरित्रे लिहली. ते एका साप्ताहिकाचे संपादक होते.मराठी ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मॅट्रिकच्या परीक्षेनंतर बुद्ध चरित्र भेट दिले. सयाजीराव गायकवाड महाराजांचा परिचय करून दिला. केळुस्कर गुरुजी उत्तम वाचक व लेखक होते. सार्वजनिक जीवन उभे रहावे यासाठी धडपडणारे व्यक्तीमत्व म्हणून ते सर्व परिचित होते.

शिवरायांच्या अष्टपैलू गुणांचा वेध घेऊन शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेची कल्पना महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून स्वराज्य ही राष्ट्रीय संकल्पना होती हे सिध्द करण्यासाठी इ.स.१९०३ साली केळुसकरांनी छत्रपती शिवाजी महाराज हे चरित्र लिहिण्यास सुरुवात केली. याची पहिली आवृत्ती इ.स. १९०७ साली मराठा प्रॉविडंट फंडातर्फे प्रसिद्ध झाली. तत्कालीन उपलब्ध असलेली अनेक कागदपत्रे, बखरी, पत्रव्यवहार याचा अभ्यास करून त्यांनी ६०० पानी शिवचरित्र लिहिले.


मराठी ग्रंथ व्यवहारात पुस्तकाच्या एक हजार प्रती काढण्याची परंपरा मोडून चार हजार प्रती काढल्या. मनोरंजनकार का.र. मित्र यांच्या छापखान्यात दोन्ही ग्रंथांची छपाईही झाली. पण यात त्यांना प्रचंड कर्ज झाले.कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांनी एक हजार रुपये दिले. ५०० प्रती खरेदी केल्या. बापूसाहेब कागलकर व सयाजीराव महाराज यांनी प्रत्येकी २०० प्रती घेतल्या.

या पुस्तकाची दुसरी आवृत्ती काढण्यापूर्वीच केळुस्करांनी या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर करण्यासाठी अनुवादक शोधायला सुरुवात केली. मूळचे धारवाडचे प्रा. नीळकंठराव ताकाखाव हे मुंबईला विल्सन कॉलेजात इंग्रजी शिकवत. त्यांनी अनुवादाचे काम स्वीकारले. अनुवादाची प्रुफे तपासणाऱ्या डॉ. मॅकनिकल यांनी इंग्रजी आवृत्तीला प्रस्तावना लिहली. मराठी शिव चरित्राची ही दुसरी आवृत्ती आणि इंग्रजी अनुवादासाठी केळुस्कर गुरुजींना कर्ज काढावे लागले.


शिवरायांचे हे साहित्य विषयक स्मारक पूर्ण करण्यासाठी धडपड्या केळुस्कर गुरुजींनी २०० लोकांची समिती स्थापन केली. चार पाच हजार रुपये फंड जमला. पुस्तकांसाठी सहकार्य करू असा शब्द देणाऱ्या शाहू महाराजांचे दरम्यानच्या काळात निधन झाले होते. मात्र केळुस्कर गुरुजींनी भेट घेतल्यावर इंदूरचे तुकोजीराव होळकर यांनी त्यांना २४००० रुपये दिले. इंग्रजी प्रतीसाठी इतर संस्थानिकांचा प्रतिसाद अत्यल्प होता. दुसऱ्या मराठी आवृत्तीच्या पाच हजार प्रती छापल्या. किंमत मात्र ४  रुपये होती. या शिवचरित्राची गुजराती, तामीळ, कानडी भाषेत भाषांतरे झाली. कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांच्याकडे प्रा. ताकाखाव यांनी कधीही मानधनाची मागणी केली नाही. मात्र केळुस्कर गुरुजींनी सर्व खर्च भागल्यावर उरलेल्या पैशातून १०० तोळे सोने खरेदी केले. इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर यांना मुंबईत बोलावून मोठा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात कृष्णाजी अर्जुन केळुस्कर या मराठी लेखकाने अनुवादक प्रा. नीळकंठराव ताकाखाव यांना तुकोजीराव होळकर महाराजांच्या हस्ते १०० तोळे सोने मानधन म्हणून दिले. या इंग्रजी आवृत्तीच्या ३५०० प्रती परदेशातील ग्रंथालयांना विनामूल्य पाठवल्या.

प्रस्तुत अनुवाद सोबतच्या लिंकवर वाचायला मिळेल 
  https://archive.org/details/lifeofshivajimah00keluiala/page/n9/mode/2up


आजचा महाराष्ट्र  कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांच्यासारख्या शिवरायांच्या कार्याला वाहून घेणार्‍या -खर्‍या अर्थाने शिवरायांच्या मावळ्यांची वाट बघतो आहे इतकंच आपण म्हणून या !!!

प्रा.डॉ. संजय थोरात, इस्लामपूर.९८५०२४८२८६

सबस्क्राईब करा

* indicates required