computer

५१ गेम्स अयशस्वी होऊनही हिंमतीने ब्लॉकबस्टर गेम देणारी कंपनी!! हा खेळ तुम्ही नक्कीच खेळला आहे!!

लहानपणी तुम्ही लगोरी खेळला असाल. ७ दगड एकमेकांवर रचायचे. दोन संघांपैकी एका संघातला गडी चेंडू मारून ही लगोरी पाडणार आणि ती परत उभी करण्यासाठी प्रयत्न करणार. दुसरा संघ हा पहिल्या संघाला लगोरी उभी करण्यापासून रोखणार. असा हा रोमांचक खेळ!!

लगोरी खेळामध्ये एक वेळ तुमचा नेम चुकला तरी चालेल, कारण तुम्हांला पुन्हा नेम घेऊन मारण्याची संधी असे, परंतु अँग्री बर्ड्स हा गेम बनवणाऱ्यांना मात्र पुन्हा संधी मिळणार नव्हती. तब्बल गेम्स बनवण्याच्या ५१ अयशस्वी प्रयत्नांनंतर आता यशस्वी होण्याशिवाय कोणताही दुसरा पर्याय त्यांच्यासमोर उरला नव्हता.

ही आहे रोव्हियो एंटरटेनमेंट ह्या गेम्स बनवणाऱ्या कंपनीची प्रेरणादायी यशोगाथा.

२००३ मध्ये हेलसिंकी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी मधील तीन मित्र; निकलास हेड, जार्नो वाकेवेनेन आणि किम डिकर्ट यांनी एका मोबाईल गेम डेव्हलपमेंट स्पर्धेत भाग घेतला. या तिघांनी 'किंग ऑफ द कॅबेज वर्ल्ड' हा खेळ बनवून ही स्पर्धा जिंकली. नंतर त्यांनी रिलूड नावाची कंपनी स्थापन केली, परंतु काही काळानंतर त्यांनी बनवलेला गेम सुमेया या व्हिडिओ गेम डेव्हलपरला विकला.

अशी बरीच वर्ष गेली. कंपनीने तब्बल ५१ गेम्सची निर्मिती केली, परंतु सर्व गेम्स अयशस्वी ठरत गेले. रोव्हियो एंटरटेनमेंट दिवाळखोरीच्या मार्गावर होती. फक्त १२ सोडून जवळपास सर्व कर्मचाऱ्यांना कंपनीने कामावरून काढून टाकले होते.

२००५ मध्ये रिलूडला पहिला गुंतवणूकदार मिळाला आणि कंपनीचे नांव रोव्हियो मोबाईल असे बदलले. पुढील दोन वर्षांत कंपनीने बरेच गेम्स बनवले, परंतु ते स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात अयशस्वी ठरले. या काळात रोव्हियोला मोठ्या गेम डेव्हलपर्सकडून स्पर्धेचा सामना करावा लागत होता.

२००७ मध्ये कंपनी बुडू लागली आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. याच काळात ॲपलने आयफोन लाँच केला आणि स्मार्टफोन उद्योग तेजीत आला. खरं तर तब्बल ५१ गेम्स बनवण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर एखाद्या कंपनीने परत त्या वाटेला न जाणंच पसंत केलं असतं. पण रोव्हियो मोबाईल ही काही लेचीपेची कंपनी नव्हती.‌ गेम्स बनवण्याचे ५१ अयशस्वी प्रयत्न म्हणजेच गेम्स बनवण्याचा प्रदीर्घ अनुभव कंपनीच्या गाठीशी होता.

रोव्हिओच्या संस्थापकांनी या घटनेकडे नवा गेम तयार करण्याची संधी म्हणून पाहिले. त्यांना एक असा गेम बनवायचा होता जो स्मार्टफोन वापरकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करेल. त्यांनी अत्यंत कमी बजेटमध्ये अँग्री बर्ड्सवर काम करायला सुरुवात केली. गेम तयार झाल्यानंतर त्यांनी ॲपलने तो गेम आयफोनवर ठेवावा म्हणून प्रयत्न केले आणि शेवटी २०११ मध्ये ॲपलने आपल्या ॲप स्टोअरवर गेम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रोव्हियो एंटरटेनमेंटने मागे वळून पाहिलेच नाही.

अँग्री बर्ड्स हा सर्वात लोकप्रिय मोबाइल गेम्सपैकी एक आहे. २०१३ मध्ये तो सर्वाधिक डाउनलोड केलेला गेम होता आणि ह्या गेमचे १ अब्जाहून अधिक डाउनलोड झाले. हा आतापर्यंतच्या सर्वोत्तम खेळांपैकी एक मानला जातो.

सहा महिन्यांत अँग्री बर्ड्स हा गेम ॲपल ॲप स्टोअरमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला. २०१४ मध्ये ॲपचे दोन अब्जाहून अधिक डाउनलोड झाले होते. अँग्री बर्ड्सच्या अभूतपूर्व यशानंतर रोव्हियोने अँग्री बर्ड्सची मालिका रिलीज केली जी खूपच लोकप्रिय झाली. २०१७ मध्ये कंपनीने $२०१ दशलक्ष इतकी कमाई केली. अँग्री बर्ड्स आजही आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट व्हिडिओ गेमपैकी एक मानला जातो. रोव्हियो एंटरटेनमेंट मध्ये सध्या जवळजवळ ५०० लोक काम करतात. अनेक गेम डेव्हलपर्सनी अँग्री बर्ड्सची कॉपी करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अयशस्वी ठरले.

 

रोव्हियो एंटरटेनमेंटची यशोगाथा खूपच प्रेरणादायी आहे. मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहे आणि अपयश हे आपल्याला दृढनिश्चय आणि समर्पण शिकवते. दुसरे म्हणजे आपण नेहमी आपल्या चुकांमधून शिकले पाहिजे. रोव्हियोला सुरुवातीच्या काळात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला, मात्र त्यांनी कधीही हार मानली नाही. आतां तर अँग्री बर्ड्सचे ४.५ अब्जाहून अधिक डाउनलोडस आणि ६८ हून अधिक देशांमधील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ह्या गेमच्या अतुलनीय यशाचे श्रेय जाते कठोर परिश्रम आणि प्रचंड दबावाखाली नवनिर्मिती करण्याची क्षमता या द्विसूत्रीला.

लेखक :चंद्रशेखर अनंत मराठे

सबस्क्राईब करा

* indicates required