टी-सिरीज चा बादशहा - गुलशन कुमार !!!

९० च्या दशकातील संगीत म्हणजे संगीत क्षेत्रातला सुवर्णकाळ म्हणावा लागेल असाच होता. टिप्स, व्हीनस, मॅग्नासाउंड आणि टी-सिरीज या म्युझिक कंपन्यांमधली चढाओढ, कॅसेट्स विकत घेण्यासाठी लोकांच्या रांगा आणि कॅसेट्स विक्रीतून होणाऱ्या करोडोच्या उलाढालीत स्पर्धा. या स्पर्धेतून बॉलीवूड मध्ये झालेला अंडरवर्ल्डचा शिरकाव म्हणजे स्पर्धेचे किती विकृतीकरण झाले होते याचे उदाहरण. या सर्व गोष्टींनी रंगलेला काळ म्हणजे ९० चे दशक.

या संपूर्ण काळावर अधिराज्य गाजवणारा ‘मुगल’’ म्हणजे गुलशन कुमार. दिल्लीमाधल्या एका फळ विकणाऱ्याचा मुलगा पुढे म्युझिक इंडस्ट्रीमधला दिग्गज. लोकांना परवडतील असे स्वस्तातले कॅसेट्सची विक्री तसेच भजन आणि धार्मिक सांगिताला स्वतःचा चेहरा देऊन लोकप्रिय करणारे गुलशन कुमार. पुढे ‘आशिकी’, ‘कयामत से कयामत तक’ अश्या चित्रपटातील अस्सल हिट गाणी तयार करणाऱ्या टी-सिरीजचे मालक. म्युझिक इंडस्ट्रीतील एक आघाडीचे नाव आणि स्पर्धकांच्या कबाब मधली हड्डी बनून राहिलेले गुलशन. या चढाओढीत १९९७ साली त्यांची झालेली हत्या. गुलशन कुमार यांच्या जीवनाला अनेक पदर आहेत आणि याच सर्व घटनांना धरून २०१८ वर्षात ‘मोगल’ हा बयोपिक येऊ घातला आहे. गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात गुलशन कुमार यांच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसणार आहे तर जॉली एल. एल. बी. चे दिग्दर्शक सुभाष कपूर चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

गुलशन कुमारांच्या वादग्रस्थ जीवनावरील चित्रपट म्हटल्यावर कोणत्या घटना दिग्दर्शक दाखवेल असा प्रश्न पडतोच यातही जर निर्माता स्वतः गुलशन कुमार यांची पत्नी असेल तर चित्रपट किती तटस्थपणे भाष्य करेल हा मोठाच प्रश्न आहे. अक्षय नेहमीप्रमाणे आपली भूमिका चांगलीच रंगवेल यात वाद नाही पण गुलशन कुमारांना फक्त ‘लार्जर द्यान लाईफ’ चं दाखवायचं आहे असा हट्ट जर निर्माता आणि दिग्दर्शकांनी धरला तर अक्षयही काही करू शकणार नाही. सध्याच्या गोग्गोड बयोपिकच्या ट्रेंड मध्ये आणखी एक चित्रपटाची भर पडू नये असेच वाटते पण या अपेक्षा किती खऱ्या ठरतात ते चित्रपट प्रदर्शित झाल्यावरचं कळेल.

सबस्क्राईब करा

* indicates required