computer

या सिनेमांची रिलीज होण्यापूर्वी काय नावं होती माहीत आहे का ?

याआधीसुद्धा अनेक सिनेमांवर वाद झालेत, पण पद्मावतीचा वाद काही औरच होता राव. फिल्म रिलीज होण्याची थांबवली, संजय लीला भन्साळी यांना धक्का बुक्की झाली, फिल्मचा सेट जाळला, दीपिकाचं नाक कापण्यासाठी बक्षीस आयोजित केलं, आंदोलन झाली वगैरे वगैरे. आता एवढं सगळं होऊन वातावरण शांत होणार, तेवढ्यात नवीन बातमी आली की पद्मावती हे नाव बदलून सिनेमाला ‘पद्मावत’ नाव देण्यात येणार आहे. म्हणजे ही कथा पद्मावत या महाकाव्यावरून घेण्यात आली आहे हे यातून सिद्ध होईल. 

मंडळी, वाद निर्माण होणे हे काही नवीन नाही आणि वादातून फिल्मचं नावच बदलणे हेही काही नवीन नाही. आज आपण बघणार आहोत अशाच वादातून नाव बदलण्यात आलेले ६ सिनेमे.

१. रॅम्बो राजकुमार - आर...राजकुमार

शाहीदचा हा सिनेमा जबरदस्त हिट झाला होता. त्याचं खरं नाव होतं ‘रॅम्बो राजकुमार’.  पण हॉलीवूडच्या रॅम्बो फिल्म्सच्या निर्मात्यांनी यावर आक्षेप घेतला आणि त्याचं नाव आर...राजकुमार झालं. जास्त वाद न करता सिनेमाचं नाव बदललं, पण त्यात रॅम्बोची झलक दिसतेच.

२. साली कुतीया - कट्टी बट्टी

कट्टी बट्टी सिनेमा आपल्याला आता आठवतही नसेल. आठवत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. हा सिनेमा कंगना आणि इम्रान खानचा होता. या सिनेमाचं खरं नाव होतं ‘साली कुतीय’. हे थोडं विचित्र आणि आक्षेपार्ह नाव दिग्दर्शकाने सिनेमाला दिलं होतं, पण रिलीज होण्याच्या आधीच त्यांनी स्वतःहून नाव बदललं. पुढचा वाद होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता.

३. जाफना – मद्रास कॅफे

मद्रास कॅफे हा सिनेमा राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित होता. या हत्येशी निगडीत असलेल्या जाफना या श्रीलंकेच्या शहराचं नाव सिनेमाला देण्यात आलं होतं. पण श्रीलंकेच्या दबावामुळे नाव बदलून ‘मद्रास कॅफे’ ठेवण्यात आलं. मद्रास कॅफे नाव हे एका अर्थी समर्पक ठरलं, कारण याच कॅफेमध्ये राजीव हत्येचा कट शिजला होता.

४. बिल्लू बार्बर – बिल्लू

तुम्हाला प्रश्न पडेल बिल्लू बर्बर या नावात आक्षेपार्ह काय आहे? यातील बार्बर शब्द हाच वादाचा मुद्दा ठरला. हा एक जातीवाचक शब्द असल्याने या शब्दावर आक्षेप घेण्यात आला. शेवटी बार्बर शब्द वगळण्यात आला.

५. रामलीला – गोलियों की रासलीला- रामलीला

लिस्टीतला संजय लीला भन्साळी यांचा आणखी एक सिनेमा. तसा या सिनेमाचा आणि रामायणाचा काही संबंध नाही. रामलीला हा शब्दच मुळात ‘राम’ आणि ‘लीला’ या पात्रांवरून घेतली आहेत. पण लोकांनी याला आक्षेपार्ह ठरवलं. शेवटी फिल्मचं नाव बदलून ‘गोलियों की रासलीला- रामलीला’ ठेवण्यात आलं.

६. सेक्सी दुर्गा - एस दुर्गा

एस दुर्गाचं पूर्वीचं नाव सेक्सी दुर्गा हे अत्यंत वादग्रस्त ठरलं. देवी दुर्गाच्या नावाबरोबर सेक्सी शब्द लोकांच्या पचनी पडला नाही. शेवटी सिनेमाला ‘एस दुर्गा’ करण्यात आलं. नाव बदलूनही वाद थांबले नाहीत राव. गोव्याच्या फिल्म फेस्टिवलमधून या फिल्मला काहीही कारण न देता काढून टाकण्यात आलं.

हल्ली सिनेमा, त्याचं नाव, त्यातील विषय, एखादा सीन, डायलॉग असं काहीही आक्षेपार्ह ठरू शकतं. सिनेमा बनवणं हल्ली आणखी अवघड होऊन बसलं आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required