computer

'हम आपके है कौन' : आधी सगळ्यांनी फ्लॉप ठरवला, पण सिनेमाने असा रचला इतिहास!!

मंडळी, एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूड सिनेमा म्हंटलं की जबरदस्त मारधाड, ऍक्शन सीन्स आणि उत्तान दृश्ये यांच्याशिवाय सिनेमा पूर्णच होत नसे. त्याच सुमारास भारतात केबलचे जाळे सुद्धा पसरत होते. पायरसी नावाचा प्रकार मूळ पकडू लागला होता व फॅमिलीसह थिएटरला जाऊन सिनेमा बघणे ही संकल्पना मागे पडत होती. एकंदरीतच निम्म्या प्रेक्षकवर्गाने थिएटर्सकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत होते. तो काळ होता आजपासून पंचवीस वर्षांपूर्वीचा

… आणि अश्यातच 1994 साली आजच्याच दिवशी म्हणजे 5 ऑगस्टला एक सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्याने अवघ्या बॉलिवूडचा इतिहासच बदलून टाकला! इतकंच नव्हे तर लोकप्रियतेचे नवनवे उच्चांक प्रस्थापित केले, थिएटर्स व पर्यायाने बॉलिवूडला परत झळाळी प्राप्त करून दिली. होय, तुम्ही बरोबर ओळखलंत… आम्ही बोलतोय मोस्ट रोमँटिक स्टोरी, जबरदस्त कौटुंबिक मनोरंजन आणि भावभावनांचे परफेक्ट मिश्रण असणाऱ्या सिनेमाबाबत… 'हम आपके है कौन...!'

काही सिनेमांच्या निर्मितीमागे आश्चर्यकारक योगायोग असतात मंडळी. आता हेच पहा ना, सर्वांचा आवडता बनलेला प्रेम म्हणजे सलमान खान हा निर्मात्यांची पहिली निवड नव्हता हे तुम्हाला माहीत आहे का? हा रोल सर्वात प्रथम आमिर खानला देऊ केला होता म्हणे. आमिरला सिनेमाची कथाच पसंत पडली नाही आणि 'प्रेम' साकारला सलमानने. पुढचा इतिहास तर तुम्हाला माहीत आहेच.

या सिनेमाची कथा स्वतः सुरज बडजात्या यांनी लिहिली आहे. राजश्री प्रॉडक्शन ही एक नामांकित निर्मिती संस्था ताराचंद बडजात्या यांनी उभी केली होती. त्यांचा नातू असणारा सुरज एका नवीन सिनेमाच्या निर्मितीचा विचार करत असताना त्याला वाटलं की आपला पूर्वीचाच सिनेमा 'मैने प्यार किया' याचा रिमेक करू. पण त्याचे वडील राजकुमार बडजात्या यांनी सल्ला दिला की, त्यापेक्षा तू 1982 साली आलेल्या 'नदीया के पार' चा रिमेक कर. नदीया के पार हा सुद्धा राजश्री प्रॉडक्शनचाच सिनेमा. सुरजने तो सल्ला ऐकला आणि त्याचे परिणाम आपण बघतोच आहोत…

(सुरज बडजात्या)

हम आपके है कौन च्या निर्मितीला चार वर्षे लागली. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं द्यायचं हाच विचार बडजात्यांच्या मनात होता. मंडळी, सिनेमा म्हटला की हिरो हिरोईन सोबत आणखी एक महत्वाचा घटक असतो… तो म्हणजे व्हिलन. आणि या सिनेमात तर व्हिलनच नाही! आता व्हिलन नाही तर ऍक्शन दृश्ये सुद्धा पर्यायाने नसणार. हिंसा, बदले की आग वगैरे महत्वाच्या गोष्टी टाळल्यावर उरतं काय? अनेकांनी अंदाज वर्तवला की हा सिनेमा सपाटून आपटणार. कित्येकांनी याची लग्नाचा अल्बम म्हणून हेटाळणी केली. हा सिनेमा अजिबात चालणार नाही यावर पैजा लागल्या.

