computer

'गॉडफादर' सिनेमाची पन्नाशी. किती अडचणीतून तो बनला आणि त्याने इतिहास कसा घडवला हे वाचाच!!

गॉडफादर सिनेमा पन्नास वर्षांचा होतोय. या सिनेमाबद्दल लिहावं तितकं कमी आहे.

या चित्रपटाने समाजाच्या मनात अप्रत्यक्ष आणि अनपेक्षित बदल घडवून आणले. त्यापैकी एक बदल म्हणजे गॉडफादर या धार्मिक शब्दाला एक वेगळाच अर्थ मिळाला. अमेरीकेच्या राजकारणावर -अर्थकारणावर ज्यांचा प्रचंड प्रभाव होता अशा संघटीत गुन्हेगारी टोळ्यांच्या इतिहासावर आधारीत हा चित्रपट होता. या संघटीत गुन्हेगारी जगताच्या प्रमुखाला 'गॉडफादर' हा नवा रंग या चित्रपटाने दिला. अगदी आपल्याकडे एखाद्या गुंडाला 'भाई' म्हणण्याची फॅशन आली तसंच. थोडक्यात गुन्हेगारीच्या विश्वाचं 'ग्लोरीफिकेशन' करणारा हा चित्रपट होता. या चित्रपटाने हॉलीवूडच बदलून टाकलं. त्यानंतर क्राईम स्टोरीजची जी भरती आली जी आजही कमी झालेली नाही.
त्या काळातला हा ब्लॉकबस्टर, सुपरडुपर हिट सिनेमा. १४ मार्च १९७२ रोजी तो रिलीज झाला. आता ५० वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त पॅरामाऊंट पिक्चर्स ही कंपनी त्याचं ऍनिव्हर्सरी व्हर्जन सादर करत आहे.

गॉडफादर ही एका माफिया कुटुंबाची गोष्ट. त्यामुळे तशी ही क्राईम फिल्म. पण सिनेमा पाहताना प्रेक्षकांनी याकडे क्राइम फिल्म म्हणून बघितलंच नाही. उलट हा सिनेमा इतका गुंतवून ठेवतो, की त्यातल्या डॉनबद्दल देखील एका टप्प्यावर नकळत सहानुभूती वाटायला लागते.

यामध्ये डॉन व्हिटो नावाचा एक माफिया गॉडफादर आहे. त्याला तीन मुलं आहेत. आपला वारसदार म्हणून तो सगळ्यात थोरल्या मुलाकडे पाहतो. त्याची बाकीची दोन मुलं त्याने सुसंस्कृत आणि शांतताप्रिय वातावरणात, गुन्हेगारी विश्र्वापासून लांब वाढवली आहेत. त्यांचं जीवन सामान्य माणसांसारखं असावं असा त्याचा आग्रह आहे. सगळं व्यवस्थित चालू असताना मध्येच कथेतला ट्विस्ट येतो. माफिया कुटुंबांमध्ये युद्ध सुरू होतं आणि अशी परिस्थिती निर्माण होते की सगळ्यात धाकट्या मुलाला- मायकलला- या लढाईत भाग घ्यावा लागतो. तो अर्थातच स्वेच्छेने तसं करतो. यथावकाश हाच मुलगा आपल्या वडिलांची जागा घेतो आणि वडिलांपेक्षाही निष्ठुर, निर्दय, आणि थंड डोक्याचा निघतो. या नोटवर सिनेमा थांबतो.

ही कथा नुसती ऐकण्यात मजा नाही, खरी मजा सिनेमा पाहण्यात, अनुभवण्यात आहे. पण हा सिनेमा प्रत्यक्षात आला त्यामागची कथाही तितकीच रंजक आहे. या सिनेमाच्या निर्मितीत अनेक ट्विस्ट आहेत. इतके, की पडद्यामागे घडलेल्या गोष्टींवर एक स्वतंत्र सिनेमा निघू शकेल. हा सिनेमा तयार करणारी कंपनी एकापाठोपाठ एक फ्लॉप सिनेमांमुळे आर्थिक खाईत डुबली होती. लेखकाचंही असंच. जुगारामुळे त्याच्यावर दहा हजार डॉलर्सचं कर्ज होतं. दोघांनाही काहीतरी काम करणं गरजेचं होतं, एका हिट सिनेमाची आवश्यकता होती.

