computer

हे उपाय करा आणि झोपेचं खोबरं टाळा..

झोपेतून उठल्यावर कधी कंबरेत उसण भरते तर कधी पायाला वात येतो. हे तर जाऊ दे, कधी रात्री झोप येत नाही, तर कधी मध्येच जाग आली तर पुन्हा झोप येणं अवघड होऊन बसतं. पण तुम्हांला माहित आहे का, हे झोपेचं  गणित नीट जमवणं काही फार अवघड नाही. 

पण कसं साधावं बरं हे? 

झोपेतून उठल्यावर खांदे दुखणे

झोपेतून उठल्यावर जर तुमचे खांदे दुखत असतील, तर पहिल्यांदा कुशीवर झोपणं बंद करा. हो, पण पोटावरही झोपू नका. 

पाठीवर झोपणं हा बर्‍याच आजारांवर मुख्य उपाय आहे. डोक्याखाली एक पातळ उशी घ्या आणि शक्यतो पोटावरही एक उशी घेऊन तिला पकडून झोपायचा प्रयत्न करा. त्यामुळं तुमचे खांदे योग्य स्थितीत राहतील आणि दुखणार नाहीत.

पाठीवर झोपणं अगदीच शक्य नसेल, तर जो खांदा कमी दुखतो, त्या बाजूच्या कुशीवर झोपायचा प्रयत्न करा. तेव्हा पाय पोटाशी घेऊन दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये उशी ठेवा. 

बर्‍याचजणांना डोक्याखाली हाताची उशी घेऊन झोपायची सवय असते. तीही चांगली नाही कारण त्यामुळं रात्रभर तुमचा खांदा विचित्र अवस्थेत राहतो आणि त्यामुळं खांदेदुखीचा त्रास होण्याची शक्यता वाढते. 

झोपेतून उठल्यावर पाठदुखीचा त्रास होणे..

तुम्हांला झोपेतून उठल्यावर पाठदुखीचा त्रास होत असेल, तर तुमच्या पाठीच्या कण्याची तुम्हांला काळजी घ्यायला हवीे, कदाचित त्याला हवा तसा नैसर्गिक आधार मिळत नाहीय. 

तुमची गादी खूपच मऊ असेल, तर ती आधी बदला. 

पाठीवर झोपणं हा या आजारावरही मुख्य उपाय आहे. पण झोपताना तुमच्या गुडघ्यांच्या खाली एक उशी घ्या. त्यामुळं होईल काय, की तुमच्या पाठीच्या कण्याला मूळचा नैसर्गिक बाक येईल  आणि तुमच्या स्नायूंमध्ये येणारा ताण कमी होईल. एखाद्या छोट्याशा रूमालाची सुरळी करून तुम्ही माकडहाडापाशी ठेवलीत तर अधिक आराम मिळेल. 

जर तुम्हांला कुशीवर झोपायची सवय असेल, आणि पाठीवर झोपणं जमत नसेल तर छातीशी पाय घेऊन अर्भकासारखं झोपा. यामुळंही पाठीला छानसा बाक येईल. तेव्हाही गुडघ्यांच्यामधेय एखादी पातळ उशी ठेवलीत तर पाठीला आणखी आराम मिळेल. 

झोपेतून उठल्यावर मान दुखते?

तुमच्या पाठीसारखीच मानेलाही आधाराची गरज असते. झोपेत तर हा आधार अधिकच असायला लागतो. 

खरंतर पाठीवर झोपून, डोक्याखाली एक उशी आणि दोन्ही हातांखाली दोन पातळ उशा असं झोपायला हवं. मानेचं दुखणं असणार्‍यांनी एकदा डॉक्टरचा सल्ला घेऊन त्याप्रमाणं उशीची निवड केलेली अधिक उत्तम!!

जर तुम्हांला कुशीवरच झोपायचं असेल, तर तुमची उशी खूप जाडजूड नसेल हे पाहा. उशीची उंची ही तुमच्या खांद्याहून अधिक असायला नको. जर उशी एकदम खांद्याच्या उंचीची असेल, तर मान अगदी सरळ अवस्थेत राहाते आणि कमी दुखते.

झोप येत नाही?

झोपायला जाताना सोबत फोन, टॅब किंवा कॉम्प्युटर सोबत घेऊच नका. थोडं अवघड आहे खरं, पण जमवाच. या यंत्रांच्या स्क्रीनच्या उजेडामुळे डोळ्यांवर ताण येतो. मध्येच जाग आल्यावर उगीच चाळा म्हणून तुम्ही फेसबुक नाहीतर व्हॉट्सऍप उघडता आणि पुढच्या झोपेचंही खोबरं होतंच होतं. 

रात्री झोपण्यापूर्वी कॉफी, सोडा, ब्लॅक टी, चॉकलेट्स इत्यादी गोष्टींचं सेवन टाळा. सकाळ-संध्याकाळ व्यायाम करणं हा ही झोप न येण्यावर चांगला उपाय आहे. त्यामुळे इतर फायदे होतात ते निराळेच!!

 

स्त्रोत

सबस्क्राईब करा

* indicates required