राहुल द्रविडला गुंडा बनवण्यापासून ते कुमार सानूला इंश्युरंस विकायला लावण्यापर्यंत...या विचित्र जाहिरातींमागे डोकं कोणाचं आहे?
जाहिराती लागल्या की कार्यक्रमात व्यत्यय येतो आणि आपण चॅनेल बदलून टाकतो. पण काही निवडक जाहिराती आपल्याला इतक्या आवडतात की आपण चॅनेल बदलूच शकत नाही. काहींची गाणी म्हणजे जिंगल आवडत असतात तर काहींमध्ये असलेले नायक नायिकेचे चेहरे. आता जसा काळ बदलला तसा जाहिरातींमध्येही अमूलाग्र बदल झालेत. म्हणजे अगदी अलीकडची राहुल द्रविड ची 'गुंडा' जाहिरात. किती हिट झाली ती तुम्हाला माहित असेलच. राहुल द्रविडचे नवे रूप सगळ्यांनाच आवडले. ही जाहिरात होती भारतीय क्रेड कंपनीची.
या कंपनीची ही एकच जाहिरात प्रसिद्ध झाली आहे असे नाही. क्रेडने जाहिरातींची एक मालिकाच आणली आहे. पण या अश्या हटके जाहिरातींमागे नक्की डोके कोणाचे, हा प्रश्न तुम्हाला तुम्हाला पडला असेल तर हा लेख नक्की वाचा.
राहुल द्रविडची जाहिरात खूप गाजलीच आणि सगळीकडे व्हायरल झाली. अजून एक जाहिरात आपण पहिली असेल, ज्यामध्ये जॅकी श्रॉफ झुम्बा करतोय, तसेच अनिल कपूर, माधुरी दीक्षित, गोविंदा आणि संगीतकार बप्पी लाहिरी यासारख्या दिग्गज बॉलिवूड सेलिब्रिटी ऑडिशन देतात पण कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. एवढंच नाही तर खुद्द कुमार सानू सेल्समन बनून दारात अवतरतो.
क्रेडच्या या जाहिरातींनी असे बरेच धक्के दिले आहेत. आणि सोबत हसवलं देखील आहे.
या अश्या आउट-ऑफ-द बॉक्स जाहिरातींमागे कोणीही जाहिरात कंपनी नसून हा लेखक आणि निर्मात्यांचा ग्रुप आहे. हा ग्रुप एकेकाळी प्रसिद्ध युट्युब चॅनेल AIB चा एक भाग होता. लेखकांच्या टीममध्ये तन्मय भट, देवय्या बोपन्ना, पुनीत चड्ढा, नुपूर पै आणि विशाल दयमा यांचा समावेश आहे. यापैकी बहुतेकजण जाहिरात आणि मिडिया क्षेत्रातील आहेत.
तन्मय भटला सगळेजण ओळखतात. तो सुप्रसिद्ध स्टँडअप कॅमेडीयन आहे त्याचे युट्यूब चॅनेल पण आहे. त्यांनी यूटीव्ही बिंदास, एमटीव्ही आणि डिस्ने इंडिया सारख्या वाहिन्यांसाठी काम केले आहे. पुनीत चढा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्यानेही AIB मध्ये लेखक म्हणून काम केले आहे. देवय्या बोपन्ना फर्म ऑल थिंग्ज स्मॉल (एटीएस) ही स्वतंत्र मिडिया कंपनी चालवितो. नूपुर पै ही नेटफ्लिक्सच्या लिटल थिंग्जची (सिझन३, ४) सहलेखिका आहे.
अशी ही वेगळ्या डोक्यालिटीची टीम एकत्र येऊन टीव्हीवर जाहिरातींचे नवे युग आणत आहे. या टीम कडून आणखी नवीन जाहिराती येतील आणि प्रेक्षकांना अजून मजा येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
लेखिका: शीतल दरंदळे




