आयपीएल २०२३ स्पर्धेच्या लिलावात हे ५ खेळाडू होऊ शकतात मालामाल! लागू शकते कोट्यावधींची बोली...
जगातील सर्वात मोठी लीग स्पर्धा आयपीएल स्पर्धेचे १६ वे हंगाम सुरू व्हायला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी मिनी ऑक्शन २३ डिसेंबर २०२२ रोजी कोची येथे पार पडणार आहे. तर १५ नोव्हेंबर रोजी सर्व संघांनी आपल्या रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी पाकिस्तान वगळता अनेक देशातील खेळाडू नाव नोंदणी करत असतात. मात्र काही मोजकेच खेळाडू असतात,ज्यांचे आयपीएल खेळण्याचे स्वप्नं पूर्ण होते. आज आम्ही तुम्हाला अशा ५ खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांच्यावर आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी होणाऱ्या मिनी ऑक्शनमध्ये मोठी बोली लागू शकते. चला तर पाहूया.
१) जोशुआ लिटिल :
जोशुआ लिटिलने अप्रतिम गोलंदाजी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जोशुआ लिटिलने यावर्षी एकूण २६ टी -२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ७.५८ च्या ईकोनॉमीने ३९ गडी बाद केले आहेत. आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत त्याने आयर्लंड संघासाठी अप्रतिम गोलंदाजी केली होती. या स्पर्धेतील ७ सामन्यांमध्ये त्याने ११ गडी बाद केले होते. त्याची ही कामगिरी पाहता नक्कीच आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी त्याच्यावर मोठी बोली लागू शकते.
२) बेन स्टोक्स:
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणजे इंग्लंडचा बेन स्टोक्स. ३१ वर्षीय बेन स्टोक्सने फलंदाजी आणि गोलंदाजीने इंग्लंड संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्याच्या टी -२० क्रिकेटमधील कामगिरी बद्दल बोलायचं झालं तर, १३० च्या स्ट्राइक रेटने त्याने ५३३ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना त्याने २५ गडी बाद केले आहेत. इतकेच नव्हे तर आयपीएल स्पर्धेत देखील त्याचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. आयपीएल स्पर्धेतील ४३ सामन्यांमध्ये त्याने ९२० धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना त्याने २८ गडी बाद केले आहेत. ज्या संघाला अष्टपैलू खेळाडूची गरज असेल तो संघ नक्कीच बेन स्टोक्सला आपल्या ताफ्यात संधी देऊ शकतो.
३) सॅम करन :
टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत इंग्लंड संघाला जेतेपद मिळवून देण्यात सॅम करनने मोलाची भूमिका बजावली आहे. याच कामगिरीच्या जोरावर त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार देखील देण्यात आला. इतकेच नव्हे तर आयपीएल स्पर्धेत देखील त्याने जोरदार कामगिरी केली आहे. गोलंदाजी करताना त्याने ३२ गडी बाद केले आहेत. तर फलंदाजी करताना त्याने ३३७ धावा केल्या आहेत. हा अष्टपैलू खेळाडू इंग्लंड संघासाठी हुकमाचा एक्का ठरला आहे. त्यामुळे तो आयपीएलच्या ज्या संघात जाईल, त्या संघात अष्टपैलू खेळाडूची कमतरता जाणवणार नाही.
४) रीले रुसोव :
रीले रुसोव टी -२० क्रिकेटमधील आक्रमक फलंदाजांपैकी एक आहे. जगभरातील अनेक टी -२० लीग स्पर्धांमध्ये त्याने आपल्या फलंदाजीचा डंका वाजवला आहे. त्याने टी -२० क्रिकेटमधील २६९ सामन्यांमध्ये १४३ च्या सरासरीने ६८७४ धावा केल्या आहेत. तर ११ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने एकूण ३७२ धावा ठोकल्या आहेत.
५) कॅमरन ग्रीन:
कसोटी क्रिकेटपासून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या कॅमरन ग्रीनने टी -२० क्रिकेटमध्ये देखील जोरदार कामगिरी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलिया संघासाठी खेळताना १७३ च्या स्ट्राइक रेटने १४३ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना ५ गडी देखील बाद केले आहेत. हा खेळाडू देखील आपल्या संघासाठी मोलाची भूमिका बजावू शकतो. त्यामुळे आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी होणाऱ्या मिनी ऑक्शनमध्ये कॅमरन ग्रीनवर देखील मोठी बोली लागू शकते.
तुम्हाला काय वाटतं? कुठला असा खेळाडू असेल ज्याच्यावर आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी होणाऱ्या मिनी ऑक्शनमध्ये मोठी बोली लागू शकते? कमेंट करून नक्की कळवा.




