computer

दो बूंद जिंदगी के म्हणत जाहिरात केलेल्या पोलिओ लसीमागील इतिहास समजावून घ्या

दो बूंद जिंदगी के' हे अख्ख्या देशात प्रसिद्ध झालेलं वाक्य. काही वर्षांपासून ही जाहिरात आणि मुख्यतः तिची टॅगलाईन ठरावीक काळात प्रसार माध्यमांवर डोकावत राहते. एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच, आम्ही कशाबद्दल बोलत आहोत ते. ही जाहिरात आहे पोलिओ लसीकरणाची.

पोलिओ हा थेट माणसाच्या मज्जासंस्थेवर परिणाम करणारा विषाणूजन्य आजार आहे. त्यामुळेच त्याचा सगळ्यात जास्त दिसून येणारा परिणाम म्हणजे अपंगत्व. ह्या आजारावरची लस ही जोनास साल्क या त्याच्या अमेरिकन संशोधकाच्या नावाने साल्क लस म्हणून ओळखली जाते. साल्क हा अमेरिकन फिजिशियन होता, त्याने १९५५ मध्ये इनऍक्टिव्हेटेड पोलिओ व्हायरस व्हॅक्सिन विकसित केलं. यात मृत विषाणू वापरला गेला होता. त्याआधीही मॉरिस ब्रॉडी, जॉन कोल्मर यांसारख्या शास्त्रज्ञांनी पोलिओ लसनिर्मितीसाठी अयशस्वी प्रयत्न केले होते. ब्रॉडी याने इनऍक्टिव्हेटेड व्हॅक्सिनचा वीस माकडांवर आणि सुमारे ३००० मुलांवर प्रयोगही केला होता! पण हे प्रभावी न ठरल्याने त्याचा वापर थांबवला गेला.
 

त्याकाळी आजच्यासारखे 'दो बूंद' स्वरूपात पोलिओ डोस दिले जात नसत. साल्क लस इंजेक्शनद्वारे दिली जायची. १९५४ मध्ये ती लस पोलिओ विषाणूच्या तिन्ही प्रकारांवर प्रभावी ठरल्याचं स्पष्ट झालं. अमेरिकेत विद्यार्थ्यांमध्ये या आजाराने रौद्र रूप धारण केलं आणि मोठ्या प्रमाणावर पोलिओचे रुग्ण समोर आले, त्यावेळी या व्हॅक्सिनची व्याप्ती वाढायला सुरुवात झाली.

१९६० मध्ये या व्हॅक्सिनच्या विकसनाला एक वेगळं वळण मिळालं. या वर्षी अल्बर्ट सबिन या मायक्रोबायोलॉजिस्टने तोंडाने घ्यायची पोलिओ लस विकसित केली. त्याच्या नावावरून या लसीला सबिन लस असं संबोधलं जातं. सुरुवातीच्या काळातली लस आणि तोंडाने घ्यायची लस यांच्यात मुख्य फरक हा होता की तोंडाने घ्यायच्या लसीमध्ये कमी प्रभावी असलेला जिवंत विषाणू वापरला जातो. याला म्हणतात लाईव्ह व्हॅक्सिन किंवा जिवंत लस. याचे निष्कर्ष प्रभावी ठरले आणि पोलिओचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालं.

लसीमधला विषाणू जिवंत असो वा मृत, त्यात पीव्ही-1, पीव्ही-2, पीव्ही-3 या पोलिओच्या तिन्ही प्रकारचे म्हणजेच सिरोटाईप्सचे किंवा त्यापैकी एक किंवा दोन विषाणूंचे स्ट्रेन्स असू शकतात. या सर्व सिरोटाईप्सचा, वेगवेगळी रूपं असली तरी, एकमेकांशी जवळचा संबंध असतो. साधारणतः दोन्ही प्रकारच्या व्हॅक्सिनचे ३ डोस दिले जातात. तर शाळेत जाण्याच्या वयातल्या मुलांना चौथा म्हणजे बूस्टर डोस दिला जातो.

१९९० च्या दशकात काही देशांत या रोगाचा आलेख उतरायला सुरुवात झाली. त्याचदरम्यान बायव्हॅलंट ओरल व्हॅक्सिन जास्त परिणामकारक ठरलं. यामुळेही पोलिओप्रभावित क्षेत्रात पोलिओच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली. अजूनही पोलिओविरुद्ध सुरू असलेली लढाई पूर्णपणे संपलेली नाही. पोलिओ लसीकरणाची माहिती देणारी जाहिरात दिसते, ऐकू येते त्यावेळी हे युद्ध सुरू असल्याची जाणीव होते.

सबस्क्राईब करा

* indicates required