computer

'सत्या'मध्ये असं काय होतं की बॉलीवूडमध्ये नवीन पर्व सुरु झालं?

सत्याला येऊन काल २३ वर्षं झाली. तसं पाहायला गेलं तर २३ वर्षं एवढा काळ एखाद्या सिनेमाचा 'हँगओव्हर' उतरायला खूप झाला. पण सत्याचं भूत काय उतरायचं नाव घेत नाही. बरं, ज्या जॉनरचा सिनेमा सत्या आहे, त्या जॉनरचे खूप कमी सिनेमे तयार झाले म्हणून एवढा 'सत्या फिवर' आहे असे म्हणायला सुद्धा जागा नाही. आजवर बॉलिवूडमध्ये कित्येक सिनेमे या प्रकारातले येऊन गेले आहेत. 

सत्याला २३ वर्षं होऊनही आजही सत्या नवा वाटतो. कित्येकांनी त्याची पारायणं केली आहेत. काल वाढदिवस म्हणून पुन्हा एकदा लोकांनी सत्या पाहिला असेल. या लोकप्रियतेमागे कारणं पण तेवढीच भन्नाट आहेत. त्या कारणांबद्दल सत्याचा कोणताही फॅन भरभरून बोलू शकतो. आम्ही पण त्याच फॅन्स मधून एक!!! म्हणून  या 'सत्या फिवर' वर थोडा प्रकाश टाकत आहोत.

राम गोपाल वर्मानं अंडरवर्ल्ड जगतातली एक वेगळीच बाजू दाखवण्यासाठी गँगस्टर ट्रायलॉजी म्हणजेच या विषयावर तीन सिनेमे बनवायचे ठरवलं. त्यातला सत्या पहिलाच सिनेमा. मागच्या दोन दशकांत येऊन गेलेल्या या विषयांवरच्या सिनेमांमध्ये ही सिरीज सर्वात भारी आहे. त्यात सत्या तर अजूनच वरचढ आहे हे कुठलाच सिनेपरिक्षक नाकारत नाही. राम गोपाल वर्माचाच कंपनी हा याच सिरीजमधील सिनेमा कुठेतरी सत्याच्या जवळ जातो असं आपण म्हणून शकतो.

सत्या आला तेव्हा बॉलिवूडमध्ये हिरो हिरोईन व्हिलन याभोवती फिरणारे सिनेमे तयार होत असत. चित्रपट संपत असताना हिरो व्हिलनला मारून हिरोईन घेऊन जातो आणि पिच्चर खलास!! याला छेद देऊन राम गोपाल वर्माने सत्याचा शेवट अनपेक्षित असा केला. जेव्हा भाऊला मारून सत्या विद्याला भेटायला येतो तेव्हा कल्लू मामा त्याला दुबईला पळून जायचा पर्याय समोर ठेवतो. सत्या ते नाकारत थेट विद्याच्या घरी जातो आणि तेथे काय होतं हे सिनेमा पाह्यला असेल तर तुम्ही कधीच विसरणार नाही. हा शेवट खऱ्या अर्थाने सिनेमा म्हणून सत्याचं मोठंपण अधोरेखित करतो. रिऍलिटीचा एवढा जवळ जाऊन तयार केलेला सिनेमा कदाचित त्याआधी किंवा त्यानंतर कुठला तयार झाला असेल. 

तसे गुंडगिरीवर सत्याच्या नंतरही शूल व गंगाजलसारखे सिनेमे येऊन गेले, पण ते युपी बिहारमधल्या गुंडगिरीचं वास्तव होतं. या सगळ्या सिनेमांच्याआधी आलेला सत्या हा त्यामानाने बराच रॉ होता. मुंबई अंडरवर्ल्डवर एवढा ताजा आणि अस्सल सिनेमा पूर्वी कधी तयार झाला नव्हता. सत्याने त्याची पायाभरणी केली म्हणूनसुद्धा सत्याचं महत्व खूप आहे. 

