computer

बाबा वेंगा आणि भविष्यवाणी!! २०२२ची अद्याप न घडलेली त्यांची ४ भाकितं काय आहेत? या बाई आहेत तरी कोण?

भविष्यवाणी या गोष्टीबद्दल एकंदर जगातच प्रचंड कुतूहल आहे. भारत त्याला अपवाद नाहीच. आपल्याकडे अनेक ठिकाणी भविष्य वर्तवणारे बसलेले असतात. अनेकांचा भविष्यवाणी या गोष्टीवर विश्वास आहे, तर अनेकांना हे थोतांड वाटते. काही असले तरी भविष्यवाणीबद्दल असलेले कुतूहल काही कमी होत नाही. जगात काही भविष्य व्यक्त करणाऱ्या प्रसिद्ध व्यक्ती होऊन गेल्या. मागे तर एक ऑक्टोपस जगात प्रसिद्ध झाला होता. यात नॉस्ट्रेडेमस तर इतका प्रसिद्ध आहे की कुणाचा अंदाज बरोबर आला तर त्याला नॉस्ट्रेडेमसच म्हटले जाते.

बाबा वेंगा नावाची एक आजी होऊन गेली. बल्गेरियन भाषेत याचा अर्थ होतो 'वेंगा आजी'. या आजींबद्दल वाचण्याआधी त्यांनी व्यक्त केलेल्या भविष्यवाणींची माहिती घेऊ. त्यांनी २०२२ सालासाठी एकूण ६ भविष्यवाणी केल्या आहेत. त्यात वर्तवलेल्या दोन भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. त्या दोन भविष्यवाणी म्हणजे आशियातील काही देशांना पुराचा सामना करावा लागेल. भारत आसाम पुराचा नुकताच सामना करत होता. बांगलादेश, थायलंड या देशांनाही पुराने झोडपून काढले. त्यांची अजून एक भविष्यवाणी म्हणजे काही ठिकाणी पाण्याची टंचाई भासेल. इटली सध्या प्रचंड मोठा दुष्काळ बघत आहे. पोर्तुगाल तसेच इतरही अनेक ठिकाणी ही समस्या आहेच.

उरलेल्या चार भविष्यवाणी म्हणजे: सायबेरिया मधून एक नवा व्हायरस जगात धुमाकूळ घालेल, यावर्षी पृथ्वीवर एलियन्स हल्ला करतील, लोकस्ट नावाचा किडा पिकांवर हल्ला करेल आणि व्हर्च्युअल रियालिटीचा वापर वाढेल. आता डिसेंबरपर्यंत हे खरे ठरतील म्हणून या बाबा वेंगावर पूर्ण विश्वास असलेले लोक टेन्शनमध्ये आहेत.

आता हे सर्व तुम्हाला काय विशेष नाही असे वाटत असेल, तर बाबा वेंगाने आधीही अनेक भविष्यवाणी सांगून त्या खऱ्या झाल्या आहेत. ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होतील, इंदिरा गांधी पंतप्रधान होतील अशा अनेक गोष्टी त्यांच्या खऱ्या ठरल्या आहेत. तेव्हापासून बाबा वेंगाभोवती वलय तयार झाले. तसेच २०२१ साली पिकांवर टोळधाड येईल आणि त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होईल अशीही एक भविष्यवाणी खरी ठरली होती, त्यामुळेच की काय बाबा वेंगाची भविष्यवाणी जगभर सिरीयलसली घेतली जाते. या वेंगाने ५०७९ पर्यंतची भविष्यवाणी सांगून ठेवली आहे. त्यापुढील काळाची भविष्यवाणी करण्याचा विषयच नाही, कारण जग त्यावर्षी संपणार आहे असेही त्यांनी सांगून ठेवले आहे.

