computer

आता विराट T-20चा कप्तान नसेल, पण त्याचे हे T-20 कप्तानपदाच्या विश्वविक्रम माहित आहेत?

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली T20 कर्णधार म्हणून नामिबियाविरुद्ध शेवटचा सामना खेळला. T20 विश्वचषकात भारताचा खेळ साजेसा न झाल्याने संघाला बऱ्याच रोषाचा सामना करावा लागला. पाकिस्तान आणि न्यूझिलंडविरुद्धचा पराभवामुळे भारताचे आव्हानच संपुष्टात आले. तेव्हापासून कर्णधार म्हणून विराट कोहलीवर बरेच प्रश्न उपस्थित केले गेले. त्यानंतर शेवटच्या तीन सामन्यांत भारताने विजय मिळवले. शेवटच्या सामन्यात भारताने नामिबियाचा नऊ गडी राखून पराभव करून स्पर्धेचा शेवट केला.

कर्णधारपद सोडल्यानंतरही विराट कोहलीने त्याच्या नावावर असे विक्रम केले आहेत जे अजून कोणत्याही कर्णधाराने केले नाहीयेत. यातले अनेक विक्रम तो अजूनही करू शकतो कारण एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार म्हणून तो भारताकडून खेळत आहे. आज अशाच महत्वाच्या विक्रमांवर एक नजर टाकूयात.

नामिबियाविरुद्ध खेळलेल्या सामन्यात भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. T-20 विश्वचषकात हा एक विक्रम आहे. नामिबियाचा संघ भारताविरुद्ध केवळ १३२ धावा करू शकला. भारताने नऊ गडी राखून हा सामना सहज जिंकला. नामिबिया संघाविरुद्धचा सामना भारतासाठी तसा सोपा होता.

दुसरा विक्रम म्हणजे कर्णधार म्हणून विराट कोहलीने ५० T-20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. यात त्याने ३२ वेळा संघाला विजय मिळवून दिला आहे, तर १६ वेळा भारताचा पराभव झाला आणि दोन सामने अनिर्णित राहिले. या विक्रमातील विशेष बाब म्हणजे विजयाच्या टक्केवारीच्या बाबतीत कोहली भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमएस धोनीपेक्षाही पुढे आहे. धोनीची विजयाची टक्केवारी ५९.२८ आहे. तर विराटची विजयाची टक्केवारी ६४.५८ आहे.

याशिवाय विराट कोहली हा भारताचा केवळ दुसरा असा कर्णधार ठरला आहे. ज्याने कसोटी, एकदिवसीय आणि T20 अशा ५० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे.
कमीत कमी ३० सामने खेळलेल्या कर्णधारांमध्ये तो विजय-पराजय गुणोत्तरात चौथा सर्वोत्तम कर्णधार आहे. त्याने ५० पैकी ३२ सामने जिंकले आहेत आणि फक्त 1१६ गमावले आहेत. त्यानुसार विराटचे विजय-पराजय गुणोत्तर २.० आहे. या यादीत त्याच्या पुढे असगर अफगाण, सरफराज अहमद आणि बाबर आझम आहेत. जगातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये विराट चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत तो एकमेव भारतीय कर्णधार आहे.

विराट आणि सेना टी-20 विश्वचषकातून बाहेर आल्यावर नक्कीच निराश झाली होती. परंतु आता नव्या उमेदीने भारतीय संघ उभा राहून कमबॅक करेल अशी आशा करूयात.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required