भिकू म्हात्रेच्या रोलमधला मनोज वाजपेयी तेव्हा म्हणावा तर नवखा होता. त्याने यापूर्वी स्वाभिमान नावाची मालिका आली होती, बँडिट क्वीन मध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत होता, पण स्वत:ची अशी खूप वेगळी ओळख तयार झाली नव्हती. असं म्हणतात की तो जेव्हा राम गोपाल वर्मा यांना भेटला तेव्हा त्यानेच बँडिट क्वीन मधला मान सिंहच साकारला यावर राम गोपाल वर्मा यांचा विश्वास बसला नव्हता.

फक्त मनोज वाजपेयीच नाही तर तोवर नाटक-थिएटरमध्ये अधिक रमलेला मकरंद देशपांडे, सुशांत सिंग, संजय मिश्रा हे त्यावेळी नवीन आणि फारसे प्रसिद्ध नसलेले चेहरे या सिनेमाचा भाग होते. सत्याचा लेखक अनुराग कश्यप म्हणायला गेलं तर मुंबईचा नव्हता. त्याला मुंबईत येऊन जास्त वर्षंसुद्धा झाली नव्हती. तसा बॉलिवूडमध्येही तो नवखाच होता. सोबतीला अनुभवी म्हणून सौरभ शुक्ला होता तरीसुद्धा सत्या पाह्यला की अनुराग एवढी मुंबई कुणाला समजली नसेल असं वाटतं. त्याच्या पुढच्या सिनेमांमध्ये हीच मुंबई आणखी चांगल्या रीतीने पडद्यावर आली.

'सपनो मे मिलती हैं' हे गाणं आजही लोकांच्या ओठांवर आहे. त्यात गाण्याच्या शेवटी मनोज वाजपेयी नाचत असताना त्याचे एक्सप्रेशन निव्वळ अफलातून आहेत. कमिशनर असलेल्या परेश रावलला मारल्यावर समुद्राकिनारी उभा असलेला भिकू म्हात्रे जेव्हा 'मुंबई का किंग कौन? भिकू म्हात्रे!!! म्हणत आसुरी हसतो त्यावेळी त्याच्या अभिनयाची क्षमता लक्षात येते. हा डायलॉग झाल्याच्या दुसऱ्याच सीनमध्ये मनोज वाजपेयीचं काय होतं हे आम्ही सांगायची गरज नाही. पण हा ट्विस्ट भयानक अंगावर येतो. या सगळ्यांत पूर्ण २ तास ४० मिनिटं सत्या आपल्यावरची पकड ढिली होऊ देत नाही. मुंबईचं अंतरंग दाखवणारे अनेक सिनेमे बॉलिवूडमध्ये येऊन गेले. पण सत्याच्या नजरेतून वेगळीच मुंबई दिसते. मुंबईचं जनजीवन, गँगवारचं प्रशासन, गुंडांच्या कुटुंबावर, समाजावर पडणारा प्रभाव ज्या पद्धतीने राम गोपाल वर्मा मांडतो तो थेट तुम्हाला मुंबईचं नवीन दर्शन घडवणारा ठरतो. 

सत्या जसा रिलीज झाला तेव्हा तो फ्लॉप घोषित करण्यात आला होता. पण जसेजसे लोक सत्या पाहून येऊ लागले तसतसा सत्या फिवर जनमानसावर चढत गेला आणि खऱ्या अर्थाने कल्ट क्लासिक असलेला सत्या पुढचे २५ आठवडे बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घालत होता. २०२० साली मनोज वाजपेयीने सत्याला २२ वर्षं पूर्ण झाली त्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले होते की या सिनेमाने माझे आयुष्य बदलून टाकले. सत्याने फक्त मनोज वाजपेयीच नाहीतर सत्याचा भाग असलेल्या प्रत्येकाचा, आणि बॉलिवूडचासुद्धा एकाच धाटणीतील सिनेमे बनवण्याचा रिवाज सुद्धा बदलून टाकला असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required