computer

वसंतराव देशपांडे यांच्या जन्मदिनानिमित्ताने त्यांच्या गंडा-बंधनाची गोष्ट खास बोभाटाच्या वाचकांसाठी !!

आज पंडित वसंतराव देशपांडे यांचा जन्म दिवस आहे. पंडित वसंतराव देशपांडे हे किती थोर गायक होते हे आम्ही काय सांगणार ? त्यांचं नाव घेतलं की शास्त्रीय संगीताच्या चाहत्यांना त्यांचा गायलेला 'मारवा' आठवतो, काहीजण 'कट्यार काळजात घुसली' या नाटकातलं घेई छंद मकरंद गुणगुणायला सुरुवात करतात, तर काहींना 'अष्टविनायक चित्रपटातील 'प्रथम तुला वंदीतो' आठवतं ! आज त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या गंडा-बंधनाची गोष्ट आम्ही सांगतो आहोत. 

वसंतराव ज्या काळात गाणं शिकत होते किंवा गाणं शिकवणार्‍या गुरुच्या शोधात होते त्या काळात गाण्याइतकंच 'घराण्याला' महत्त्व होतं. आता संगीतासारख्या क्षेत्रात पण घराणेशाही कशी आली ती समजून घेऊ या. एक घराणं म्हणजे एक विद्यापीठ अशी संकल्पना डोळ्यासमोर आणा म्हणजे ही घराणेशाही समजायला सोपी जाईल. जसं प्रत्येक विद्यापीठाचं सिलॅबस थोडाफार बदलतं तसंच इथेही असतं. शास्त्र एकच पण सादरीकरणाची शैली घराण्याप्रमाणे बदलत असते. प्रत्येक घराण्याची परंपरा मौखिक असल्याने संगीत शिकायचं तर त्या शैलीला वाहून घेण्याची शपथ घ्यावी लागत असे. त्यामुळे एखादा विद्यार्थी निष्ठेच्या कसोटीला उतरत नाही तोपर्यंत त्याला दिक्षा मिळत नसे. पण काही व्यावहारीक कारणाने एकाच घराण्याचं संगीत शिकणं वसंतरावाच्या नशिबात नव्हतं. त्यांचं गाणं अनेक गुरुंनी समृध्द केलं आहे.

हे आताच्या काळात महत्त्वाचं वाटणार नाही पण त्या काळात गायकाची ओळख त्यांच्या घराण्यावरून ठरत असे. त्यामुळे वसंतरावांना या क्षेत्रातील प्रस्थापितांकडून  तिरकस बोलणे -टोमणे- हेटाळणी  सहन करावी लागली. पण अशाच एका प्रसंगी कोणीतरी मुद्दाम 'तुमचे घराणे कोणते' हा प्रश्न विचारलाच आणि त्यावर वसंतराव म्हणाले ' माझं घराणं माझ्यापासूनच सुरु होतं'. त्यानंतर हा प्रश्न विचारण्याचे धाडस कोणीही केलं नाही. हे धाडसी उत्तर देण्याची ताकद वसंतरावांनी त्यांच्या गाण्यातून सिध्द केली होती.त्यांनी अनेक गुरुंकडून शिक्षण घेतले. 'गंडा बंधन' अशा  गुरु -शिष्य परंपरेचा पाया असायचा. 

नुकतीच बंदिश बँडीट नावाची  एक मालिका जर तुम्ही बघितली असेल तर गंडा बांधन आणि तालीम हा किती कठीण विषय होता ते तुम्हाला कळलं असेलच. फार वर्षांपूर्वी 'किशोर' या मुलांच्या मासिकात वसंतराव देशपांड्यांच्या गंडा बंधन परंपरेबद्दल एक सुंदर लेख आला होता. त्यावेळी तरुण  वसंतराव लाहोरमध्ये होते. शास्त्रीय संगीताची दीक्षा देणारा गुरू शोधत होते. या दरम्यान एक सुफी अवलीयाची माहिती कोणीतरी सांगितली. गुरूने एखाद्या विद्यार्थ्याला शिष्य म्हणून मान्य करणे यासाठी त्या गुरूच्या हस्ते गंडा बंधन व्हावे लागते असे. या गंडा बंधन विधीचा अर्थ असा होता की गुरूच्या आज्ञेत राहून, गुरूच्या तालमीची बंधने पाळण्याचे मान्य करून, गुरू जे शिकवेल ते शिकायचे, रियाझ करायचा. साधना करायची. गुरुच्या चिजांवरच मेहेनत घ्यायची.  

तर गोष्ट अशी की या अवलीयाकडून गाणं शिकायला वसंतराव उत्सुक होते पण तावून सुलाखून घेतल्याखेरीज गुरु विद्यार्थ्याला जवळ करत नसे. बर्‍याच दिवसांच्या विनंती आर्जवांनंतर त्या अवलीयाने त्यांना शिष्य म्हणून स्विकारण्याचे मान्य केले. गंडा बंधन हा एक विधी असल्याने त्याची योग्य तयारी करावी लागत असे. या तयारीप्रमाणे  काळा गंडा -मिठाई- फुलांचे हार -सुगंधी धूप, गुरुला आवडणारी एखदी खास वस्तू आणि थोडे द्रव्य एका थाळीत घेऊन वसंतराव त्या फकीराने सांगीतलेल्या विहिरीजवळ पोहचले.
 

तो अवलिया आणि त्याचे इतर सूफी साथी त्यांना भेटले. विहिरीच्या कट्ट्यावर बसून गंडा बंधन  शास्त्राप्रमाणे पार पडले. आता वेळ आली होती प्रत्यक्ष तालमीच्या सुरुवातीची ! त्या अवलियाने विहिरीच्या पाण्यात एक खडा फेकून षड्ज लावला. त्यांच्या पाठोपाठ एकेक फकीराने पाण्यात खडे टाकत एकेक सूर लावला. संध्याकाळच्या खास राग 'मारवा'  ने शिक्षणाची सुरुवात झाली. त्या दिवसानंतर सहा महिने फक्त 'मारवा' या एकाच रागाची तालीम सुरु होती. एक दिवशी गुरुनी वसंतरावांना सांगितले आता तू गा ! त्यांचा मारवा ऐकल्यानंतर ते म्हणाले वा! झालं, संपली तुझी तालीम ! त्यावर वसंताराव म्हणाले अजून बाकीचे राग बाकी आहेत शिकायचे, ते कसे शिकू? त्यावर तो अवलिया म्हणाला' बेटा, एक साधे तो सब साधे- सब साधे तो कुछ ना साधे' ! आता तुला गाणं समजलं आहे, उरलेले राग कोण शिकवतं हा फक्त तपशिलाचा भाग आहे. 

त्यानंतर वसंतराव ठिकठिकाणी अनेक गुरुंकडून नवी तालीम घेत राहिले. आज वसंतराव नाहीत पण राहुल देशपांडेंच्या गाण्यात ते अधूनमधून भेटत असतात. तर वाचकहो, सांगायचं असं होतं की व्यक्ती महात्म्य घराण्यावर नाही तर ज्याच्या त्याच्या साधनेवर अवलंबून असतं ! तुम्ही कोणत्या विद्यापीठात शिकता हे महत्त्वाचं नाही तर तुम्ही काय शिकता हे महत्त्वाचं आहे !

सबस्क्राईब करा

* indicates required