computer

छोटा पक्षी मोठ्या पक्ष्याला भरवून कर्तव्य निभावतोय? अहं.. खरी मेख वेगळीच आहे.

आपल्याला कळलं नाही म्हणजे आपल्याला वाटतंय तसंच आहे' हा एक छान गैरसमज अनेकदा पाहायला मिळतो आणि मग त्यातून नको तेव्हढी कल्पकता जन्माला येते. सोबत असलेल्या व्हिडीओत एक छोटासा पक्षी एका मोठ्या पक्षाला भरवतोय असं दिसतंय. हा व्हिडीओ बघून लगेच लोकं एका गोंडस निष्कर्षाला येतात. 'बघा, बघा एक तरुण पक्षी आपल्या वृध्द पालकाला भरवून कर्तव्याची पूर्ती करतो आहे.' आता प्रत्यक्षात या भाबड्या समजूतीपलीकडे एक निसर्गाचं जे गमतीदार सत्य दडलं आहे ते आज समजून घेऊ या.

या व्हिडियोत दिसणारा प्रिनिया (वटवट्या) नावाचा छोटासा पक्षी त्याच्यावर लादलेलं पालकत्व अजाणतेपणी निभावतोय. या व्हिडीओत जे दुसरं भलं मोठं धूड आहे ते एका कुकू नावाच्या पक्ष्याचं पिल्लू आहे. म्हणजे आपण वरवर बघता जे समजतोय त्याच्या अगदी उलट चित्र आहे. तो छोटासा पक्षी पालकच आहे आणि जे मोठं धूड दिसतंय ते बाळ आहे. अशा प्रकारे स्वतःचं पिल्लू दुसऱ्याकरवी वाढवण्याला 'ब्रूड पॅरासाईटीझम' म्हणतात. ब्रूड म्हणजे पिल्लावळ. अगदी थोडक्यात सांगायचं तर बांडगुळी पिल्लं.

कोकीळा कावळ्याच्या घरट्यात अंडं घालते हे सगळ्यांना ठाऊकच आहे. पण कोकीळ म्हणजेच कुकू कुळातले सगळेच पक्षी असे बांडगुळी स्वभावाचे असतात. विविध जातीच्या पक्ष्यांच्या घरट्यात ते अंडं घालून पसार होतात. जमलंच तर जाता जाता यजमानाच्या घरट्यातली एक दोन अंडी ढकलूनही जातात. यजमान नेहमीप्रमाणेच अजाणतेपणी आपल्या अंड्यांसोबत कुकूचेही अंडं उबवतो. गंमत म्हणजे कुकुचं अंडं यजमानाच्या अंड्यांच्या आधी उबतं व त्यातून बाहेर आलेले पिल्लू इतर अंड्यांना लाथ मारून खाली ढकलून देतं. यामुळे होतं काय, स्पर्धा कमी होऊन त्या पिल्लांना मुबलक अन्न मिळतं. थ्री इडियट्समध्ये वीरू सहस्त्रबुद्धेने स्पर्धा म्हणजे काय हे सांगताना याचंच उदाहरण दिलं आहे.

 

पण प्रत्येक वेळी हा डाव यशस्वी होतोच असं नाही. म्हणजे अंडं घालण्याच्या आधीच जर यजमान कुटुंब कुकुला पळवून लावू शकलं तर ठीक. नाहीतर मग "अपनी चौखट का दिया अँड गिव्हिंग लाईट टू नेबर्स हाऊस" आहेच. पण इथेसुद्धा कोकीळ ट्रिक करतात. म्हणजे असं पाहिलंय की नर म्हणजेच कोकीळ, कावळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतो आणि कोकीळा हळूच येऊन अंडं घालून सटकते. म्हणूनच कावळे कधीही कोकीळ पक्ष्यांचा सहवास सहन करू शकत नाहीत. ताबडतोब आरडाओरडा सुरू करतात. पण असं असलं तरी यजमान दुसऱ्याचं अंडं आणि वेगळं दिसणारं पिल्लू का ओळखू शकत नाहीत हे एक कोडंच आहे. कदाचित अंड्यांमधील साधर्म्य आणि नंतर येणारे पालकत्वाचे उमाळे हे कारण असावं.

हे असंच बांडगुळी वर्तन काऊबर्डस,काही जातीचे मासे आणि कुकू वास्प नावाच्या माश्यांमध्येही पाहायला मिळतं.


शेवटी काय आहे की अनेकांनी चांगल्या भावनेने हा व्हिडियो शेअर केला असला तरी ते अज्ञानच आहे आणि कुठल्यातरी रुपात बुमरँग बनून आपलंच नुकसान करू शकतं म्हणून हे सत्य तुमच्यासमोर मांडलं आहे.


मकरंद केतकर

सबस्क्राईब करा

* indicates required