computer

व्हॅक्सिनचा इतिहास: अफ्रिकन गुलामाच्या मदतीमुळे देवीरोगाने बाधित होऊ शकणाऱ्या कित्येक पिढ्यांना कसे जीवनदान मिळाले?

स्मॉलपॉक्स या नावाने जगभरात ओळखला जाणारा रोग म्हणजेच देवी. देवी हा जगातला सगळ्यात जुना आणि घातक असा संसर्गजन्य आजार होता. सुमारे १२,००० वर्षांपूर्वी शेतीची सुरुवात झाली आणि माणूस भटकं आयुष्य सोडून वसाहती करून राहायला लागला तेव्हापासून देवीचा आजार अस्तित्वात आहे असा समज आहे.

तीन हजार वर्षांपूर्वीचा इजिप्तचा फॅरो पाचवा रॅमसेस याच्या ममीच्या चेहऱ्यावरील व्रण हा देवीच्या आजाराचा सगळ्यात जुना पुरावा आहे. भारतीय वैद्यकशास्त्राच्या ग्रंथातही ‘शितला’ या नावाने देवीचा उल्लेख आढळतो. ही ‘शितला’ देवीच्या आजाराची देवता मानली जायची. या देवीच्या प्रकोपाने आजार होतो आणि तिच्याच प्रार्थनेने तो बरा होतो अशी समजूत होती.

केवळ भारतातच नाही, तर जगभरात हा रोग देवीचा कोप झाल्यामुळे होतो अशी समजूत होती. पुढे हा रोग विषाणूमुळे होतो असं सिद्ध झालं. व्हेरिओला हे त्या विषाणूचं नाव. देवीची साथ आली की ती गावंच्या गावं उद्ध्वस्त करून जायची. जगभरात त्याच्यावर प्रभावी उपचार शोधण्यासाठी प्रयत्न सुरू होते. यथावकाश त्याच्यावर लसही आली. पण मुळात या संशोधनास चक्क एक आफ्रिकन गुलाम कारणीभूत ठरला हे तुम्हाला माहिती आहे का? आज जरी आपल्याला एडवर्ड जेन्नर या संशोधकाने स्मॉलपॉक्स म्हणजे देवीवरचं व्हॅक्सिन विकसित केल्याचं माहिती असलं, तरी त्याच्या शंभर वर्षं आधी अनेसीमस नावाच्या आफ्रिकन गुलामामुळे देवीवरच्या उपचारांची नवीन पद्धत पाश्चात्य जगाला कळली होती.

हा अनेसीमस अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात बॉस्टन इथल्या कॉटन मॅथर नावाच्या मंत्र्याचा नोकर होता. त्याने आफ्रिकेतून या गुलामाला विकत घेतलं होतं. त्याकाळी इतर अनेक ठिकाणांप्रमाणे बॉस्टनही देवीच्या उद्रेकामुळे ग्रासलेलं होतं. हा मॅथर तसा पक्का कर्मठ ख्रिश्चन. प्रत्येक गोऱ्या मालकाने आपल्या या गुलामांना ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावावा आणि शिक्षणाची सोय करावी अशा मताचा. तसा त्याचा अनेसीमसवरही विश्वास नव्हता. पण एकदा असंच बोलताना या गुलामाने त्याला आफ्रिकेत यापूर्वी देवी येऊन गेल्या आहेत असं सांगितलं आणि आफ्रिकेतले लोक पारंपरिक पद्धतीने यावर कसे उपचार करतात याची माहिती दिली. या तंत्राचं नाव होतं व्हेरिओलेशन.

