दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका;केएल राहुल बाहेर तर रिषभ पंतकडे संघाची जबाबदारी..
भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला टी -२० सामना ९ जून रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.(IND vs SA T20I series)
भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुल (Kl Rahul) आणि फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे. आता यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh pant) संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik pandya) उपकर्णधाराची भूमिका पार पाडताना दिसून येणार आहे. मात्र केएल राहुल आणि कुलदीप यादवच्या जागी कोणत्या खेळाडूला संघात संधी मिळणार याबाबत कुठलीही माहिती देण्यात आली नाहीये.
बीसीसीआयने (Bcci) दिलेल्या माहितीत म्हटले की, केएल राहुलला राईट ग्रॉइन इंज्युरी झाली आहे. तर कुलदीप यादवला नेट्समध्ये फलंदाजी करताना दुखापत झाली आहे. याच कारणास्तव दोन्ही खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेतून बाहेर झाले आहेत.
या मालिकेसाठी दिग्गज फलंदाज रोहित शर्मा (Rohit sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना विश्रांती देण्यात आली आहे. आता केएल राहुल संघाबाहेर झाल्यामुळे भारतीय संघाला आणखी मोठा धक्का बसला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ :
रिषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर पटेल, अवेश खान , अर्शदीप सिंग, उमरान मलिक