या अशा नकारात्मक वातावरणात फक्त सुरज बडजात्या मात्र आपल्या विचारांवर ठाम होते. भारतीय संस्कृती, कौटुंबिक नीतिमूल्ये आपल्या सिनेमाला तारून नेतील हा त्यांचा विश्वास होता. आणि अखेर हम आपके है कौन चा प्रीमियर लिबर्टी सिनेमात 5 ऑगस्ट 1994 रोजी प्रदर्शित केला गेला. त्या दिवसापासून तब्बल 100 आठवडे सिनेमा थिएटरमधून खाली उतरलाच नाही.

सुरुवातीला अगदी मोजक्या, म्हणजे फक्त 26 प्रिंट काढल्या गेल्या. यामागे असे कारण होते की उत्तम दर्जा असणाऱ्या सिनेमागृहातच याला प्रदर्शित केले जाईल. सुरुवातीला लोकांनी सिनेमाच्या लांबीवर आक्षेप घेतला. त्यानंतर यात असणाऱ्या तब्बल 14 गाण्यांवर नाक मुरडली. इतक्या गाण्यांचा आणि एवढ्या लांबीचा सिनेमा असतो का कुठे? पण नंतर मात्र हळू हळू सिनेमाने गर्दी खेचायला सुरू केली आणि गाणी प्रचंड हिट झाली. मग लोकांना लांबीचेही काही वाटेनासे झाले. परिस्थिती अशी झाली की हा सिनेमा आपल्या थिएटर मध्ये यावा म्हणून अनेक थिएटर मालकांनी आपले थिएटर अद्ययावत करून घेतले. आसन क्षमता वाढवली, साउंड सिस्टीमचा दर्जा वाढवला आणि काहीजणांनी तर चक्क थिएटर वातानुकूलित करून घेतले. अर्थात याचा खर्च त्यांनी तिकिटांचा दर वाढवून वसूल केला खरा, पण प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली हे ही तितकंच खरं!

मंडळी, असं काय होतं या सिनेमात? ज्याला सुरुवातीला लग्नाचा अल्बम म्हटलं गेलं त्यालाच प्रेक्षकांचं एवढं प्रेम अजूनही का लाभत आहे? भारतीय प्रेक्षकांचा मानसशास्त्रीय दृष्ट्या अभ्यास केल्यास याची कारणे सापडू शकतात. भारतीय कौटुंबिक व्यवस्थेत लग्नसमारंभाला फार महत्व आहे.

प्रेम आणि निशा यांची प्रेमकहाणी याच पार्श्वभूमीवर खुलते. निशा, म्हणजेच लाखो दिलोंकी धडकन माधुरी आणि सलमान यांचा रोमान्स कुठेही अश्लील वाटत नाही. प्रेमचा मोठा भाऊ राजेश अर्थात मोहनिश बहल, निशाची मोठी बहीण पूजा अर्थात रेणुका शहाणे यांचा संयत अभिनय चार चांद लावतो. लग्न ठरण्यापूर्वी होणारी मनाची घालमेल आणि लग्नानंतरचे सुखी समाधानी क्षण उपभोगणे हेच तर आपले स्वप्न असते ना? लग्नात मित्रमैत्रिणींनी केलेली थट्टामस्करी, नातेवाईकांची लगबग हे हवंहवंसं वाटणारं असतं. नेमकी हीच नस बडजात्यांनी पकडली आणि तिला एका म्युझिकल रोमँटिक कथेमध्ये मांडलं. त्यात माधुरीचे सौंदर्य म्हणजे उफ्फ! जोडीला अप्रतिम निसर्गाच्या पार्श्वभूमीवर केलेले शुटिंग म्हणजे सिनेमॅटोग्राफीचा बेजोड नमुना म्हणावे लागेल.

या प्रेमकहाणीत जेव्हा दुःखद वळण येते तेव्हा प्रेम आणि निशाने केलेला त्याग डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. हीच तर खरी भारतीय संस्कृती असं सांगण्याचा हा प्रयत्न आहे. प्रत्येकाला आपली वाटणारी ही कहाणी प्रेक्षकांच्या मनाला भावली नसती तरच नवल. त्यामुळे फक्त पुरुषच नव्हे तर महिलावर्गानेही या सिनेमाला डोक्यावर घेतले. थिएटरमध्ये जाऊन भव्य पडद्यावर साकारणारे हे स्वप्न परत परत डोळे भरून पाहिले. या मुख्य कलाकारांना साथ सुद्धा चांगली मिळाली ती आलोक नाथ, अनुपम खेर, रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे आणि इतर कलाकारांच्या कसदार अभिनयाने. आणि हो, तो छोटासा पांढरा कुत्रा 'टफी' सुद्धा कायम स्मरणात राहणार आहे.

