computer

सेलिब्रिटीजचे प्री-नपचे किस्से वाचून आपल्याकडची लग्नं जगातभारी वाटतील !!

या वर्षी वैशाखात फारशी लग्नं होणार नाहीत. काहीजण तर आता तुळशीच्या लग्नाची तारखेकडे डोळे लावून बसलेत. आता लग्न म्हटलं म्हणजे त्यात लग्नापूर्वी होणारी बैठक आलीच. अजूनही बर्‍याच ठिकाणी चार माणसांच्या साक्षीने चक्क याद्या केल्या जातात. वराचे कपडे, वधूचे दागिने, बस्ता, लग्नाचा एकूण खर्च, वरदक्षिणा, मानपान वगैरे वगैरे. पण याला कोणीही प्री-नप म्हणत नाहीत. भारतात अजूनतरी प्री-नपची प्रथा बोकाळलेली नाही. पण हे प्री-नप म्हणजे काय ते आधी समजून घेऊ या.

प्री-नप म्हणजे प्रीनप्शल अ‍ॅग्रीमेंट. विवाह करण्यापूर्वी नियोजित वधूवरांचा आपसांतला-दोघांपुरता करार. विवाहानंतर येणार्‍या जबाबदार्‍या- आर्थिक जबाबदार्‍या- आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे घटस्फोट घ्यायची गरज पडली तर पैसे- स्थावरजंगम मालमत्ता या सगळ्यांचे विभाजन कसे होईल याचा करार म्हणजे प्री-नप!

भारतात हे प्रकरण अजून फारसं बोकाळलेलं नाही. पण परदेशातली प्री-नप मात्र अजबगजब-चमत्कारीक असतात. त्यातून सेलेब्रीटी प्री-नपमधल्या अटी म्हणजे चमत्कारीक मुद्द्यांचा कळस असतो. चला, यावर्षी काही मुहूर्त दिसत नाहीयेत तर इतरांच्या प्री-नपची तर झाडाझडती घेऊ या!!

ब्रॅड पीट आणि अँजेलिना जोली - हे जोडपं आपल्या परिचयाचं आहे. यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. यांचं प्री-नप कड्या-कुलुपं-साखळ्या लावलेलं कडेकोट प्री-नप होतं. दोघंही भक्कम कमावते लोक! शेवटी एकूण सात प्रॉपर्ट्या ब्रॅड पीटला, तर दोन प्रॉपर्ट्या अँजेलिनाला मिळाल्या.

जस्टीन टिंबरलेकच्या बायकोनं म्हणजे जेसिका बियलनं एक भन्नाट अट घातली आहे. जर जस्टीन टिंबरलेकने घराबाहेर एखाद्या बाईसोबत भानगड केली तर बायकोला ५,००,००० डॉलर भरपाई द्यावी लागेल. याला म्हणतात 'फिडेलीटी क्लॉज', म्हणजे निष्ठा -इमानदारी निभावण्याची अट. या अटीवरून त्यांची भांडणं होतात म्हणे, पण लग्न टिकलंय अजून!!

आता जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसांपैकी एक, म्हणजे फेसबुकच्या मार्क झुकरबर्गच्या बायकोने काय अटी घातल्यात ते बघूया! प्रिसीला चॅन म्हणजे मार्क झुकरबर्गची बायको तशी साधीच म्हणावी लागेल. प्रॉपर्ट्या आणि पैसाअडक्याबाबत तिचं फार काही मागणं नाही. पण नवर्‍याने आठवड्यातून एकदा आपल्याला फिरायला घेऊन जावं,हॉटेलात न्यावं आणि त्याखेरीज आठवड्यातली त्याची १०० मिनिटं फक्त तिच्याच सहवासात घालवावी अशी तिची महत्वाची अट आहे.

टायगर वूड्सची लफडी तर सगळ्यांनाच माहिती आहेत. त्याच्या बायकोनं म्हणजे एलीन नॉर्डग्रेननं त्याच्या बदफैलीपणामुळे घटस्फोट घेतला. त्याप्रमाणे तिला २ कोटी डॉलर्स मिळायला हवे होते. पण काहीतरी मांडवली झाली आणि हातात पडलेले पैसे घेऊन ती बाहेर पडली.

स्टिव्हन स्पिलबर्ग या जगप्रसिध्द दिग्दर्शकाचं अ‍ॅमी आयर्वींगसोबतचं लग्न चार वर्षं टिकलं. त्यांच्या प्री-नपचा खटला कोर्टात गेला, कारण त्यांचं प्रीनप चक्क टिश्यू पेपरवर लिहिलं गेलं होतं. कोर्टाने ते रद्दबातल ठरवून स्टिफन स्पिलबर्गने अ‍ॅमीला १० कोटी डॉलर्स देण्याचा आदेश दिला.

टॉम क्रूझ आणि केटी होम्स यांच्या प्री-नपची वेगळीच स्टोरी आहे. घटस्फोटानंतर बायकोच्या-केटी होम्सच्या हातात फार काही पडलंच नाही. त्यांची मुलगी १८ वर्षाची होईपर्यंत तिला महीना ४,००,००० डॉलर्स मिळणार आहेत इतकंच!

'टू अँड हाफ मेन' या गाजलेल्या मालिकेचा हिरो चार्ली शिनला घटस्फोट महाग पडला. एकतर त्याची बायको लग्नाला तयार झाली म्हणून तिला लग्नाच्या वेळी ५,००,००० डॉलर्सचा नजराणा द्यावा लागला. आता घटस्फोटानंतर लग्नाच्या वाढदिवशी ३,००,००० डॉलर्स भेट म्हणून द्यावे लागणार आहेत. 

आता शेवटचा किस्सा एलिझाबेथ टेलर या नटीचा. तिचा शेवटचा घटस्फोट हा आठवा घटस्फोट होता. हा आठवा नवरा लॅरी फोर्टेनस्की तिच्यापेक्षा २० वर्षं लहान होता. कराराप्रमाणे लग्न पाच वर्षं निभावलं तर त्याला १० लाख डॉलर मिळणार होते. पाच वर्षं झाल्यावर त्याने १० लाख डॉलर्स घेऊन कलटीच मारली. 

हे सगळे किस्से जगावेगळे आहेत.  पण भारतात अशा कराराची आवश्यकता काही दिवसांनी भासणार आहे यात शंका नाही. उदाहरणार्थ, मुलगा सरकारी नोकर आहे असं सांगून लग्न केलं जातं. पण लग्नानंतर कळतं की तो गावखात्यात पण कामाला नाही. अशा बर्‍याच फसवणूकींना मुलींना सामोरे जावे लागते. आतापर्यंत अशा झगड्यात परिवारिक मदत होत असे. पण बदलत्या काळाचं काय सांगावं??

सबस्क्राईब करा

* indicates required