computer

७ वर्षांच्या आद्याला आई-आजीच्या फोटोसाठी जागतिक पुरस्कार शांतता मिळालाय!! या फोटोत असा काय संदेश आहे?

आंतरराष्ट्रीय शांतता दिवसाच्या सौजन्याने सर्वत्र जागतिक शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणजे युनेस्को मार्फत दरवर्षी शांततेचा संदेश देणाऱ्या फोटोंना ग्लोबल पीस फोटो अवॉर्ड बहाल केले जाते. ऑस्ट्रेलिया आणि युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने हा दरवर्षी हा पुरस्कार घोषित केला जातो. जागतिक शांतता हाच या पुरस्कार देण्यामागचा उद्देश असला तरी यावर्षीच्या पुरस्काराचे खास वैशिष्ट्य म्हणजे यंदा हा पुरस्कार पटकावणाऱ्यांच्या यादीत एका सात वर्षांच्या भारतीय मुलीचे नाव आहे. शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या गांधींच्या देशात त्यांच्याच १५२ व्या जयंतीदिनी हा पुरस्कार घोषित होणे म्हणजे आणखीनच अभिमानाची बाब! महत्वाचे म्हणजे हा पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय आहे. भारताच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवणाऱ्या या मुलीचे नाव आहे, आद्या अरविंद शंकर!

अवघ्या सात वर्षाच्या आद्याला फोटोग्राफीचे अतिशय वेड आहे. तिची आई रोशनीचा मोबाईल म्हणजेच तिचा कॅमेरा. तिचे वडील अरविंद आपल्या लेकीच्या या भन्नाट कलेला जपण्याचा आणि तिला प्रोत्साहन देण्याचा अतोनात प्रयत्न करतात. ज्या-ज्या ठिकाणी फोटोग्राफी स्पर्धा असेल त्यात्या ठिकाणी तिचे फोटो ते आवर्जून पाठवतात.

यावर्षीच्या ग्लोबल पीस अवॉर्ड आणि त्याची थीम याविषयी जेव्हा त्यांच्यात चर्चा झाली तेव्हा तिने काही दिवसांपूर्वी आपल्या आईचा काढलेला एक फोटो या स्पर्धेसाठी पाठवायचा ठरवले. काय खास आहे या फोटोत?

या फोटोत तिची आई रोशनी तिच्या आईच्या मांडीवर गाढ झोपली असल्याचे तिने टिपले आहे. तिच्या मते मानवाच्या संपूर्ण आयुष्यात एवढी गाढ झोप किंवा शांततेची झोप तेव्हाच येते जेव्हा ती व्यक्ती आपल्या आईच्या मांडीवर झोपलेली असते. आपली पृथ्वी आणि आपल्या भोवतालचा निसर्ग म्हणजेही आपली आईच आहे. आपल्याला जर अशी गाढ झोप हवी असेल तर आधी आपण या निसर्गरुपी आईचे रक्षण केले पाहिजे. निसर्गाचे आपण रक्षण केले तर निसर्ग नक्कीच आपले रक्षण करेल आणि आपण अशीच सुखाची, समाधानाची, शांततेची झोप घेऊ शकू. या फोटोला तिने कॅप्शन दिले आहे, “लॅप ऑफ पीस.”
हा फोटो आणि त्यासोबत आद्याने त्या फोटोतून देऊ पाहिलेला संदेश खरोखरच अप्रतिम आहे म्हणूनच युनेस्कोने या फोटोला पुरस्कार जाहीर केला. विशेषत: आद्याने यातून जो संदेश दिला आहे, निसर्गाला जपण्याचे हे महत्त्व अधोरेखित केले आहे ते तर कितीतरी पटीने प्रभावी आहे.

या पुरस्कारासोबत आद्याला १००० युरोचे बक्षीस मिळाले आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आद्या ऑस्ट्रेलियन पार्लमेंटमध्ये जाऊन आली. या कार्यक्रमात चिमुकल्या आद्याने आपल्या निरागसतेने आणि कर्तृत्वाने सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. टाळ्यांच्या गजरात तिला पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार स्वीकारताना आद्याने सर्वांचे आभार मानले आणि आपल्या फोटोबद्दल तिच्या भावना सर्वांसमोर व्यक्त केल्या. निसर्ग आपल्या सर्वांची माता आहे आणि तिला वाचवणे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे, याच विचारातून या फोटोने जन्म घेतला असे ती म्हणाली.

चिमुकल्या आद्याने भारताचे नाव जागतिक स्तरावर गाजवले, बुद्धाच्या आणि गांधींच्या शांतताप्रिय भारताचे भावी नागरिक जागतिक शांततेला कशाप्रकारे सृजनशील दिशा देऊ शकतात, हे आद्याच्या या फोटोतून आणि त्यामागच्या तिच्या संकल्पनेतून स्पष्ट होते.
आद्याला तिच्या या अनोख्या यशाबद्दल बोभाटाच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required