बल्गेरिया या देशात १९११ साली त्यांचा जन्म झाला. वेंगेलिया पांडेवा गश्तेरोवा हे त्यांचे पूर्ण नाव. वय जेमतेम १०-१२ वर्ष असेल तेव्हा एका मोठ्या वादळात त्या सापडल्या आणि त्यातच त्यांची दृष्टी गेली. त्यांना वर्तमान तेव्हा दिसत नसले तरी भविष्य दिसते असा दावा केला जाऊ लागला. सुरुवातीला तर काही त्यांच्याकडे कोणी विशेष लक्ष दिले नाही. मात्र जेव्हा काही गोष्टी खऱ्या ठरल्या तेव्हा मात्र त्यांचे अनुयायी तयार व्हायला लागले. असे सांगितले जाते की आजवर त्यांच्या ७५ % भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत.

युरोप आणि रशियात तर त्यांना दीर्घकाळ मोठा मानसन्मान मिळाला होता. १९९६ साली वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला असला तरी दरवर्षी त्यांची चर्चा होतेच, एखादी मोठी घटना घडली की बातम्यांमध्ये बाबा वेंगा हे नाव झळकताना दिसेल. त्यांनी कसे हे आधीच सांगून ठेवले होते असा दावा केला जातो. बाबा वेंगाने झपाटून टाकलेल्या लोकांची संख्या जगात कमी नाही, त्यांच्याबद्दल आजवर अनेक पुस्तके आली आहेत, २०१६ ला एक बाबा वेंगा या नावाचा सिनेमाही आला होता. ९/११ चा हल्ला देखील त्यांनी आधीच सांगून ठेवला होता असेही बोलले जाते.

त्यांची प्रचंड लोकप्रियता जगभर वाढत होती, तेव्हा बल्गेरियाच्या सरकारने त्यांना सर्व सुविधा देऊ केल्या होत्या. जगभरातून लोक त्यांना भेटायला येत असत. १९७६ साली युगोस्लव्हिया येथील एक अभिनेत्री सिल्वाना त्यांना भेटायला आली होती. पण बाबा वेंगा बराच वेळ तिच्यासोबत काहीच बोलल्या नाहीत. शेवटी त्या एवढेच म्हणाल्या मला आता तुझ्यासोबत बोलायचे नाही, जा आणि तीन महिन्यांनी परत ये. जेव्हा सिल्वाना जायला लागली तेव्हा बाबा वेंगाने खरा बॉम्ब टाकला, "खरंतर तीन महिन्यांनी तू परत येऊ शकणार नाहीस, प्रयत्न करून बघ." सिल्वाना जीव जाण्याच्या भीतीने रडत रडत निघून गेली. पुढे दोन महिन्यांनी एका कार अपघातात ती मरण पावली.

अशा गूढ घटनांनी बाबा वेंगाबद्दल प्रचंड कुतूहल जगभर पसरले आहे. ते आजही कमी झालेले नाही. असे असूनही काही गोष्टी खऱ्या ठरल्या नाहीत असेही झाले आहे. १९९४ सालचा फिफा फायनल सामना दोन B पासून सुरू होणाऱ्या संघांमध्ये होईल, असे त्यांनी वर्तविले होते. एक फायनलिस्ट ब्राझील तर फायनलमध्ये गेला, पण बल्गेरिया इटलीकडून पराभव झाल्याने बाबा वेंगाची भविष्यवाणी खोटी ठरली. त्यांनी तिसरे महायुद्ध सुद्धा २०१० ला सुरू होऊन २०१४ ला संपेल असे म्हटले होते. पण ते ही काही खरे ठरले नाही.

बाबा वेंगाचे अनुयायी तर असेही सांगतात की, त्यांनी स्वतःचा मृत्यू कोणत्या दिवशी होईल हे देखील सांगितले होते. आपल्यानंतर फ्रान्स या देशात एक १० वर्षांची अंधत्व आलेली मुलगी याचप्रकारे भविष्य जाणून घेण्याचे वरदान घेऊन येणार असल्याचे त्यांनी सांगून ठेवले आहे. बाबा वेंगा हे नाव या सर्व गोष्टींमुळे प्रचंड रहस्यमयी आहे. त्यांच्यावर कित्येक लोकांनी अभ्यास करण्यासाठी आयुष्य वेचले आहे. पण त्यांनी जे काही वर्तवले ते नेमके खरे कसे ठरते त्याबद्दल ठोस असे कारण आजवर कुणालाच सापडले नाही.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required