computer

थायलंडमधले लोक लॉकडाऊननंतर सोनं का विकत आहेत? आपल्याकडे तशी परिस्थिती येईल का?

आजपासून बरोबर एक महिन्यापूर्वीचे हे छायाचित्र आहे. थायंलंड मधले हे नागरीक घरातले असले-नसलेले सर्व सोनं घेऊन बाजारात विकायला आलेले आहेत. कोवीडच्या साथीमुळे नोकर्‍या गेल्या आहेत, रोजच्या खर्चाची मारामारी आहे, अशा वेळी दुसरं करणार तरी काय ?

सोन्याच्या भावाने उच्चांक गाठलेला आहे. घरातलं सोनं विकून दिवसांचे खर्च भागवू अशा विचाराने लोकांच्या झुंडी सोनाराच्या दुकानात जात आहेत. ही गर्दी काही दिवसांत इतकी वाढली की शेवटी थायलंडच्या पंतप्रधानांनी लोकांना जाहीर आवाहन करून सांगीतले की सोनं विका, पण इतकं विकू नका की दुकानदारांचे पैसेच संपतील.

आपल्याकडे सध्या लॉकडाऊनमुळे सराफांची दुकानं बंद आहेत. पण चालू परिस्थिती बघता लॉकडाऊन शिथिल झाल्यावर आपल्याकडे पण असंच होईल का? सरकारी आकड्यांप्रमाणे बेरोजगारीचे प्रमाण आता २३.४% वर पोहचले आहे. रोजगारासाठी शहरात आलेले अनेक मजूर कामगार आपापल्या राज्यात परत निघाल्याची दृष्ये आपण रोज बघत आहोतच. हे परत जाणारे घरी पोहचल्यावर त्यांना सुरक्षित असल्याचे समाधान त्यांना मिळेल, पण रोजगार मिळणार नाही हे स्पष्ट आहे. मग त्वरीत रोकड हाती येण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे जे काही किडूकमिडूक सोने असेल त्याची विक्री करणे.

२०१९ हे वर्षं तसेही औद्योगीक मंदीचेच होते. त्यात आता कोवीडच्या लॉकडाऊनची पडली आहे. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या मते हा २०२० ट्रेंड वाढत जाणार आहे. २०१९ या वर्षात ११९.५० टन घराघरातून बाजारात विक्रीला आले. २०१८ सालाच्या तुलनेत हे प्रमाण ३७% जास्त आहे. कदाचित २०२० मध्ये या सोन्याच्या विक्रीचा एक नवा उच्चांक होणार आहे. मार्च २०२०च्या पहिल्या तिमाहीत नव्या दागिन्यांची मागणी ४१ टक्क्याने घसरली आहे. हा गेल्या ११ वर्षातला निचांक आहे. याच काळात ७३.९ टन सोन्याचे दागीने विकले गेले. लॉकडाऊनच्या चौथ्या चरणात ही विक्री वाढतच जाईल यात शंका नाही. 

वर्ल्ड गोल्ड कौन्सीलने पण याला दुजोरा दिला आहे. जर औद्योगिक वातावरण सुधारले नाही तर सोन्याशी संबंधित आर्थिक आणि हिंसक गुन्हेगारी पण वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

भारतीय संस्कृतीत सोन्याला पवित्र मानले जाते. त्यामुळे नाईलाज होईपर्यंत घरातील सोने बाजारात येणार नाही. पण नव्या दागिन्यांची मागणीच नसेल तर सोन्याचे भाव वाढत जाऊन अचानक घसरण्याची पण शक्यता आहे. भारतात सोन्याचा भाव अप्रत्यक्षरित्या डॉलरसोबत जोडलेला असतो. म्हणून सध्या रिझर्व बँकेची काय परिस्थिती आहे हे जाणून घेणे पण महत्वाचे आहे.

 ८ मे २०२० रोजी रिझर्व बँकेचा एकूण विदेशी चलनाचा साठा  रु.३६१२२७४ कोटी आहे. त्याची विभागणी अशी आहे. करन्सी अ‍ॅसेट रु. ३३८७२० कोटी आहे. रु.२४२३६० कोटी सोन्याच्या स्वरुपात आहेत. स्पेशल ड्रॉइंग राइट्सच्या रुपात रु.१०७०५ कोटी आहेत.  इंटरनॅशनल मॉनीटरी फंडात जमा रु.३०४८९ कोटी इतकी आहे. म्हणजेच रिझर्व बँक सध्यातरी 'सेफ' आहे. 

बोभाटाच्या वाचकांसाठी एक विशेष सूचना.  रिझर्व बँकेच्या या आकड्यांचा आणि कालच जाहीर झालेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा परस्परांशी काही संबंध नाही. आपण आता फक्त सोन्याचा वाढत जाणारा भाव आणि देशात उपलब्ध डॉलरचा साठा याबाबत बोलत आहोत.

सध्यातरी जगातील सर्व देश एकाच घडीचे प्रवासी असल्याने डॉलरचा भाव कमीजास्त होत राहील. पण आकस्मिक-अस्थिर किंवा चिंताजनक अशी वे़ळ येणार नाही. त्यामुळे सोन्याचे भाव घटले नाहीत तरी एका मर्यादेच्या पलीकडे जाणार नाहीत. पण ज्यांचा नाईलाज असेल त्यांना सोने विकण्याखेरीज दुसरा पर्याय नाही हे पण सत्य आहे.  

भारत जगातला सर्वात जास्त सोने साठवणारा देश आहे. अनेक देवस्थानात पडलेल्या सोन्याच्या साठ्याचा विचार केला तर आपल्याकडे एकूण ४००० टन सोने जमा आहे. आजचा सोन्याचा भाव विचारात घेता एक टन सोन्याची किंमत रु. ४६२८११०००० आहे. ४००० टन सोन्याची किंमत तुम्हीच गुणाकार करून शोधा !! 

गेले काही दिवस या सोन्याचा अर्थव्यवस्थेला काय फायदा होईल याची चर्चा चालू आहे. हा विषय धर्मासोबत जोडलेला असल्याने या चर्चेत 'बोभाटा'चा हा लेख आपले मत किंवा इतरांची मते मांडू इच्छित नाही. पण इतके आपण नक्की म्हणू शकतो की वरवर पाहता वाटणारी भीषण आर्थिक परिस्थिती आतून मजबूत आहे. त्यामुळे येत्या काळात जर घराघरातील सोन्याची विक्री बाजारात वाढली तरी तो दिर्घकालीन परिणाम नाही असेच  म्हणता येईल. 

सध्यातरी हे विषाणूचे संकट ज्या प्रमाणात ओसरेल त्या प्रमाणात सोन्याचा भाव वरखाली होत राहील असे वाटते. तुमचे मत काय आहे हे जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.