आपण एखाद्या सिनेमाबाबत बोलतो तेव्हा त्याच्या गाण्यांवर बोललो नाही तर तो अन्याय ठरेल. त्यातही सिनेमा हम आपके है कौन असेल तर जनता माफ करणार नाही. याची चौदाच्या चौदा गाणी सुपरहिट ठरली. आजही कित्येकांच्या मोबाईलमध्ये प्लेलिस्टवर ही गाणी सेव्ह असणार असे आम्ही खात्रीने सांगू शकतो. विशेष म्हणजे ही गाणी कथेमध्ये बाधा न आणता कथेला पुढे घेऊन जाणारी असल्याने रसभंग करत नाहीत.

आठवा, 'दीदी तेरा देवर दिवाना' या गाण्याच्या सुरुवातीची माधुरीची ती अदा! काळजात कळ उठल्याशिवाय राहणार नाही. प्रेम तिला मागून फुल फेकून मारतो तेव्हा तिच्या मुखातून येणारा "आह्हा…" कित्येकांनी रिपीट मोडवर ऐकला असेल. प्रेमात पडलेल्यांनी 'ये मौसम का जादू है मितवा' लाख वेळा मनात गुणगुणलं असेल. कित्येक नवथर नवतरुणी 'चॉकलेट लाईमज्यूस' वर एकांतात थिरकल्या असतील आणि लग्न होऊन सासरी निघाल्यावर 'बाबूल जो तुमने सिखाया, सजन घर ले चली' या गाण्यावर कित्येकींनी हुंदके दिले असतील. या सोबतच हमखास लग्नात वाजणारे गाणे म्हणजे 'जुते दे दो पैसे ले लो' हे आहेच. मंडळी, या 14 पैकी 11 गाण्यांमध्ये लता मंगेशकर यांचा आवाज आहे.

हम आपके है कौन चे यश इतकेच मर्यादित आहे काय? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. काय असतं मंडळी, आपण सिनेमा पाहायला जातो, तीन तास कथेमध्ये हरवतो आणि नंतर ती कथा तिथेच सोडून परत जगरहाटीला लागतो. या सिनेमाने मात्र तो नियम मोडला… नव्हे, मोडून तोडून फेकून दिला!

हम आपके है कौन चित्रपट इतिहासात मैलाचा दगड तर ठरलाच, पण भारतीय लग्नसंस्कृतीची उलथापालथ करणारा सुद्धा ठरला. लग्न विधी, परंपरा यांच्यात आमूलाग्र बदल याने घडवून आणले. या सिनेमानंतर अख्ख्या भारतातल्या नवरदेवांचे बूट चोरीला जाऊ लागले. प्रत्येक सौभाग्यकांक्षीणीला वाटू लागलं की आपल्या लग्नातही संगीत, मेहेंदी कार्यक्रम केले जावे. पूर्वी रिवाज असणारे लग्न आता लग्नसमारंभ बनले आहेत. एका दिवसात आटोपशीर होणारे कार्यक्रम आता चार चार दिवस चालू लागले आहेत. हे सर्व यश हम आपके है कौनचे!

शोले नंतर सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरला. बॉलिवूडच्या 'ऑल टाईम ब्लॉकबस्टर' पैकी एक असणारा हम आपके है कौन ने करोडो रुपये कमावले, अनेक मानाचे पुरस्कार पटकावले आणि सिनेरसिकांच्या मनात कायमस्वरूपी घर केले. आजही हा सिनेमा जेव्हा कधी टीव्हीवर लागतो तेव्हा हातातली कामे सोडून टीव्हीसमोर जाऊन बसणारे 'डाय हार्ड फॅन' बघितले की सूरज बडजात्यांच्या दूरदृष्टीला सलाम करावासा वाटतो.

 

लेखक : अनुप कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required