दोघांनी सिनेमा काढायचं म्हटलं, पण या सिनेमासाठी कुणी दिग्दर्शकही मिळेना. जो मिळाला तो तुलनेने नवखा होता. त्याचं नाव होतं फ्रान्सिस कोपोला. तोही मोठ्या मुश्किलीनेच तयार झाला. त्याच्या मते कथेत दम नव्हता. पण काय करतो बिचारा! तो स्वतःही आर्थिक अडचणीत होता. फार नखरे त्यालाही परवडणार नव्हते. त्याने संधीची फार वाट न पाहण्यामागचं कारण त्याच्या बालपणातही दडलं होतं. त्याचे वडील एक उत्तम संगीतकार होते. पण चांगल्या संधीची वाट बघत बसल्याने त्यांच्या हातून कित्येक संधी निसटल्या आणि चांगली संधी आलीच नाही. त्यामुळे संधीची वाट न बघता आपण ती निर्माण करणं जास्त महत्त्वाचं असतं हा धडा फ्रान्सिसला खूप लवकर मिळाला. त्याने होकार दिल्यावर पुढचा टप्पा होता सिनेमासाठी पात्रांची निवड. यातही बरेच अडथळे आले. डॉन व्हिटो म्हणून ज्याला निवडलं त्याला प्रॉडक्शन हाऊसने नकार दिला. मायकलच्या भूमिकेसाठी निवडलेल्या नटाची उंची कमी होती. शूटिंगदरम्यान प्रॉडक्शन हाऊस आणि दिग्दर्शक यांच्यातले वादविवाद, क्रिएटिव्ह डिफरन्सेस, मग दिग्दर्शकाला काढून टाकण्याच्या धमक्या हे तर नेहमीचंच झालं होतं. एक ना दोन, हर प्रकारचे अडथळे पार करत हा सिनेमा एकदाचा पूर्ण झाला.

त्यातच मध्येमध्ये माफिया लोकांचा त्रास सहन करावा लागायचा. हा सिनेमा तयार करू नये म्हणून माफिया टोळ्यांनी धमक्या द्यायला सुरुवात केली. भरपूर गोंधळ घालून झाल्यानंतर सिनेमात 'माफिया' हा शब्द न वापरण्याच्या अटीवर त्यांनी त्रास देणं बंद केलं.
पण सिनेमा रिलीज झाल्यावर या गॅंगस्टर्सनी अक्षरशः डोक्यावर घेतला. त्यांना तो इतका आवडला की अनेक जण गॉडफादर स्टाईलमध्ये बोलायला लागले. सिनेमाचे डायलॉग हिट झाले. जगभरातही हा सिनेमा सर्व सामान्य प्रेक्षकांनी उचलून धरला.

गॉडफादरमध्ये गुन्हेगारी जगतातला बटबटीतपणा पडद्यावर येत नाही. शिवाय यात स्त्री भूमिकांना म्हणजे नट्यांना फारसा कुठे स्कोप नाही. म्हणजे लोकांना आवडणारा मसाला तसा कमीच आहे. पण एवढं असूनही प्रेक्षक त्यात गुंतत जातो आणि एका क्रूर माफियालाही सहानुभूती मिळते. आपला मुलगा आपल्या स्वप्नांना सुरुंग लावत गुन्हेगारी विश्वाच्या दलदलीकडे चाललेला बघताना एका बापाचा होणारा पराभव प्रेक्षकांच्याही जिव्हारी लागतो. प्रत्येक फ्रेममधला जिवंतपणा, तरल संगीत आणि कलाकारांची कामगिरी या जोरावर उत्कृष्ट चित्रपट म्हणून हा सिनेमा गाजला. १९७४ मध्ये आलेल्या या सिनेमाच्या सिक्वेलनेदेखील (गॉडफादर II) ऑस्कर जिंकलं. त्यानंतर गॉडफादर III आला, पण त्यात काही अर्थ नव्हता. परत एकदा आर्थिक संकटात सापडल्यामुळे निर्मात्यांनी तो बनवला. बाकी त्यात काही दम नव्हता.

जर तुम्ही खरे चित्रपटप्रेमी असाल तर गॉडफादर अवश्य बघा. गॉडफादर टू टाईमपास म्हणून बघा. गॉडफादर थ्रीच्या मात्र अजिबात वाटेला जाऊ नका.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required