व्हेरिओलेशनमध्ये देवीच्या रुग्णांच्या शरीरावरच्या जखमांमधून 'पू' काढून घेत आणि निरोगी व्यक्तीच्या त्वचेवर एक लहानसा छेद देऊन त्यामध्ये हा पू भरत. ही सगळी प्रक्रिया वैदूंच्या निगराणीखाली चालायची. यामुळे रोग झाला तरी त्याची तीव्रता कमी असते, असं सिद्ध झालं होतं. अर्थातच या पद्धतीचे काही धोकेही होते. काही लोकांना याचा फारसा उपयोग होत नव्हता आणि त्या रोगाला बळी पडत होते. क्वचित मृत्युमुखीही पडत होते. पण त्यांचं प्रमाण निश्‍चितच कमी होतं. हे ऐकल्यावर मॅथरने याबाबत थोडं संशोधन केलं, इतर गुलामांना विचारलं तेव्हा त्याला कळलं की जगातल्या इतर भागांमध्ये, विशेषकरून तुर्कस्थान आणि चीनमध्येसुद्धा ही पद्धत थोड्याफार फरकाने वापरली जात आहे. ही पद्धत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी इतकी प्रभावी होती की अशा प्रकारच्या व्हेरिओलेशनच्या खुणा शरीरावर असणार्‍या गुलामांचा भावसुद्धा जास्त असायचा.

मॅथरने हा प्रयोग आपल्या ताब्यात असलेल्या वसाहतींमध्ये करायचं ठरवलं. त्याला अर्थातच सुरुवातीला भरपूर विरोध झाला. अगदी त्याच्या घराच्या खिडकीतून स्फोट घडवणारं उपकरण फेकून त्याला धमकावण्याचा प्रयत्नही झाला. १७२१ मध्ये बॉस्टनची अर्धी लोकसंख्या देवीने ग्रस्त होती. तरीही देवीच्या कोपाला अशा प्रकारे आव्हान देणं अनेकांच्या मते चुकीचं होतं. शिवाय हा उपचार आफ्रिकन होता, त्यामुळे त्याच्याकडे 'खेडवळ लोकांचे गावठी उपचार' अशा दृष्टिकोनातून काहीसं उपेक्षेच्या नजरेने पाहिलं जात होतं. अखेर बॉईलस्टन नावाच्या डॉक्टरने व्हेरिओलेशनचा प्रयोग आपल्या स्वतःच्या मुलावर आणि आपल्या ताब्यात असलेल्या गुलामांवर केला. त्याचा चांगला परिणाम दिसायला लागला हळूहळू इतर वसाहतींनी हा प्रयोग राबवायला सुरुवात केली.

पुढे १७९६ मध्ये एडवर्ड जेन्नरने एक अफलातून प्रयोग केला. त्याला माहीत होते की ‘काऊपॉक्स’ हा गायीच्या स्तनांना होणारा आजार गवळणींना एकदा होऊन गेला की त्यांना कधीच देवी होत नाही. हा आजार फक्त गायींच्या स्तनांच्या संपर्कात आलेल्या शरीराच्या भागातच होतो. जेन्नरने सारा नेम्स या गवळणीच्या बोटावरील पुरळातील पू काढून तो ‘जेम्स फिप्स’ या आठ वर्षीय मुलाच्या त्वचेवर टोचला. आठवडाभराने त्याला ताप व टोचलेल्या जागी छोट्या पुटकुळ्या अशी लक्षणं दिसू लागली. काही दिवसांनी ती कमीही झाली. मग त्या मुलाला देवीच्या विषाणूच्या संपर्कात नेऊनही त्याला संसर्ग झाला नाही. नंतरच्या देवीच्या साथीतही तो सुरक्षित राहिला. नंतर जेन्नरने स्वतःच्या मुलासह आणखी काही लोकांवर हे प्रयोग केले. सगळ्यांनाच देवीपासून संरक्षण मिळालं. या प्रक्रियेला जेन्नरने ‘व्हॅक्सीनेशन’ असं नाव दिलं. व्हॅक्सा म्हणजे लॅटिन भाषेत गाय.

जेन्नरने शोधलेलं व्हॅक्सिन हे व्हेरिओलेशन पेक्षा जास्त प्रभावी असल्याचा निष्कर्ष काढला गेला. त्यामुळे व्हेरिओलेशनला पूर्णविराम मिळाला. अनेसीमसला त्याच्या या कामगिरीबद्दल काही प्रमाणात स्वातंत्र्य मिळालं(असं म्हणतात, तेही त्याने खरेदी केलं!) तरी तो अखेरपर्यंत मॅथरच्याच गुलामीत राहिला. पण म्हणून त्याने जगाला दिलेल्या, पारंपरिक ज्ञानातून आलेल्या व्हेरिओलेशनच्या तंत्राची किंमत कमी होत नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required