हे आहेत टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज, यादीत फक्त एकच फास्ट बॉलर?
टी -२० क्रिकेटची सुरुवात २००५ मध्ये झाली होती. तर २००७ मध्ये पहिली टी -२० विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पाकिस्तान संघाला अंतिम सामन्यात पराभूत करत भारतीय संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत अनेक सामने खेळले गेले आहेत. फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला आहे. तर गोलंदाजांनी अनेक फलंदाजांना माघारी धाडलं आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का? टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम कोणत्या गोलंदाजांच्या नावावर आहे? चला तर जाणून घेऊया. (Highest wicket takers in T20 cricket)
५) शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) :
बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन या यादीत पाचव्या स्थानी आहे. शाकिब अल हसन जगभरातील अनेक लीग स्पर्धांमध्ये सहभाग घेत असतो. त्याने ३६४ सामन्यांमध्ये ४१६ गडी बाद केले आहेत. तर टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे. त्याने ११९ गडी बाद केले आहेत.
४) सुनील नरेन (Sunil Narine) :
वेस्ट इंडीजचा फिरकी गोलंदाज सुनील नरेन या यादीत चौथ्या स्थानी आहे. सुनील नारायण देखील जगभरातील क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभाग घेत असतो. टी -२० क्रिकेटमध्ये त्याने एकूण ४०३ सामने खेळले आहेत. ज्यात त्याने ४३७ गडी बाद केले आहेत. तर टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ५२ गडी बाद केले आहेत. आयपीएल स्पर्धेत तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करतोय.
३)राशिद खान ( Rashid khan) :
अफगानिस्तान संघाचा लेग स्पिनर राशिद खान या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. अगदी कमी वयात राशिद खानने अनेक दिग्गजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. जगभरातील टी २० लीग स्पर्धा खेळताना त्याने ३२३ सामने खेळले आहेत. ज्यात त्याने आतापर्यंत ४५० गडी बाद केले आहेत. आयपीएल २०२२ स्पर्धेत त्याने गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या संघाला जेतेपद मिळवून देण्यात राशिद खानने मोलाची भूमिका बजावली होती.
२) इमरान ताहीर (Imran Tahir) :
दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इमरान ताहीर या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. इमरान ताहीर बद्दल बोलायचं झालं तर तो टी -२० क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी देखील तो जगभरातील लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसून येत असतो. ज्यामध्ये सीपीएल, आयपीएल आणि बिग बॅश लीग स्पर्धेचा समावेश आहे. या स्पर्धांमध्ये खेळताना त्याने आतापर्यंत एकूण ३५६ सामने खेळले आहेत. ज्यात त्याने ४५१ गडी बाद केले आहेत.
१) ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) :
टी -२० क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंची यादी पाहिली तर ड्वेन ब्रावो हे नाव सर्वात पुढे असेल. आयपीएल आणि जगभरातील अनेक टी -२० लीग स्पर्धांमध्ये त्याच्या तुफान फटकेबाजी आणि अप्रतिम गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली आहे. त्याने आतापर्यंत एकूण ५३१ सामने खेळले आहेत. ज्यात त्याने २४ च्या सरासरीने विक्रमी ५८७ गडी बाद केले आहेत.
काय वाटतं? असा कुठला भारतीय गोलंदाज आहे जो या यादीत अव्वल स्थान गाठू शकतो? कमेंट करून नक्की सांगा..




