computer

इतिहासातले कलाटणी देणाऱ्या हत्या: एक वादग्रस्त विधान आणि त्याचा जगप्रसिद्ध बँड बंद पडला, त्याचा त्यामुळे खूनही झाला!!

ही गोष्ट आहे एका मनस्वी माणसाची. एका अर्थाने त्याचा हा मनस्वी स्वभावच त्याला भोवला. त्याच्याच एका चाहत्याला त्याची मतं पटली नाहीत. ती स्वीकारायचा प्रगल्भपणाही दाखवता आला नाही. त्यातून त्याचा चक्क खून झाला. तो तसं बरंच काही करायचा. गाणी लिहायचा, गायचा देखील. त्यातून त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. एक ना एक दिवस अख्खं जग एक होईल, देशांच्या सीमा पुसल्या जातील वगैरे वगैरे स्वप्नं पाहिली होती त्याने. काही प्रमाणात त्याने हे खरंही करून दाखवलं. देशोदेशींच्या सीमांचा अडथळा येऊ न देता जगभरातले असंख्य लोक त्याचे चाहते बनले. जिथे माणसाला फक्त माणूस म्हणूनच वागवलं जाईल, धर्माच्या भिंती नसतील असं जग असावं असं त्याचं स्वप्न होतं. पण वास्तवातलं जग यापेक्षा खूप वेगळं होतं. या माणसाचं नाव होतं जॉन लेनन.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान इंग्लंडमधल्या लिव्हरपूल शहरावर जर्मन सैन्य सातत्याने बॉम्ब वर्षाव करत होतं. ही १९४० मधली गोष्ट. त्यामुळे लोकांना जास्तीत जास्त काळ शेल्टर होम मध्ये काढावा लागत होता. जॉनचा जन्म याच काळातला. आई-वडील विभक्त झाल्यामुळे जॉनला त्याच्या एका नातेवाईकांनी सांभाळलं. पण त्यांच्या घरात शिस्तीची अनेक बंधनं होती. या बंधनांमध्ये घुसमटत जॉनचं बालपण सरलं. या काळात त्याची संगीताशी मैत्री झाली.

वयाच्या सोळाव्या वर्षी जॉनने स्वतःचा म्युझिक बँड सुरू केला. तो पुढे जाऊन बीटल्स या नावाने प्रसिद्ध झाला. १९६० च्या दशकात हा बँड झंझावाताप्रमाणे धुमाकूळ घालत होता. त्याने अनेक विक्रम केले. टाईम मॅगझीनने देखील जॉन आणि बीटल्स यांची नोंद घेतली. या घोडदौडीदरम्यानच जॉन लेनने "बीटल्स जीझस ख्राईस्टपेक्षाही जास्त प्रसिद्ध आहे" असं धाडसी विधान केलं. या वाक्याने जगभरात खळबळ उडवून दिली. लोकांनी रस्त्यावर उतरून बीटल्सच्या कॅसेट्स जाळल्या. बीटल्सला धमक्या मिळायला सुरुवात झाली. एवढं होऊनही जॉन आपल्या मुद्द्यावर ठाम होता. त्याने माफी मागायलाही नकार दिला. त्यातच बीटल्सच्या इतर भागीदारांमध्येही मतभेद व्हायला लागले. जॉनने स्वतःच हा बँड सोडला आणि बीटल्स बंद पडला. जगभरातल्या संगीतप्रेमींसाठी हा मोठा धक्का होता.

पुढे जॉनने एकट्याने परफॉर्म करायला सुरुवात केली. परत एकदा त्याने गायलेल्या अल्बम्सना तुफान प्रतिसाद मिळायला लागला. मधल्या काळात तो शांतता चळवळीचा कार्यकर्ता बनला होता. व्हिएतनाम युद्धाच्या विरोधात झालेल्या निदर्शनांमध्ये त्याने भाग घेतला होता. ८ डिसेंबर १९८० या दिवशी एका मॅगझीनच्या फोटोशूटसाठी जॉन लेनन घराबाहेर पडत होता, त्यावेळी त्याच्या चाहत्यांनी ऑटोग्राफसाठी गराडा घातला. त्यामुळे त्याला तिथे पोहोचायला उशीर झाला. फोटोशूट करून परत यायला त्याला रात्रीचे साडेदहा वाजले. तोपर्यंत चाहत्यांची गर्दी ओसरली होती.

फक्त एक जण बाहेर वाट पाहत उभा होता. त्याचा हेतू वेगळा होता. त्याला जॉन लेननला मारायचं होतं. संध्याकाळी ऑटोग्राफ घेण्याच्या गडबडीत राहिलेलं हे काम तो आता पूर्ण करणार होता. जॉन स्वतःच्या घरात शिरण्याआधीच गोळ्यांच्या अंदाधुंद वर्षावाला बळी पडला. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर अर्ध्या तासाने जॉन गेल्याचं जाहीर करण्यात आलं. त्याच्या मारेकऱ्याचं नाव होतं मार्क डेव्हिड चापमन. एके काळी जॉनचा चाहता असलेला हा माणूस त्याच्या मुलाखतीनंतर त्याचा विरोधक झाला होता. त्याचं ख्रिस्ताबद्दलचं ते विधान त्याला अजिबात आवडलं नव्हतं. त्याचवेळी त्याला सजा देण्याचं त्याने ठरवलं होतं आणि हे पाऊल उचललं होतं. त्यासाठी त्याने अनेक महिने प्लॅन आखण्यात घालवले होते. आपली सुरक्षारक्षकाची नोकरी सोडून तो न्यूयॉर्कला आला होता. तिथे रेकी करून नंतर त्याने आपली योजना अमलात आणली.

 

गुन्हा केल्यानंतर चापमन तिथून पळून न जाता तिथेच एक कादंबरी वाचत उभा राहिला. या कादंबरीवर त्यावेळी तीत असलेल्या सनसनाटी आणि खास प्रौढांसाठी असलेल्या कन्टेन्टमुळे सरकारने बंदी घातली होती. पळून न गेल्याने तो सहज पोलिसांच्या हातात आला. सहा महिन्यांनी त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

जॉन लेनन तर गेला, पण जाण्याआधी त्याच्याच काही ओळींच्या रूपाने आपल्या विचारांचा वारसा मागे ठेवून गेला : "तुम्ही म्हणाल हे एक दिवास्वप्न आहे. पण यात मी एकटा नाही. एक दिवस तुम्हीही माझ्यासोबत येणार आहात आणि हे जग एक होणार आहे.''

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required