computer

व्यंकटेश अय्यर : CA, MBA होता होता क्रिकेटर झालेल्या या खेळाडूबद्दल जाणून तर घ्या!

आपल्या दुसऱ्याच आयपीएल सामन्यात अर्धशतक ठोकून सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा कोलकाता नाईट रायडर्सचा व्यंकटेश अय्यर हा खेळाडू वेगळा आहे हे तर कळून चुकले आहे. पण त्याचा प्रवासही तितकाच भन्नाट आहे. आज या खेळाडूचा हाच प्रवास आपण समजून घेणार आहोत.

व्यंकटेश जरी दक्षिण भारतीय असला तरी त्याचे आईवडिल दोन्ही मध्यप्रदेशातल्या इंदूर येथे नोकरीला होते. तेथेच तो लहानाचा मोठा झाला. सहसा असे होते की आईवडील मुलांना खेळण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष द्यायला सांगतात, पण या भावाच्या बाबतीत वेगळे होते. त्याचे आईवडील त्याला खेळण्यासाठी प्रोत्साहित करत, पण त्याचे चित्त अभ्यासात जास्त होते.

मजा म्हणून क्रिकेट खेळताना तो कधी क्रिकेटचा मास्टर झाला त्याला पण समजले नाही. बी. कॉम.ला ऍडमिशन घेऊन त्याने सीएची तयारी सुरु केली होती. सीए इंटरमीडियट पण त्याने पास केली होती. पण त्याचे मन बदलले आणि त्याने सीए सोडून एम.बी.ए. ला ऍडमिशन घेतले.

आता पुन्हा त्याला क्रिकेटने ओढून घेतले. त्याची कामगिरी बघून त्याला कॉलेजने उपस्थितीचे बंधन सोडून दिले. २०१५ सालीच तो मध्यप्रदेश क्रिकेटचा स्टार झाला होता. २०१८ साली त्याला चांगली नोकरी मिळत होती. पण तोपर्यंत आपण क्रिकेटमध्ये करियर करू असा आत्मविश्वास आला होता. खरोखर २०१८-१९ च्या रणजीसाठी त्याची निवड करण्यात आली.

या स्पर्धेत अवघ्या ५ सामन्यांत त्याने २२७ रन कुटले. पुढे विजय हजारे ट्रॉफीत तर त्याने १४६ बॉल्सवर १९८ धावांची खेळी करत लाईम लाईट खेचली. आता पाळी आयपीएलची होती. यंदा त्याला कोलकाताने विकत घेतले. एप्रिलमध्ये झालेल्या सामन्यांत त्याला एकदाही संधी मिळाली नाही. आता पुन्हा आयपीएल सुरू झाल्यावर मात्र आरसीबी विरुद्ध त्याला उतरविण्यात आले.

२७ बॉल्सवर १ सिक्स आणि ६ फोर मारत ४१ धावा केल्या. दुसरा सामना मुंबई विरुद्ध होता. गेल्या सामन्यात हुकलेल्या अर्धशतकाची भरपई त्याने या सामन्यात केली. पहिल्याच बॉलवर सिक्स मारत त्याने दमदार एंट्री केली. पुढे ३० बॉल्सवर ५० धावा करत आपण लंबी रेस का घोडा आहोत हे त्याने सिद्ध केले आहे.

आता पुढील सामन्यात त्याचा हाच फॉर्म राहिल्यास त्याला भारतीय संघाचे दरवाजे उघडायला वेळ लागणार नाही.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required