कहानीमें नया ट्विस्ट!! कॅडबरी डेअरी मिल्कची ही नवी जाहिरात आवडली का?
90 च्या दशकातली कॅडबरी डेअरी मिल्कची जाहिरात आठवते का? "कुछ खास हैं हम सभी में" अशी त्याची जिंगल सुरू होते. त्यावेळी कॅडबरीची ही जाहिरात सगळ्यांना आवडली होती. शंकर महादेवनचा आवाज, क्रिकेटचे मैदान आणि एक मुलगी मॅच जिंकल्यावर नाचत मैदानात शिरते. तिच्या हातात कॅडबरी डेअरी मिल्क! तिच्या मित्राला म्हणजे बॅटसमॅनला ती कॅडबरी देते आणि मिठी मारते. या जुन्या जाहिरातीची आठवण काढायचे कारण म्हणजे अलीकडेच कॅडबरी डेअरी मिल्कची (Cadbury Dairy Milk) एक नवीन जाहिरात सोशल मीडिया युझर्सकडून पसंत केली जात आहे. ही जाहिरात जोरदार व्हायरल होत आहे.
ही नवी जाहिरात म्हणजे जुन्या जाहिरातीचाच ट्विस्ट आहे. म्हणजे या व्हिडिओमध्ये पुरुषांऐवजी महिलांचा क्रिकेट सामना सुरु आहे, यात एका महिला फलंदाजाच्या 99 धावा पूर्ण झाल्या आहेत, त्यानंतर तिने पुढच्या चेंडूवर शानदार षटकार ठोकला. हे पाहून एक प्रेक्षक, ज्याच्या हातात कॅडबरी चॉकलेट आहे, तो खूप आनंदीत होऊन मैदानावर येतो आणि नाचू लागतो. आणि येऊन जिने शतक ठोकले आहे त्या क्रिकेटपटूला चॉकलेट खायला देतो.
ही जाहिरात इतकी आडवली गेली की सोशल मीडियावर खूप वेळा शेअर झाली. अनेकांनी आपल्या मित्रांना टॅग करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीविषयी, बातमीविषयी, व्हिडीओविषयी चर्चा सुरु असतातच. आवडल्यास कौतुक नाहीतर ट्रोल हा सोपा फंडा असतो!
तुम्ही ही नवी जाहिरात पाहिलेली आहे का? तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा.
शीतल दरंदळे




